चालू घडामोडींचे विश्लेषण
होय ऐक ना.... !
©® विजय पिसाळ नातेपुते . . . .
नुकतंच दोघांचंही कॉलेज संपलं होतं टीवायचा पेपर संपल्यावर सर्वांनी जेवायला जायचा बेत आखला होता हॉटेलमध्ये , मनाची तर घालमेल चालू होतीच , परत कधीच भेटीगाठी होण्याचीही शक्यता फार नव्हती . . कारण तेंव्हा संपर्कासाठी मोबाईल नव्हते . लँडलाईन होते पण घरातील दबावामुळे बिनधास्त बोलणे व कॉलही करणे शक्य नव्हते . . . आम्ही पेपरच्या शेवटच्या दिवशी मस्तपैकी सर्वांनी जेवण केले . आणि जड अंतकरणाने एकमेकांचा निरोप घेतला . . . सुजयचं (काल्पनिक नावं) फिक्स काहीच नव्हतं आणि तिनं मात्र पुण्याला पुढील शिक्षणासाठी जायचं ठरवलं होतं . .
दोघांनीही एकमेकांचा निरोप घेतला आणि सुजय खोल भुतकाळात गेला . . . पहिल्या वर्षी जेंव्हा सुजय कॉलेजला गेला तेंव्हा सुजयचं शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं व सुजयचं गावही तसं छोटेसं त्यामुळे सुजयला इंग्रजी बोलता येत नव्हतं व वर्गातील मुलं मुली मात्र फाडफाड इंग्रजी बोलायची . . शिक्षकही इंग्रजीत शिकवायचे जणूकाही सुजयच्या मनाची अवस्था तुरूंगात कोंडलेल्या कैद्यासारखीच व्हायची !
सगळे जगच नवीन ना ?
कुणीच जुने मित्र नाहीत की मैत्रिणी नाहीत कि , जुने शिक्षकही नाहीत. . सरांनी एखादा प्रश्न विचारला की अडखळत उत्तर द्यायचे पण वर्गात मात्र खसखस पिकायची . . सुजय शांत होता , थोडा हसतमुख पण आपल्या परिस्थितीची जाणीव असलेला ! कॉलेजला नवीन असल्यामुळे व ग्रामीण भागातून आल्यामुळे त्या भाषा रांगडी होती . . . त्यामुळे सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे जायच्या . . .
सुजयच्याही हळूहळू ओळखी होऊ लागल्या तशी दिव्याचीही ओळख झाली ( काल्पनिक नाव ) दिव्या दिसायला छान, हस्ताक्षर छान,
श्रीमंत घरातील मुलगी , गाडीवरून मोकळे केस सोडत कॉलेजला यायची . . महागडे ड्रेस व मॅचिंग मध्ये असायची तसेच बिनधास्त रहायची पण अभ्यासातही जबरदस्त हुशार , सुजयची अवस्था पाहून वर्ग हसायचा मात्र दिव्या कधीच हसत नव्हती , समजून घ्यायची एकेदिवशी सुजयला कॉलेजला यायला उशीर झाला . . सरांनी सुजयची परिस्थिती व अडचण समजून न घेता खूप फडाफडा बोलून अपमान केला . . सुजयला खूप वाईट वाटले . ..पण करणार काय ? त्या दिवशी सगळा वर्ग मधल्या सुट्टीत वर्गाबाहेर गेला . मात्र सुजय एकटाच वर्गात बसून होता . . सुजय सर्वांबरोबर आला नाही म्हणून दिव्याने त्याची मित्रांकडे चौकशी केली व सुजय का सर्वांबरोबर आला नाही हे पण खरेतर ओळखले . . आणि सुजयला बाहेर कॅन्टीनला नेहण्यासाठी माघारी वर्गात परत आली आणि जवळ येऊन म्हणाली का इतका नाराज आहे रे सुजय ! चल ना आमच्या बरोबर चहाला ! सुजय नको म्हणत होता , नको - नको करत होता ! सुजयला जणू खूप दुःख झाले होते पण तिने हट्टाने चहाला त्याला नेहलेच !
तोपर्यंत सगळा वर्ग कॅन्टीनला गेला होता . . सुजय व दिव्या हळूहळू गप्पा मारत चालले होते . .
तिने विचारले का उशिर झाला रे सुजय !
