vijaypisal49. blogspot. com

बुधवार, १० जून, २०२०

संगत

चालू घडामोडींचे विश्लेषण




संगत. . . ! 
मनुष्य हा अनादी काळापासून आजपर्यंत  समुहाने राहणारा , संघटीत काम करणारा, सहजीवन जगणारा  प्राणी आहे .  सहाजिकच प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या गरिब, श्रीमंत, सुशिक्षित किंवा अडाणी अशा कोणत्याही  व्यक्तीला कोणाची ना कोणाची संगत असल्या शिवाय जीवन जगताच येत नाही .  किंबहुना संगत नसेल तर त्याला मनुष्य जन्मात फारसी किंमत नसते . नव्हे त्याला जगणेच कठिण असते , खरेतर  ज्याच्या संगतीला कुणीच नसते त्याला या समाजातील  लोक, एकलकोंडा , वेडा , मनोरुग्ण अशी शेलकी विशेषणे लावतात. 
तसेही कुणी व्यक्त होतो तर कुणी अव्यक्त होतो पण तरीदेखील संगत सर्वांना हवीच असते व असायलाही पाहिजे . जीवनातील सुख दुःख शेअर करण्यासाठी , आनंद व्यक्त करण्यासाठी , कामातील ताणतणाव दुर करण्यासाठी , मन मोकळे करण्यासाठी ,  कठीण प्रसंगात धीर मिळण्यासाठी संगत आवश्यक ठरतेच, त्या शिवाय मनुष्याला जीवन जगताही येत नाही . 
संगत कुणाची करावी हे प्रत्येकाच्या स्वभाव गुणावर अवलंबून असते .  दोन टोकाची मते असणारे लोक फारकाळ एकत्र राहतीलच असेही नाही . खरेतर   प्रथम दर्शनी   शक्यतो बहुतेक लोक संगत करताना , जात धर्म, लिंग, भाषा  काही पहात नाहीत , जिथे आपले कुणी ऐकून घेते तिथेच संगत केली जाते किंवा ति आपोआप होते हे खरे  व हे अगदी नैसर्गिक होत असते .  जसे शाळेत  मुलांना घातले की , खोडकर मुलांचा एक ग्रुप बनतो, हुशार मुलांचा वेगळाच ग्रुप बनतो , खेळाडूंचा , कलाकारांचा , असे वेगवेगळे ग्रुप होतात व संगतीचा प्रवास चालू होतो . तसेच मोठेपणीही डॉक्टरांचा एक ग्रुप, वकिलांचा , शिक्षकांचा , व्यापार्यांचा , शेतर्यांचा असे ग्रुप बनतात, नाती गोती काहीच नसताना समान उद्देशानेही लोक एकत्र येतात व संगत घडते , 
तसेतर  लहाणपणी मनुष्याचे  मन हे कोरीपाटी असते त्यामुळे कोणताही भेदभाव न करता संगत घडते , कोवळ्या  मनात  द्वेषाची भावना कधीच येत नाही .  पण  वय वाढेल तसे शाळेतील संगतीचे रुपांतर जेंव्हा चांगल्या संगतीत होते तेंव्हा मनुष्य घडतो मग तो  व्यवसाय, नोकरी , शिक्षण अशा सर्वच क्षेत्रात यशस्वी होतो . खरेतर संगत माणसाला घडवते किंवा बिघडवते सुद्धा ,  ज्यांना चांगली संगत लाभली  ते घडतात व प्रगती करतात, मात्र ज्यांना संगत चांगली लाभलेली नसते ते चैन करतात, मग कधी तंबाखू , गुटखा , सिगारेट पिता पिता दारूच्याही आहारी जातात.  त्यामुळे त्यांचे विचार, राहणीमान जशी संगत आहे तसेच असते . मोठ मोठ्या घरचीही मुले वाया जातात,  जगात अशी खूप उदाहरणे आहेत, कि एक दारूडा कित्येक लोकांना त्रास देतो . तो कुणाचा तरी संगतीमुळेच दारू प्यायला लागलेला असतो ना ? 
 त्याने दारू सोडावी म्हणून देव पाण्यात घातले तरीदेखील दारू तो सोडू शकत नाही .  पण तोच मनुष्य एखाद्या चांगल्या सद्गूनी  व्यक्तीच्या संपर्कात आला तर क्षणातही त्याची दारू सुटू शकते .  तसेच जर पाच दहा दारूडे असतील तर निर्व्यसनी  सुद्धा संगतीचा परिणाम होऊन व्यसनी बनतो . दारू पिऊन बरबाद होऊ शकतो . 
  म्हणून वाटते प्रत्येकाच्या  जीवनाचा पाया हा बर्याच अंशी संगतीवर अवलंबून असतो . कित्येक हुशार लोक सुद्धा  वाईट  संगतीमुळे वाया जातात व चांगली संगत लाभली तर एखाद्या झोपडपट्टीतही व्यसनी दारीद्रिय असलेल्या घरातही  हिरे जन्माला येतात.  
संगतीमुळे मनुष्याचा स्वभाव बदलतो, भाषा बदलते , राहणीमान बदलते ,  संगतीमुळे मनुष्याचे वागणे बदलते , संगतीमुळे मनुष्य गैरमार्गालाही लागू शकतो ,  संगतीमुळे मनुष्य चांगलाही प्रपंच करू  लागतो व संगतीमुळे मनुष्य फार प्रगती सुद्धा करतो . हिर्यांची किंमत कितीही असली तरीदेखील त्याला घडवल्या शिवाय मुल्य प्राप्त होत नाही . व त्याचा दागिना बनवायचा असेल तर दुसऱ्या धातूची मदत घ्यावीच लागते व तो धातू सुद्धा मौल्यवान असावा लागतो .  तरच तो हिरा उठून दिसतो .  नुसता हिरा मौल्यवान असून चालत नाही . 
तात्पर्य काय?  
तुम्हाला घडायचे असेल तर तुम्ही कोणाच्या संगतीत राहता , वाढता , उठता , बसता , यावरच तुमची भविष्यातील वाटचाल अवलंबून असते . 
संगत चांगली करा , तुम्हाला चांगल्या संधी नक्कीच मिळतील! 
विजय पिसाळ नातेपुते !



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा