vijaypisal49. blogspot. com

मंगळवार, २० फेब्रुवारी, २०२४

समाजरत्न मा.श्री.कै.राजेंद्र (भाऊ) पाटील

चालू घडामोडींचे विश्लेषण
नातेपुते गावच्या राजकीय पटलावरील एक तारा हरपला  !

नातेपुते व पंचक्रोशीत ज्यांचे नाव आदराने घेतले जात होते. ज्यांचा नातेपुते गावात शांतता व सलोखा राहण्यात महत्वाचा सहभाग होता आणि ज्यांना घराण्याचा मोठा वारसा लाभून सुद्धा कोणताही गर्व नव्हता , सर्वांना ते भाऊ म्हणून परिचित होते असे नातेपुते गावचे आदरणीय व्यक्तिमत्व समाजरत्न कै.राजेंद्र (भाऊ) पांढरे पाटील यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आणि नातेपुते गावातील गोरगरीबांचा आधार हरपला , कोणताही गोरगरीब दारात गेला आणि त्याला भाऊंनी मोकळ्या हाताने कधी पाठवले असे झाले नाही. गोरगरीबांचे लग्न असो की अजून कोणतीही अडचण असो लोक भाऊंकडे जायचे आणि भाऊ त्यांना वडिलकीच्या नात्याने जवळ करायचे , चार चांगल्या गोष्टी सांगायचे व अडचण दुर करायचे ,भाऊंनी आपला परका असा भेदभाव केला नाही. महादेवाची यात्रा असो की , नातेपुते गावातील कुस्त्यांचा फड असो की , बेंदराचा सण असो भाऊंचा सक्रिय सहभाग असायचा व भाऊंचा शब्द कुणीही मोडत नव्हते .भाऊंनी देशी गोवंशावर निस्सिम प्रेम केले , जातीवंत खिल्लार गाई बैलांचा खूप आपुलकीने सांभाळ केला , लांबून लांबून जातीवंत खिल्लार खोंड आणुन नातेपुते परिसरातील गोरगरीब शेतकऱ्यांना ब्रिडिंगसाठी मदत केली. गोपालणातून भाऊंना फारसा आर्थिक लाभ नव्हता किंबहुना तोटाच होता पण शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे ही भावना त्यांच्या मनात सदैव असायची, नातेपुते विविध कार्यकारी सोसायटीचा कारभार भाऊंनी अतिशय काटकसने केला , शेतकऱ्यांना कर्ज देताना कधीच दुजाभाव केला नाही. सोसायटीच्या माध्यमातून  चालवले जाणारे स्वस्त धान्य दुकान व रॉकेल वितरण करताना गोरगरीबांना पुरवठा विभागातून आलेले धान्य पुर्ण वाटप केले आणि सगळ्यांचे आशीर्वाद घेतले , कधीच कुणाला धान्य संपले आहे असे म्हणून माघारी पाठवले नाही. गावात जर कुठे वादविवाद झाला तंटा झाला तर लोक भाऊंकडे न्याय मागण्यासाठी जात असत  व भाऊ जवळचा परका असा कोणताही विचार न करता न्यायनिवाडा करत असत  , सगळ्या लोकांचे समाधान भाऊ करत असत . भाऊंवर हजारो लोक प्रेम करायचे ते केवळ त्यांच्या सरळमार्गी स्वभावामुळे , त्यांनी समाजकारण व राजकारण करताना अनेकांना संधी दिली  कुरघोडीचे राजकारण केले नाही, दिलेला शब्द कधी मोडला नाही . त्यांनी ज्यांना संधी दिली ती माणसे खूप मोठी झाली  आणि त्या माणसांनीही भाऊंचे नाव वेळोवेळी घेतले, नातेपुते गावचे खेळीमेळीचे राजकारण रहावे म्हणून भाऊंनी जे काम केले ते पुढच्या पिढीसाठी आदर्श असेच आहे.
भाऊ जरी  शरीराने आपल्यात नसतील तरीदेखील त्यांचे विचार आणि त्यांचे कार्य आपल्या डोळ्यासमोर ठेवून या  पुढे सर्वांनी चालवावे आणि नातेपुते गावाला जी भाऊंच्या जाण्यामुळे पोकळी निर्माण झाली आहे ती भरुन काढण्यासाठी सर्वांनी काम करावे हीच आदरणीय भाऊंना श्रद्धांजली ठरणार आहे.
पिसाळ (देशमुख ) परिवाराचे , विशेषतः आमच्या  वडिलांचे व पाटील घराण्याचे नाते हे कौटुंबिक होते. 
पिसाळ (देशमुख )परिवार हा पाटील परिवाराच्या दुःखात सहभागी आहे.
विजय पिसाळ नातेपुते.