सुजय काय सांगणार ?
घरची बिकट परिस्थिती ?
एक एसटी हुकली तर, दुसरी एसटी लगेच नसने ?
शेतातील काबाडकष्ट?
घरातील कामे ? जणावरांचा चारा पाणी ? घरोघरी वाढावे लागणारे दुध ? की किराणा मंडई ? शेतातील पिकांना पिकांना पाणी देणे ?
घरातील बाकीची जबाबदारी ?
नेमकं काय काय सांगायचं ?
खरंतर कामाच्या ओझ्याखाली त्याचा अभ्यास होत नव्हता , कामामुळे कॉलेजलाही दांड्या पडायच्या , उशीर व्हायचा , बुद्धी असूनदेखील अपमान होतोय याची सल असायची , तसा सुजय खेळात, वक्तृत्वात, कविता करण्यात, हुशार होता . पण या कॉलेजमध्ये नवीन असल्यामुळे त्याचे गुण थोडेच कुणाला माहिती असणार?
घरातील जबाबदारी आणि असणारी कामे यामुळे मात्र हतबल होता , सोसण्या शिवाय पर्यायचं नव्हता . . . आणि ग्रामीण भागातील मुलांना समजून घेतो तरी कोण? झगमगत्या दुनियेत !
ही सर्व परिस्थिती सुजयने दिव्याला सांगितली . . तरीही सगळी कामे सांगितली नाहीत पण यामुळे होणारी ओढाताण व त्याचा होणारा अभ्यासावरील परिणाम हे तो सांगत होता . . .
ति ऐकत होती . .
मग ति हळूच म्हणाली हे सर्व सरांना सांगायचे ना ?
पण सुजयला आपली अजचण सरांना सांगावी असे कधी वाटत नव्हते . . त्याला कुणाच्याही सहानुभूतीची व दयेची कधी गरज वाटत नव्हती. ..
तो म्हणायचा करायचा अपमान सहन. .! पण आपण कमी नाही स्वतःला समजायचं . . .
तिलाही खूप वाईट वाटले . तिचेही डोळे पाणावले , आणि म्हणाली काळजी नको करू , मि तुला नोट्स देत जाईल, तुला काही आडले तर समजून सांगेन, पण तुझी कामे करत जा आणि अभ्यासही मनापासून कर, काही अडचण असेल तर नि संकोचपणे मदतही मागत जा ? पण यावर त्याने फक्त मान डोलवली . . .
हळूहळू कॉलेजचे दिवस जातच होते .
तेंव्हा पासून दिव्या सुजयचा अपमान झाला तर मनातून नाराज व्हायची , पण मनातील सल ति कुणाशीच बोलून शकत नव्हती . .
दिव्या तिच्या सर्व नोट्स सुजयला द्यायची , कधीकधी तर झेरॉक्स सुद्धा त्याला द्यायची , काही अडले तर समजून सांगायची व वह्या द्यायची . . . जणू बेस्ट फ्रेंडच झाले होते दोघे !
कॉलेमधील, गॅदरींगला , काव्यवाचन स्पर्धेला , एकांकिका स्पर्धेला , वादविवाद स्पर्धेला , छोट्यामोठ्या नाटकांना दोघे एकत्र असाचे , विचारांनी व मनानेही दोघे एकत्र आले होते .
सुख दुःख वाटून घेताना , जेवणाचा डबाही वाटून खायचे , सुजय सुद्धा हळूहळू कॉलेजच्या विश्वात रमत चालला होता. रुळला होता याठिकाणी तो .
त्याला हळूहळू हे कॉलेज समजायला लागले होते , तो सगळ्या अॅक्टीवीटीत पुढे असायचा सहाजिकच त्याचं कौतुकही होत होतं . दिव्याला टेबलटेनिसची आवड होती व सुजयला क्रिकेटची आवड होती . दोघेही एकमेकांना सपोर्ट करायचे . . जणू दोघांची मैत्री म्हणजे कॉलेजचा एक चर्चेचा विषयच बनली होती .
फक्त शरीरेच दोन म्हणा की , मन मात्र एकच असे दोघांचे नाते तयार झाले होते . एखाद्या वेळी सुजयची टीम हरली तर तिच्या डोळ्यात आपोआपच पाणी यायचे , दिव्याला मेडल नाही मिळाले तर सुजय एकदम खट्टू व्हायचा !
