vijaypisal49. blogspot. com

गुरुवार, १६ एप्रिल, २०२०

३ मे नंतर सुद्धा तुम्हाला काळजी घ्यावीच लागेल!

चालू घडामोडींचे विश्लेषण

3 मे रोजी कदाचित  लॉकडाऊन संपेल, सरकार अर्थव्यवस्था व गोरगरीबांच्या जीवनमरणाचा विचार करून लॉकडाऊन वाढवणार नाही .  पण याचा अर्थ आपल्या देशातून ३ मे पर्यंत संपुर्ण कोरोनाचे उच्चाटन होईल असा बिलकुल नाही .
 ३ मे नंतर सरकारची जबाबदारी कमी व स्वतःची जबाबदारी जास्त वाढणार आहे . लोकांचे जथ्थेच्या जथ्थे बाहेर पडतील, मॉल, रेल्वे स्टेशन, सिनेमा हॉल, बस स्थानके , बाजारपेठा , विविध दुकाने  या ठिकाणी लोक प्रचंड संख्येने जातील व येतील. यामुळे कोरोनाची खरी लढाई ३ मे नंतर चालू होणार आहे .  आपल्याकडचे लोक  लॉकडाऊन असतानाही सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत,  सरकारच्या आदेशाला जुमानत नाहीत, गुपचूप एकत्र येतात, पार्ट्या करतात,  त्यामुळे ही चैन ब्रेक झाली नाही .  आणि म्हणूनच ३ मे नंतर सुद्धा चैन ब्रेक होणार नाही असेच वाटते . 
  ३ मे नंतर जे जे लोक  स्वतःच स्वतःची काळजी घेतील,  सार्वजनिक वाहतूक, सार्वजनिक समारंभ, सार्वजनिक रित्या होणारे  धार्मिक कार्यक्रम  व मोठ मोठे होणारे लग्न विधी टाळतील, घरात बाहेरच्या लोकांना कोरोनाचे उच्चाटन होईपर्यंत  काहीकाळ येऊ देणार नाहीत.  आपल्या वाहनांचाच वापर करतील, भाडोत्री गाड्या सांगणार नाहीत. 
 तेच लोक यातून सहीसलामत राहतील.   खरेतर मोठ मोठ्या शहरातील भाजीपाला व फळे व्यापार हा डायरेक्ट घरोघरी जावून संबंधित व्यापारी आणि शेतकरी यांनी करायला पाहिजे .  मोठ्या शहरातील मार्केट कमिट्यात सोशल डिस्टन्सिंगचे तिन तेरा होत आहेत.  त्यापेक्षा व्यापार्यांनी शेतमाल बांधावर खरेदी करावा व घरोघरी जावून तो ग्राहकांना  विकावा तरच यातून आपण वाचू शकतो.  
सरकारने  , शाळा , कॉलेज, परिक्षा , या किमान ऑगस्ट पर्यंत तरी घेण्याचा विचार करू नये .
 शाळेतील मुलं संपुर्ण गावातील किंवा शहरातील वेगवेगळ्या भागातील असतात त्यामुळे धोका वाढू शकतो.  कोरोनाचे संपुर्ण उच्चाटन होईपर्यंत होणारे लग्न समारंभ हे छोटेखानी व घरगुती किंवा रजिस्टर पद्धतीने व्हायला हवेत.  आपल्या देशाची लोकसंख्या आणि सामाजिक सौहार्द यामुळे लग्न समारंभ मोठ मोठे करण्यासाठी संपुर्ण परिसरातील लोकांना निमंत्रित करण्याची प्रथा व परंपरा आहेत पण यापुढे हे कोरोना संपेपर्यंत थांबवावे लागेल  . 
सरकारने परदेशी पर्यटनाला, प्रवासाला  किमान १ वर्ष तरी बंदी ठेवली पाहिजे .  व ज्यांना   केवळ नोकरीसाठी व शिक्षणासाठी  परदेशात  जायचे किंवा यायचे आहे .  त्यांना कंपल्सरी विमानतळावरून थेट १४ दिवस आयसोलेटेड केले पाहिजे .
सध्याची परिस्थिती लगेच सुधारणार नाही त्यामुळे सार्वजनिक प्रवाशी  वाहतूक काही काळ बंद ठेवली तरच संसर्ग थांबवता येईल.  छोटी छोटी वाहने  पुर्णपणे आतून बाहेरून फवारणी करूनच वापरली पाहिजेत.  कोरोनाचे संकट ३ मे नंतर लगेच संपेल व रस्त्यावर येऊन आम्ही दिवाळी करू हा जर विचार करत असाल तर तुम्हाला रस्त्यावर होळी जशी गल्लोगल्ली पेटवतात तसे प्रेतांना अग्नि संस्कार करावे लागतील. 
भारतातील शेवटचा कोरोना पेशंट संपेल तेंव्हाच हे संकट संपणार आहे .  त्यामुळे ३ मे नंतर जो काळजी घेईल तोच वाचणार आहे. 
विजय पिसाळ नातेपुते . . 
९४२३६१३४४९/ ९६६५९३६९४९