vijaypisal49. blogspot. com

शनिवार, २५ एप्रिल, २०२०

गावगाडा कसा चालणार?

चालू घडामोडींचे विश्लेषण
*कसा चालणार रुतलेला गावगाडा !*
वारंवारची संकटे झेलून झेलून शेतकरी मेटाकुटीला आलाय, कधी बाजारभावाचा प्रश्न, कधी जास्त उत्पादन झाले तर माल रस्त्यावर फेकण्याची वेळ येते , कधी वादळी वारे पीक भुईसपाट करतात  , कधी गारपीटीने होत्याचे नव्हते होते , कधी महापूरात सर्वस्व संपून जाते , कधी ओल्या  दुष्काळात पीक सडून जाते , तर कधी कोरड्या  दुष्काळात पीकांची होरपळ होते   तर कधी परदेशातून आयात केलेल्या मालामुळे दर पाडले जातात,  पाडलेले   गेलेले बाजारभाव अशी  नैसर्गिक व सरकार निर्मित  शेतकरी संकटे झेलून झेलून तो थकलाय,   त्याची लुट करून करून सगळे मजेत आहेत, लुट करणारांना , त्याचे शोषण करणारांना ,  त्याला आत्महत्या करायला भाग पाडणारांना कोणीही शाप देत नाही , त्याच्या टाळूवरील लोणी खाणारांना कोणताही देव शिक्षा देत नाही .  त्याची सर्रासपणे लुट केली तरीदेखील आजवर ना कोणत्या सरकारला , ना कोणत्या सावकाराला ना फुकट खाणारांना पाप लागले आहे . त्याला षडयंत्र रचून रचून घायला आणायचे काम करायचे , सगळ्यांना पोसण्यासाठी पिळवणूक करायची . आणि त्याचाच नावाने राजकारण करून मगरीचे आसू ढाळायचे .   आतातर  त्याच्यातील काहींना ६००० हजारांचा नको असलेला उतारा टाकलाय?  जणू भीक टाकावी व त्याने पोट भरावे तसे !  या कोरोनाच्या संकटात तो पुरता संपलाय. .  त्यासाठी राजकारण म्हणून सुद्धा कुणी पुढे आले नाही . 
 पोटच्या पोरापेक्षा जास्त जपलेल्या , फळबागा , भाजीपाला , शेतात सडून गेला , जागेवर माल पीकून खराब झाला !  कित्येक माझ्या बांधवांना तो  विकताच आला नाही . खूप महत प्रयासाने  विकायची परवानगी भेटली तर वाहतूकीची साधने नाहीत. शेतमालाची ने आण करायला परवानगी , डिझेल टाकायला पास  , 
शेतातील तयार झालेली फळे पिकवण्याची त्याच्याकडे यंत्रणाच नाही ?  आणि तो माल   पिकवला तर माल विकत बसायचे की, शेतात कधी  राबायचे ?  शेती कधी  करायची ?   बाहेर माल विकायला जावे म्हटलं तर शेतातील गुरे , जनावरे बघायची कोणी ?  त्यातूनही सवड काढली तर  बाहेरगावी जाता येत नाही .   व्यापारी शेतकऱ्यांकडून कवडीमोल दराने घेतात व अशाही संकटात  लोकांना मात्र अव्वाच्या सव्वा दराने विकतात.  नुसती ग्राहक व शेतकर्यांची लुट चालू आहे .  यावर सत्ताधारी व विरोधक मुग गिळून गप्प आहेत .  लाखो रूपये शेतकर्यांनी फळ बागांसाठी,  भाजीपाल्यासाठी घातले . आता त्यातील १० ते २०% तरी वसूल होतील का नाही शंका आहे  ? सरकारी मलपट्टी होईल, मदतीचे आकडे जाहीर होतील पण शेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार घंटा ?  फॉर्म भरणारे , फॉर्म जमा करून घेणारे , याद्या तयार करणारे मात्र मालामाल होणार? 
 मदत मिळेत ति पण ठरावीक लोकांनाच मात्र जाहिरातींची पाने भरभरून छापून येतील हे मात्र नक्की . या महामारीत 