का असेल दोघांची ही अवस्था ?
किती खोलीपर्यंत असेल दोघांची मैत्री ?
काय असेल सुजयची जादू ?
काय असेल दिव्याची भावना ?
हे जणूकाही न उलगडणारं कोडंच झालं होतं ? कॉलेज संपलं , आणि शेवटचा पेपर झाला सगळेजण हॉटेलला जेवायला गेले , जेवणाची ऑर्डर सुद्धा सुजयने दिली , सगळ्यांनी मस्तपैकी जेवण केले , आईस्क्रीम, बडीशेप खावून झाली व कॅमेर्यांने फोटो काढले . तेंव्हा मोबाईल नव्हते ना !
एकमेकांच्या निरोपाची वेळ आली .
नकळत सुजय व दिव्याच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या पण हळूच रुमालाने डोळे पुसत कुणालाही न दाखवता , हसत हसत निरोप घेतला !
दिव्या पुढील शिक्षणासाठी पुण्याला जाणार होती पण सुजयचे पुढील शिक्षणाचे काहीच फिक्स नव्हते , निरोप घेताना कागदावर पत्ते व लँडलाईन नंबर तर दिले होते पण संपर्काचे मार्ग मात्र खडतर होते . .
तीन वर्षात मनाने एकत्र आलेले आज विभक्त होणार होते ! जणू धुक्यात वाट हरवावी तसे होणार होते !
कधी भेट होईल याची काहीच खात्री नव्हती . . . जणू सर्वजण पुढे चालले होते आयुष्याच्या पुढील वळणावरील मागील मैत्रीच्या आठवणींना मनात परत परत वेदना. . जागवण्यासाठीच!
कधी काळी एकत्र खेळलेली , बागडलेली पाखरं आज नव्या प्रवासाला निघाली होती , उंच स्वप्न पाहण्याची , भरारी घेण्याची आणि जीवणात उंची गाठण्याची खूणगाठ मनाशी बांधून! तशी तर, शरीरं दोन पण जणू एक श्वास असलेले दिव्या व सुजय आज वेगवेगळ्या दिशेने आयुष्याच्या पुढील प्रवासाला चालले होते , आठवणींचा कल्लोळ डोक्यात घेऊन ?
कधी काळी एकमेकांशिवाय जगायचा विचारही करवत नव्हता दोघांना !
एकमेकांशिवाय खाण्या पिण्याचाही विचार त्यांच्या मनाला शिवतही नव्हता , आणि दुर होण्याचा असा विचार जरी मनात आला तरीदेखील हे जग सुद्धा दोघांनाही नकोस व्हायचं ?
खरेतर आजपासून एकमेकांशी बोलणंही होणार नाही हा विचार मनाला बेचैन करत होता . "सागराच्या लाटा शांत व्हाव्यात, " तशी दोघांचीही अवस्था झाली होती . मनातील वादळं शांत वरूण वाटत होती पण घालमेल मात्र आतल्या आत सुरू होती !
जन्मभर मैत्रीची, सोबतीची स्वप्न जणू तुटणार असेच वाटत होते त्यांना . आजपासून एकमेकांच्या मैत्रीची जागा जणू कोणतरी दुसर्याच व्यक्ती घेणार हे मनाला पटत नव्हते . . दोघेतर आपआपल्या घराकडे निघाले होते पण भावणांचा कल्लोळ मनात घेऊन, जर माझ्या मैत्रीची जागा तू दुसऱ्या व्यक्तीला दिलीस.. तर माझ्या आयुष्याचा बेरंग होईल! हाच दोघांच्याही मनात विचार येत असावा ?
एकमेकांनी या विरहात कसं मि जगायचं !
हे पुढील आयुष्य कसं काढायचं !
हाच विचार दोघांच्याही मनात घोळत होता !
आज " डोळ्यातील आसवांना , गालावर ओघळतानाही " पाहणारं जवळ कोणीच नव्हतं ! मन तर म्हणत होतं हे आयुष्यभर का नसतं कॉलेज?
दिव्या मनातच म्हणत होती सुजय का रे मला एकटीला जगायला भाग पाडलंय तू !
मला पाहिजे ति सजा दे पण माझ्यासाठी तरी तू पुण्याला ये ! ,
मनात म्हणत होती अरे सुजय, लांडग्यांच्या कळपात नको सोडू तुझ्या लाडक्या हरिणीला !