गुरुवार, ११ जानेवारी, २०२४

परमेश्वराचे अस्तित्व !

चालू घडामोडींचे विश्लेषण
परमेश्वराचे अस्तित्व कुणीही नाकारु शकत नाही. आम्ही धार्मिक हिंदू तर  इथल्या मुक्या  प्राण्यामध्ये, अगदी कासव , नाग , गाई ,उंदीर , यातही परमेश्वराला पाहतो , कारण जे मानवासाठी ,सृष्टीसाठी उपयुक्त आहे ते ते आम्ही परमेश्वराचा अंश म्हणून स्वाकरले आहे. प्रत्येक गोष्ट निसर्गाने निर्माण करताना एकमेकांना पुरक निर्माण केली आहे व त्यामुळेच मानव जातीचे अस्तित्व टिकून आहे. प्रत्येक गोष्टीत हिंदू धर्म देवाला पाहतो कारण त्याचा उद्देश त्यांचे संवर्धन करणे हाच आहे. म्हणून  निसर्ग ही सुद्धा  आमची देवता आहे .
इथल्या  नद्यांमध्ये , इथल्या निसर्गामध्ये , इथल्या पानाफुलात , इथल्या संपूर्ण चराचरात परमेश्वराला आम्ही  पाहतो. 
तसेतर  मनशांतीसाठी आम्ही धार्मिक हिंदू  उपासना स्थळांची  म्हणजेच मंदिरांची निर्मिती  करतो. काबाडकष्ट करुन थकल्यानंतर  कुठेतरी मनावरील ताणतणाव दुर व्हायला हवा , कुठेतरी कष्टाचा क्षीण कमी व्हायला हवा ही त्यामागची कल्पना असते मनुष्याने नीट वागावे, बंधुभाव जपावा ,म्हणून असंख्य धर्मग्रंथाची संत सज्जनांनी निर्मिती केली,  त्याचीच पारायने अशा ठिकाणी व्हावीत व चांगले काय ?वाईट काय हे सामान्य बुद्धीच्या लोकांना समजावे ,  असंख्य ऋषीमुनींनी  तपश्चर्या केली ती , कशासाठी होती ?  तर शांत डोक्याने मानवी कल्याणासाठी दिशादर्शक काही  लिहावे म्हणजे मनुष्य प्राण्याचे वर्तन हे सदाचारी राहिल आणि त्याला आपल्या कर्तव्यांची,नात्यांची , व्यव्हारीकतेची जाणीव होईल ,त्यामुळे मनुष्य हा राग ,लोभ ,मत्सर , वासना यापासून दुर राहिल आणि त्याला जीवन जगताना स्वतःची उच्च मुल्य जपता येतील हे  ऋषीमुनींच्या उपासनेचे व तपस्येचे मुख्य कारण असले पाहिजे. रामायण महाभारत , हे ग्रंथ तुम्हाला सदाचारी व दुराचारी, धर्म आणि अधर्म यातील अंतर दाखवतात . एखादे उपासना केंद्र कसे असावे त्याचे एक छानसे उदाहरण आमच्या पासून जवळच श्री क्षेत्र गोंदवले या ठिकाणी पहायला मिळते,तिथे तुम्हाला राहण्याची , ध्यान धारणा करण्याची , दोन वेळ जेवणाची व्यवस्था मोफत केली आहे. कुठेही पैसे मागितले जात नाहीत किंवा पावती फाडावी म्हणून गळ घातली जात नाही .कित्येक भाविक सेवेसाठी रात्रंदिवस झटत असतात. आणि तिथल्या अन्नछत्रामध्ये दोन वेळेला लोक महाप्रसादाचा लाभ घेतात व हे निस्वार्थी काम पाहून शेकडो भाविक , गोंदवलेकर महाराजांचे चरणी नतमस्तक होऊन, कुणी डाळ,कुणी तेल,कुणी तांदूळ, कुणी गुळ ,कुणी भाजीपाला तर कुणी रोख पावती फाडतात पण तिथे त्या ट्रस्ट कडून कधीही काहीही मागितले जात नाही, सगळे स्वेच्छेने दिले जात. या मिळालेल्या दानातून हॉस्पिटल व इतर कित्येक उपक्रम हे सेवाभाव म्हणून राबवले जातात इथे बंधू भाव जपला जातो,  सगळ्या भक्तांना वागणूक समान असते, गोंदवलेकर महाराज यांनी प्रभु श्रीरामाची भक्ती सांगितली होती व भक्ती म्हणजे काय तर रामा सारखे तुमचे वर्तन असावे व तसे वर्तन सतत  घडत रहावे म्हणून रामाचे नामस्मरण करावे हा साधा उपाय  गोंदवलेकर महाराजांनी सांगितला आणि बिघडलेले महाभाग सुद्धा सुधारले .यावरून उपासना केंद्र कशासाठी असावीत व उद्देश काय असावा हे समजून येते. पण ....
हिंदूंची असंख्य उपासना केंद्र आज मुळ उद्देशापासून दुर गेलेली सुद्धा दिसून येतात , इथल्या काही बाजारु  लोकांनी धार्मिकतेला  फाटा दिला आणि भोळ्या भाबड्या हिंदू समाजाला अंधश्रद्धेत गुंतवून त्याचे आर्थिक शोषण तर केलेच पण मानसिक गुलाम सुद्धा केले, आणि मानसिक गुलाम झालेले कितीही उच्चशिक्षित असले तरी , ज्यांची कोणतीही कुवत नाही अशा लोकांच्या चरणी नतमस्तक होतात. मानसिक गुलामगिरी मुळे अमुक पुजेसाठी,तमुक अभिषेकासाठी हजारो रुपये उकळले जातात  , देवाला प्रसन्न करण्यासाठी सोने ,नाणे ,हिरे ,माणिक ,मोती व प्रचंड दान करायला भाग पाडतात , मुळात कोणत्याही देवाला यातील काही लागत नाही.  जो कोणी परमेश्वराची पूजा करेल , तिथे स्वच्छता,साफसफाई करेल त्याला त्याचे पोट चालावे,त्याचा प्रपंच चालावा म्हणून निश्चित चार पैसे मिळाले पाहिजेत, अगदी पगार सुद्धा दिला पाहिजे पण , भोळ्या भाबड्या लोकांना हजारो रुपयांचे दर्शन पास किंवा व्हीआयपी वागणूक देण्यासाठी पैसे घेणे हा धर्म नसून अधर्म आहे.  आणि यामुळेच आज  धार्मिक हिंदू दुखावला जातोय  ! 
आणि दुसरी गोष्ट  राजकीय हिंदूंनी मतांसाठी, सत्तेसाठी व सत्तेतून मिळणाऱ्या मलिद्यासाठी धर्मात राजकारण घुसवले आहे , धर्माला राजकीय रंग दिला आहे. पक्षाचा व स्वतःच्या स्वार्थी विचारांचा प्रचार व प्रसार देवाच्या व धर्माच्या नावाने सुरु आहे  यामुळेच धार्मिक हिंदू व राजकीय हिंदू अशी स्पष्ट रेषा तुम्हाला दिसून येईल ,   धर्मात आपआपसात गैरसमज व   वादविवाद होत आहेत. सत्तेसाठी धर्माचा वापर बंद होईल तेंव्हाच खऱ्या अर्थाने इथल्या हिंदू धर्माची शिकवण तुमच्या मनात रुजेल इतकेच!
©®विजय पिसाळ नातेपुते.