  प्रचंड नुकसानीमुळे   कित्येक शेतकऱ्यांचे  कर्ज थकणार, यात जवळपास ८० % शेतकऱ्यांचे सीबील खराब होणार, त्यामुळे थकीत गेलेल्या शेतकर्यांना  बँका पुढील हंगामात  पतपुरवठा करतील का नाही . ही शंका आहेच  . खाजगी सावकार लुटणार हेही नक्की आहे . सामान्य शेतकऱ्यांनीच नव्हे तर मोठ मोठ्या शेतकऱ्यांनीही  मशागत, मजूर,  खते , बियाणे, डिझेल, पेट्रोल  यासाठी पैसा कसा व कुठून उपलब्ध करायचा हा गंभीर प्रश्न आहे .  शेतकर्यांना  या लॉकडाऊनमध्ये ना पोलिसांनी समजून घेतले , ना महसूल विभागाने समजून घेतले . शेतकऱ्यांचा  किरकोळ माल विकतानाही नाकीनऊ आणले . तेल मिठ सुद्धा बंद पाडले , शेतकरी  लोकांना डिझेल, पेट्रोल यासाठी वनवन करावी लागली , गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना काठीचा प्रसाद खावा लागला . सातत्याने अडवणूक झाली .  त्यामुळे  शेतातील असंख्य कामे पेंडींग राहिली आहेत. मजूरांना शेतात जाताना येताना  भयंकर त्रास सहन करावा लागला , कसा हा तोटा भरून काढायचा  , उपसलेल्या बँका कशा भरायच्या ? 
 पुढच्या काळात   शेती जर पिकली नाही तर हे लोक काय खाणार आहेत कुणास ठावूक. .  प्रशासनाने शिस्त लावायची असते नियम घालून द्यायचे असतात,  पुढाकार घ्यायचा असतो . उपाय योजना करताना गोरगरीबांचे  कमीतकमी नुकसान कसे होईल हे पहायचे असते ?   पण इथे मात्र लोकांना हुसकावून लावणे , मारहाण करणे अपमानास्पद बोलणे सर्रासपणे चालूच होते. किराणा दुकाने बँकात सोशल डिस्टन्सिंगचे किती काटेकोरपणे पालन झाले ?  पण मोटार सायकलवरून फिरून भाजी विकणारांना मात्र हुसकावून लावले गेले , भाजी विकायला चालला तरीदेखील, लायसन्स मागीतले गेले !   ज्या हाताने माणसे पोटभर खातात ते तर शेतातून आलेले असते व त्याच शेतकऱ्यांना   मारहाण केली जाते ?  किती दुर्दैवी आहे .  सगळ्या जगात  जागोजागी मि पोलिस मित्र पाहतोय , प्राणीमित्र, पक्षीमित्र, पाहतोय, पण एकही शेतकरी मित्र पाहिला नाही , जो शेतमाल विकायला मदत करेल!  जो तो फुकट लुटायला , फुकट मिळवायला बसलेला मि पाहिला ! 
 ज्यांना काहीतरी आमचे दुःख समजेल? असे दिसलेच नाहीत! 
या मानवतेच्या ढोंगीपणात  शेतकर्यांच्या व्यथा मांडायला यंत्रणा मुकी झालीय,  शेतकर्यांच्या व्यथा एेकायला यंत्रणा बहिरी झालीय.  शेतकर्यांचा माल फेकून देत असताना सगळी यंत्रणा आंधळी झालीय.   सगळे  ड्रामेबाज कार्यक्रम व त्याचे काय ते कौतुक?   मेडिकल, बँका , किराणा दुकाने या ठिकाणी  किती सोशल डिस्टन्सिंग पाळले गेले ?  मुळात भाजीपाला फळे जेवढे नियम पाळून विकली तेवढे बाकी काहीच विकले गेले नाही . कितीजण हँडवॉश व सॅनेटा़ईझरचा वापर करतात?  पण शेतमाल विकताना मात्र यांना नियम दिसतात. नियम पाहिजेत पण सर्वांसाठी सारखेच असावेत ना ? 
  बळीराजाच्या मृत्यू नंतर   शेतकऱ्यांना कुणीच वाली राहिला नाही . 
येणारा काळ भयंकर असेल हे मात्र नक्की !  
विजय पिसाळ नातेपुते.

शनिवार, १८ एप्रिल, २०२०

सोशल मिडिया शाप की , वरदान?

चालू घडामोडींचे विश्लेषण


*सोशल मिडिया शाप की वरदान. .* 
काहीजण चोवीस तास सोशल मिडिया वापरतील, मनसोक्त करमणूक करून घेतील,  करमणूक करतील, एकमेकांशी संवाद साधतील,  हजारो , लाखो लोकांपर्यंत याच माध्यमातून पोहोचतील, सोशल मिडीयाचाच  वापर करून सोशल मिडिया किती बेकार आहे हे पण सांगतील असो ! हेही खरे आहे  ,  हातात काम असताना सोशल मिडियाचा अती वापर करणं हे चुकच आहे .  पण सोशल मिडिया हा नुसता टाईमपास आहे का ?  सोशल मिडिया नुसती करमणूक आहे का ? हे जर आपण हो म्हणत असू  तर नक्कीच आपण कुठेतरी चुकतोय!  
याच सोशल मिडियामुळे गावागातील समस्या वरिष्ठा पर्यंत पोहचू लागल्या हे विसरता येईल का ? फेसबुक व व्हॉट्सपच्या व सर्वच सोशल मिडियाच्या  माध्यमातून सर्व प्रकारचा व्यापार होऊ लागला आहे  .  जगातील ज्ञान, विज्ञान, कला , क्रिडा यांची माहिती घरबसल्या मिळू लागली आहे  .  नवनवीन तंत्रज्ञान, नवनवीन बाजारपेठा , वस्तूंचे बाजारभाव हे सुद्धा क्षणात आम्हाला मिळू लागले . रोडवरील  अपघात असो कि  घरातील छानसा कार्यक्रम असो त्याचे व्हीडिओ, अॅडिओ, फोटो लगेच मिळतात, त्यामुळे अपघातात मदत होतेच ना ?  इतरांच्या आनंदात सहभागी होता येतेच ना ?  रक्तदान शिबिरे , आरोग्य शिबीरे  यांचे आवाहन हजारो लोकांना करता येते.  विधायक कामासाठी लोकांना आवाहन करता येते , लोकांचा सहभाग वाढवता येतो  हे केवळ सोशल मिडियामुळेच शक्य झाले की नाही .  कोणत्या शहरात, कोणत्या भागात काय समस्या आहेत हे पण समजू लागले .  शाळा , कॉलेज, ट्यूशन, यांच्या डेली अपडेट्स याच प्लॅटफॉर्मवर मिळू लागल्या . वर्ग बंद ठेवले तरीदेखील याच माध्यमातून शिक्षण उपलब्ध होत आहे . स्पर्धा परिक्षांची तयारी , विविध अभ्यासक्रम याच माध्यमातून चालू आहेत.  आपला पाल्य शाळेत येतो का , त्याची तयारी कशी आहे . तो सर्व तासांना असतो का ?  याची माहिती घरबसल्या पालकांना  मिळू लागली आहे  .  जगाच्या कानाकोपर्यातील सर्व माहिती क्षणात प्राप्त होऊ लागली आहे.  परदेशात,  परगावात, शहरात   नोकरी व शिक्षण या निमित्ताने असलेली  मुले, नातवंडे , सुना यांच्याशी घरातील वडिलधारी मंडळी व्हीडिओ कॉलवरून बोलू लागली .  शासकीय आदेश क्षणात सर्व अधिकारी व कर्मचारी यांना प्राप्त होऊ लागले आहेत  .  किराणा  दुकानदार, भाजीवाले  ,  या माध्यमातून ऑर्डर स्वीकारू लागले आहेत  .  शेतकऱ्यांना जागेवरून माल विकता येतोय, त्याची जाहिरात करता येतेय,  विविध वाचणीय पुस्तके घरबसल्या वाचता येऊ लागली आहेत . मनोरंजनाचे साधन जरूर  आहे सोशल मिडिया , पण आपुलकीच्या  संवादाचे माध्यम सुद्धा  आहे सोशल मिडिया , मदतीला धावणारा आहे सोशल मिडिया . गोरगरीबांच्या अडचणींचे निराकरण करण्यास मदत आहे सोशल मिडिया .  धावपळीच्या जीवनात एकमेकांना जोडणारा आहे सोशल मिडिया . शाळा कॉलेज संपल्या नंतर  दुरावलेले मित्र मैत्रिणी  एकत्र करणारा आहे सोशल मिडिया . सर्व वस्तुंच्या किंमती , खरेदी व विक्री करणाऱ्या कंपन्या यांची माहिती मिळण्याचे ठिकाण आहे सोशल मिडिया . उत्पादक ते ग्राहक जोडणारा आहे हाच सोशल मिडिया .  गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाय आहे सोशल मिडिया . .  किरकोळ तोटे जरी असले तरीदेखील फार महत्वाचा आहे सोशल मिडिया . .  फक्त त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असेल तरच त्याचे फायदे समजतील नाहीतर फक्त  , त्याचाच वापर करून सोशल मिडिया खराब आहे असे म्हणणेही  योग्य नाही .  
मला तर सोशल मिडिया हा मानवाला वरदान आहे असेच वाटते . 
विजय पिसाळ नातेपुते . 
९४२३६१३४४९/ ९६६५९३६९४९