बेसावध शिकार करतील रे हे माझी माणसातील लांडगे !
तिच्या मनात विचार घोळत होता . . ति मनाशीच म्हणत होती .
तुला आठवत का रे माझ्या वाढदिवसाला तु मला दिलेली गुलाबाची नाजूक कळी व छानसी पेन आजही माझ्या कपाटात जपून ठेवलीय रे !
ति नाजूक पांढर्या मण्यांची माळ ति तर मि एकटीच लपूनछपून घालते रे अधूनमधून !
तिला आठवत होते कॉलेजमध्ये सोबतीला फिरताना तु मला कधीच रागावला नाही !
कधी वाईट भावनेने माझ्याकडे पाहिले नाही . स्वप्न पाहताना नेहमी तु जमिनीवर राहिला , तुझ्या मनातील भावना तु कधीच बोलला नाही ? त्यामुळे नकळत माझ्या ह्रदयात तुझी जागा खूप घट्ट झाली आणि आज तु सोबत नाही , याची कल्पनाच मी करू शकत नाही .... माझ्या हातचे डब्यातील पोहे तु आवडीने खाल्ले , भलेही ते चवदार नसतील तरीदेखील कौतुक केले माझे , का इतका गोड वागलास रे माझ्याशी ?
मि एखाद्या वेळी दुःखी असले की तुला बैचेन व्हायचे , तुला मि पुर्णपणे ओळखले रे मि तुझ्यातील प्रेमळ माणसाला मि ह्रदयात स्थान दिले रे !
सांग ना सुजय! आपल्या मैत्रीत गरिब श्रीमंती , जातपात, धर्म असा भेदभाव कधीच नव्हता . . होय ना !
तुला मि कित्येकदा सिनेमाला जावू असं मि म्हटले पण तु विनम्र नकार दिला , किती प्रगल्भ होतास तू . . तुझा जीव नव्हता असे नाही पण जगाच्या नजरा तुला माहित होत्या . .
खरंच लाखात एक सुद्धा असा मित्र कुणालाच सापडणार नाही !
सुजयच्याही मनातील अवस्था केविलवाणी होती बैचेन होता . दिव्याने वाढदिवसाला दिलेली ग्रीटींग, पेन सारं जपून ठेवलं होतं , जणू दिव्याने दिलेल्या भेटवस्तूंची जागा त्याच्या ह्रदयातील वस्तु संग्राहलयातील एका कप्प्यात बंदिस्त केली होती त्याने . तो म्हणत होता मनाशी , की कित्येक मैत्रिणी येतील जातील पण माझ्या दुःखात हातात हात घेऊन सांत्वन करणारी , कधी पेन विसले तर लगेच देणारी , कुठेही गेले तरी बील देऊ न देणारी , पैसा होता म्हणून नव्हे तर जाणीव होती म्हणून आपुलकीने वागणारी ! सतत
आठवण काढणारी दोन दिवस कॉलेज बुडले तर आपुलकीने चिडणारी . . काळजी करणारी , माझ्याशी असलेल्या मैत्री साठी इतर मित्र मैत्रिणींचेही टोमणे सहन करणारी ! सुजय मनाशीच बोलत होता अभ्यासासाठी हट्ट धरणारी , तुझ्यापेक्षा भारी मैत्रिण असूच शकत नाही .
खरंतर दोघांनाही माहिती होतं तीन वर्षानंतर आपली भेट होणं कठिण आहे तरीदेखील तु मला जीव लावायची काळजी घ्यायची हे मि कसं विसरू ? होय ना दिव्या
तुला खर तर त्या वेळी त्या माझी जेमतेम परिस्थिती माहिती होती. माझ्याकडून तुला महागडी गिप्ट मिळणार नाहीत याचीही खात्री होती , वर्गात कॉलेजमध्ये खूप श्रीमंतांची व माझ्यापेक्षाही देखणी मुले होती पण तु माझ्यात फक्त पाहिला माणूस, माझे पाहिले हळवे मन, माझी पाहिली तु धडपड आणि माझा पाहिला तु विश्वास!
तुच दिलेले फुल मि थरथरत्या हातांनी घेतले होते , जणू माझ्या हाताला सुद्धा स्पर्श न होण्याची मि काळजी घेतली होती , हाच विश्वास तुला भावला हे तुच मला सांगितले . खरेतर फुलाची किंमत छोटी असते पण त्या फुलामुळे तुझ्या चेहर्यावर झालेला आनंद पहिल्यांदा मला कळला कळला !
ते फक्त फुलच नव्हते तर माझ्या मैत्रीची , माझ्या भावनेची एक अनमोल भेट होती , जणू तुझ्यासोबतच्या मैत्रीची व पाहिलेल्या स्वप्नांची उंच उंच एक गुंफलेली गाठ होती ....
सुजय मनाशीच बोलत होता . .
तुला आठवतय का ? पहिल्या भेटीवेळी आपण कॉलेजच्या हिरवळीवर दोघेच गप्पा मारत बसलो होतो . . काय बोलावे आणि काय विषय काढावा हे तरी सुचत होते का ? तु मला माझे बालपण विचारले , माझा भूतकाळ विचारला !
एका अनामिकाला जणू तु तुझ्या शब्दातून पाझर फोडलेला . . तेंव्हा
गेलेला तो आपला दोन तासांचा वेळ खर तर मला आजही आठवतो . त्याच दिवशी तु मला पाहिल्यांदा मा़झ्याशी आयुष्यभर मैत्रीचा प्रवास करण्याचे वचन घेतले होते आणि आज आपण बरोबर नाहीत याची सल सुजयला सतावत होते . . वचन पाळायला आपण कमी पजलो ही ति भावना होती. . .
दिव्यापण मनाशी बोलत होती, आपल्या रुममध्ये डोळे एकटीच पुसत होती , गालावरून ओघळणारे अश्रूत जणू स्वप्न सारी भिजत होती . . . नव्हे विझत होती !
मनालाच म्हणायची. सुजय तुझ्या भेटीची ओढ.....माझ्या मनात कायम राहिल .
ती आपली पहिली भेट.... मला सदैव आठवत राहिलं !
पहिल्यांदा नजरेला नजर मि दिली होती पण तु तर तेवढेही धारिष्ट्य दाखवले नव्हते पण तु एक सालस शांत होता म्हणून मी नजरेला नजर तेंव्हा भिडवली आणि तेंव्हा तुझ्याही गालावर हळूच हसू उमटलं जणू लाजर्या मुली सारखा तु लाजला हे मि कसं विसरू ... अरे सुजय माझ्यातर मनातली धक धक वाढलेलीच होती तेंव्हा ... मला काय बोलावं हे पण सुचत नव्हतं फक्त मि तुला एकटक पहात होते. . जणू निरागस , मैत्री मला खूणावत होते . खरेतर तु मुलींशी बोलायला लाजायचा यामुळेच तु मला आवडायचा रे !
आठवतंय का तुला ? एकदा कॅन्टीनला कॉफी घेताना किती मजा आली होती , कुणालाच काही कळेना.... विषय कळत नव्हता पण हसतमात्र होतो आपण? बोलायला विषयच नव्हता पण काहीतरी बोलायचे म्हणून संबंध नसलेल्या विषयावर बोलत बसलेलो आपण ....सध्या प्रत्येक गोष्टीची तुझी आठवण येते रे तुझी , तुझ्या शिवाय दिवस जाणार नाहीत म्हणून वाईट वाटते रे , एकदा नाही का ? अचानक रिमझिम पाऊस सुरू झाला आणि मि भिजले होते . पण तु माझ्याकडे वर मान करून न पाहता मला हक्काने घरी जायला सांगितले व मि पण तुझे ऐकले का तर ते आजही मला कळत नाही रे !
मित्रा तुझ्या मैत्रीच्या स्वप्नात रंगले आहे मि ! भेटशील ना परत ... खरंतर त्या दिवशी मला तुझ्या सोबत पावसात भिजायच होतं , माझ्या भिजलेल्या केसांना तू हाताने हळूवार पणे हात फिरवून बाजूला सारावे वाटत होतं . पण तुला समाजाची रित पुरती माहित होती , तु विचारांने प्रगल्भ होता , तू तसा विचार केलाच नव्हता मैत्री पलीकडे त्यामुळेच तु मला भावतो रे , तुझं ते माझ्याकडे पाहणं कधीच वेगळं नव्हतं मात्र यातच तुझं मोठेपण होतं , तुझ्या डोळ्यांनी मला तु भरभरून बघावं हे मला वाटायचं पण तु कायम स्वतःला यापासून दुर ठेवलं जणू तुझा आदर्श हा साक्षात सर्व युवकांनी घेतला पाहिजे .