गुरुवार, १६ एप्रिल, २०२०

३ मे नंतर सुद्धा तुम्हाला काळजी घ्यावीच लागेल!

चालू घडामोडींचे विश्लेषण

3 मे रोजी कदाचित  लॉकडाऊन संपेल, सरकार अर्थव्यवस्था व गोरगरीबांच्या जीवनमरणाचा विचार करून लॉकडाऊन वाढवणार नाही .  पण याचा अर्थ आपल्या देशातून ३ मे पर्यंत संपुर्ण कोरोनाचे उच्चाटन होईल असा बिलकुल नाही .
 ३ मे नंतर सरकारची जबाबदारी कमी व स्वतःची जबाबदारी जास्त वाढणार आहे . लोकांचे जथ्थेच्या जथ्थे बाहेर पडतील, मॉल, रेल्वे स्टेशन, सिनेमा हॉल, बस स्थानके , बाजारपेठा , विविध दुकाने  या ठिकाणी लोक प्रचंड संख्येने जातील व येतील. यामुळे कोरोनाची खरी लढाई ३ मे नंतर चालू होणार आहे .  आपल्याकडचे लोक  लॉकडाऊन असतानाही सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत,  सरकारच्या आदेशाला जुमानत नाहीत, गुपचूप एकत्र येतात, पार्ट्या करतात,  त्यामुळे ही चैन ब्रेक झाली नाही .  आणि म्हणूनच ३ मे नंतर सुद्धा चैन ब्रेक होणार नाही असेच वाटते . 
  ३ मे नंतर जे जे लोक  स्वतःच स्वतःची काळजी घेतील,  सार्वजनिक वाहतूक, सार्वजनिक समारंभ, सार्वजनिक रित्या होणारे  धार्मिक कार्यक्रम  व मोठ मोठे होणारे लग्न विधी टाळतील, घरात बाहेरच्या लोकांना कोरोनाचे उच्चाटन होईपर्यंत  काहीकाळ येऊ देणार नाहीत.  आपल्या वाहनांचाच वापर करतील, भाडोत्री गाड्या सांगणार नाहीत. 
 तेच लोक यातून सहीसलामत राहतील.   खरेतर मोठ मोठ्या शहरातील भाजीपाला व फळे व्यापार हा डायरेक्ट घरोघरी जावून संबंधित व्यापारी आणि शेतकरी यांनी करायला पाहिजे .  मोठ्या शहरातील मार्केट कमिट्यात सोशल डिस्टन्सिंगचे तिन तेरा होत आहेत.  त्यापेक्षा व्यापार्यांनी शेतमाल बांधावर खरेदी करावा व घरोघरी जावून तो ग्राहकांना  विकावा तरच यातून आपण वाचू शकतो.  
सरकारने  , शाळा , कॉलेज, परिक्षा , या किमान ऑगस्ट पर्यंत तरी घेण्याचा विचार करू नये .
 शाळेतील मुलं संपुर्ण गावातील किंवा शहरातील वेगवेगळ्या भागातील असतात त्यामुळे धोका वाढू शकतो.  कोरोनाचे संपुर्ण उच्चाटन होईपर्यंत होणारे लग्न समारंभ हे छोटेखानी व घरगुती किंवा रजिस्टर पद्धतीने व्हायला हवेत.  आपल्या देशाची लोकसंख्या आणि सामाजिक सौहार्द यामुळे लग्न समारंभ मोठ मोठे करण्यासाठी संपुर्ण परिसरातील लोकांना निमंत्रित करण्याची प्रथा व परंपरा आहेत पण यापुढे हे कोरोना संपेपर्यंत थांबवावे लागेल  . 
सरकारने परदेशी पर्यटनाला, प्रवासाला  किमान १ वर्ष तरी बंदी ठेवली पाहिजे .  व ज्यांना   केवळ नोकरीसाठी व शिक्षणासाठी  परदेशात  जायचे किंवा यायचे आहे .  त्यांना कंपल्सरी विमानतळावरून थेट १४ दिवस आयसोलेटेड केले पाहिजे .
सध्याची परिस्थिती लगेच सुधारणार नाही त्यामुळे सार्वजनिक प्रवाशी  वाहतूक काही काळ बंद ठेवली तरच संसर्ग थांबवता येईल.  छोटी छोटी वाहने  पुर्णपणे आतून बाहेरून फवारणी करूनच वापरली पाहिजेत.  कोरोनाचे संकट ३ मे नंतर लगेच संपेल व रस्त्यावर येऊन आम्ही दिवाळी करू हा जर विचार करत असाल तर तुम्हाला रस्त्यावर होळी जशी गल्लोगल्ली पेटवतात तसे प्रेतांना अग्नि संस्कार करावे लागतील. 
भारतातील शेवटचा कोरोना पेशंट संपेल तेंव्हाच हे संकट संपणार आहे .  त्यामुळे ३ मे नंतर जो काळजी घेईल तोच वाचणार आहे. 
विजय पिसाळ नातेपुते . . 
९४२३६१३४४९/ ९६६५९३६९४९

शनिवार, ११ एप्रिल, २०२०

शेतकरी ते थेड ग्राहक विक्रीला परवानगी दिल्या शिवाय पर्याय नाही !

चालू घडामोडींचे विश्लेषण





शेतकरी ते ग्राहक साखळी तयार केल्या शिवाय पर्याय नाही . . 
विजय पिसाळ नातेपुते . . 
कोरोना सारखे साथीच्या आजारामुळे सोशल डिस्टन्सिंगचा प्रॉब्लेम वारंवार होत असल्यामुळे प्रशासनाला वारंवार भाजीपाला व फळे मार्केट बंद करावे लागते आहे .  कारण काही ठिकाणी  किरकोळ व्यापारी , ग्राहक, हमाल  नियमांना तिलांजली देतात. त्यामुळे कोरोना सारख्या रोगाचा फैलाव रोखणे कठिण जाते,  यासाठी यापुढच्या काळात शेतकऱ्यांच्या मुलांना शासनाने सहकार्य करून डायरेक्ट शेतकरी ते ग्राहक ही चैन तयार करावी लागणार आहे .  त्यासाठी शासनाने शेतकर्यांच्या मुलांना छोटी  कुलिंग वाहने व  , शेतावरच फळे पिकवण्यासाठी  रायपनिंग चेंबर या साठी प्रोत्साहन पर अनुदान दिले पाहिजे , तसेच त्यांना बँका मार्फत कमी व्याजदराने किंवा अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून, त्याला शासनाने थकहमी दिली पाहिजे  .  फळे व  भाजीपाला हा शेतकऱ्यांनी डायरेक्ट शहरातील वेगवेगळ्या भागात घरपोच दिला पाहिजे व तसेच ग्राहक ते शेतकरी साखळी तयार झाली पाहिजे .  संबधित शहरातील मोठ मोठ मोठ्या सोसायट्या व वेगवेगळे ग्राहक यांनी शेतकऱ्यांना जर व्हॉट्सपवरून दैनंदिन लागणार्‍या मालाची ऑर्डर्स दिल्या व तेवढा माल शेतकऱ्यांनी रास्त दराने ग्राहकांना पुरवला तर ग्राहकांना योग्य दराने भाजीपाला व फळे मिळतील व शेतकऱ्यांनाही वाजवी भाव मिळेल व वाहतूक कोंडी  न होता  सोशल डिस्टंसिंगचे पालन होऊन  शहरात भाजीपाला ग्राहकांना घरपोच मिळेल. भाजीपाला वारंवार हाताळल्या मुळे होणारी नासाडी सुद्धा टळेल. .  
यापुढील काळात असे केले तरच कोरोना सारख्या आजारावर मात करता येईल व ग्राहक आणि शेतकरी यांचेही नुकसान टाळता येईल.
विजय पिसाळ नातेपुते 
९४२३६१३४४९ / ९६६५९३६९४९