कधीतरी महाबळेश्वर, माथेरान व त्या थंड वातावरणात आपण दोघेच जायचं फिरायचं मि स्वप्न पाहिले होते तु व मि गरमगरम चहा घ्यायता , शॉपिंग करायचं मस्तपैकी ति दोघांनीच जेवण करायचं व दिवसभर फिरून परत यायचं हे माझं स्वप्न होतं रे !
ते स्वप्नच राहिलं योगच नव्हता , ते स्वप्न जरी साकार झालं नाही तरी तुझं वागणं जणू आयुष्यात मैत्रीचा आदर्श सांगून गेलंय रे आपलं कॉलेज जीवन ...
आजची तरूणाई किती सुंदर स्वप्न पाहतात, प्रेमाच्या आणाभाका घेतात आणि शुल्लक कारणाने लगेच दुरावतात. . पण आपल्यात असं काही झालंच नाही , तु कधी स्वप्न दाखवलेही नाही आणि कधी खोटं आश्वासनही दिलं नाही . इतका कसा तू समंजस होता . . दिव्या आठवलं तशी हुमसू हुमसून रडत होती . .
मनाला समजवत होती कधीतरी येईल परत माझ्या जीवनात माझा लाडका सुजय,
फक्त मित्र म्हणून तरी , तो कधीच मला विसरून जाणार नाही,
ना.....मी कधी विसरून जाणार?
इकडे सुजयही मनाची समजूत घालतोय, स्वप्नात जावून अजूनही तिथंच थांबून आहे तो , जिथं एकमेकांना सोडलं... निरोप दिला .
व्याकूळ होतोय आठवणीनी , मनाशीच म्हणतोय, जावून भेटू या अधूनमधून तिला , जरी कॉलेज माहिती नसले तरी शोधू , जरी पत्ता माहिती नसला तरी हुडकून काढू . . होईल थोडा त्रास पण नक्की भेटू , मैत्रीच्या रस्त्यात जीवनात आलेली व्यक्ती जेंव्हा दुर जाते तेंव्हा क्षितिज सुद्धा आपल्याला दिसत नाही . जीवनाचा रस्ता दाखवणारी व्यक्ती जेव्हा दुर जाते ना त्यावेळीच मैत्रीचा अर्थ कळतो , जीवनातील धक्का देणारा तो एक क्षण असतो.....
खरेतर मैत्रीत जीव असतो , जिव्हाळा असतो , आपुलकीचा सागर असतो , समजून घेतले तर आयुष्याचा मार्ग असतो .
आपल्याला काहीच अधिकार नसतानाही कुणावर तरी हक्कदेखील असतो जणू तो आपला अधिकार सुद्धा वाटतो .
कुणाच्या आयुष्यासोबत न खेळता मैत्रीचा झरा फुलवता येतो , योगायोगाने त्यात प्रेमाच्या धारा बरसल्या तर तो एक योग असतो पण मैत्री हा खेळ नसतो डाव खेळून खेळल्यागत कधी मोडायचा नसतो . मैत्रीत भावनांचा मिलाफ असतो.
म्हणून सुजय आणि दिव्याच्या मैत्रीचा धागा पक्का असतो व या साठीच त्यांचा जीव तुटतो . ..मैत्रीत
दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव ठेवायची असते . दुसर्याचे दुःख आपलेच आहे व ती वेळ स्वतःवर आल्यावरच होते. दुःख होते असे नाही तर त्यासाठी संवेदनशील असावे लागते .
म्हणून दिव्या व सुजय स्वतः एकांतात विरह सहन करतात मात्र ते सहन करून सुद्धा दुःखाची जाणीव होऊन देत नाहीत ... एकमेकांना
सुजय व दिव्या भेटतील का ?
त्यांची मैत्री पुढे जाईल का ?
पुढे काय होईल?
माझ्या वाचकांनी याची उत्तरे शोधावीत माझा यावरील पुढील लेख येईपर्यंत. . .
काल्पनिक कथा . . .
©® विजय पिसाळ नातेपुते ९४२३६१३४४९ / ९६६५९३६९४९