vijaypisal49. blogspot. com

मंगळवार, ३० सप्टेंबर, २०२५

ओला दुष्काळ कि, मानवी चुका

 

महाराष्ट्रातल्या भीषण महापुराचे व्हिडिओ व फोटो सर्वांनी पाहिलेले आहेत.  समाज माध्यमातून असंख्य  रील्स आलेले आहेत. जनावरे,घरेदारे , नाले व खचलेले रस्ते ,शेतीचे  वाहून गेलेले बांध  जाताना पाहिले आहेत. 

सरकार, स्वयंसेवी संस्था व राजकीय नेते आणि जागृत जनतेकडून

मदत येईल, नुकसानभरपाई मिळेल , आयुष्य पुन्हा जगण्यासाठी सगळे पाठीशी उभे राहतील. पण 

महत्वाच्या प्रश्नांची सोडवणूक आपल्याला   सर्वांना मिळून करावी लागणार आहे. संकट नैसर्गिक आहे. मोठे आहे पण याचे स्वरुप इतके मोठे का झाले याचाही विचार आपल्याला करावा लागेल! 

 आपले पुर्वज शेती करत असताना शेती मुबलक होती त्यामुळे 

शेतामध्ये पुर्वीपासून अस्तित्वात असलेले प्रवाह , छोट्या चारी, छोटे ओढे , ओहोळ, मोठे ओढे , पाणंद , नाले असे पावसाचे पाणी वाहून जाणारे मार्ग  होते .  जमिनीची वाटणी होत गेल्यामुळे जमिनीचा इंच इंच तुकडा वाढवण्यासाठी आपण सर्वांनी नैसर्गिक प्रवाह जवळपास बंद केले , मातीचे , दगडाचे भराव टाकले , काही ठिकाणी तर नदीत ओढ्यात विहिरी खोदल्या व त्याचे मटेरियल नदीपात्राच्या कढेलाच टाकले त्यामुळे नाले, ओढे नदीपात्र अगदी बारीक झाले बुजवले बुजवले गेले, अतिक्रमण वाढत गेल्यामुळे मागिल तीस चाळीस वर्षात जे पाझर तलाव , नाला बंडिगची कामे  रोजगार हमी मधून झालेली होती ते पाझर तलाव छोटे होत गेले.  हवामान बदलामुळे , प्रचंड वृक्षतोड झाल्यामुळे, कारखाने आणि वाहनांच्या प्रदुषणामुळे  पावसाने मर्यादा ओलांडली सहाजिकच कमी वेळात जास्त पाऊस झाल्यामुळे ते पाणी पुढे सरकण्याकडे वाट शोधत असताना जे जे आढवे येईल त्याला गिळंकृत करत होते,ते पुर्वीच्या नैसर्गिक वाटा शोधत होते पण त्याला वाट मिळाली नाही ,म्हणून ते खूप  शेतात घुसले जर अतिक्रमण झाले नसते तर कदाचित नुकसान कमी झाले असते. शासनाने पाणी आढवण्यासाठी ,पाणी साठवण्यासाठी खूप बंधारे बांधले आणि नैसर्गिक प्रवाह आडवले गेले परिणामी पाण्याला नवी वाट शोधावी लागली.  मानवाने बरेच नैसर्गिक प्रवाह बंद केल्यामुळे पाण्यालाही मार्ग सापडणे महाकठीण झाले.  कदाचित  अतिक्रमणे झाली नसती तर  इतके भयंकर नुकसान झाले नसते.  

प्रत्येक गावाचा , शहराचा विचार जेंव्हा आपण करतो तेंव्हा आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते प्रत्येक ठिकाणी सरकारी ओढे व नाले जमिनीवर झोपडपट्टी सारखी घरे ही अतिक्रमण करुनच बांधली गेलीत ,सरकारनेही त्या ठिकाणी घरकुले दिली  ,वीज पाणी रस्ते दिले व हे करताना अतिक्रमण वाढत गेले, सिमेंट कॉक्रिंटचे प्रचंड काम झाले.

शहरातल्या अतिक्रमणांनी तर सर्व मर्यादा ओलांडल्या कित्येक शहरात नदीपात्रात खूप मोठे अतिक्रमण झाले आहे. 

मोठ मोठे  भराव टाकून टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या बिल्डर लॉबी श्रीमंत झाली पण बेकायदेशीर बांधकामे होऊन  संकट मात्र सर्वांच्या पाचवीला पुजले गेले. अगदी  रस्त्याच्या कडेला व्यवसाय व्हावा म्हणून  जागा आहेत अशा लोकांनी पुढे पुढे येऊन अतिक्रमण करून दुकाने , टपरी, शेड टाकले नैसर्गीक ओढे बुजवून जागा केल्या

सरकारी ओढा ,नदी , नाला या ठिकाणी 

मोकळी जागा दिसली कि ,पुढारी लोकांनी ,सरकारी बाबुंना हाताशी धरत  कॉंक्रीट टाकायचे  व अतिक्रमण करायचं किंवा पेव्हर ब्लॉक टाकायचे. 

जुने ओढे / नाले बुजवायचे किंवा त्यावर कॉंक्रीट स्लॅब टाकून झाकून झोपड्या, टपऱ्या टाकायच्या  छोट्या नद्यांचे अस्तित्व दिसणारच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जुनी पाडलेली घरं ,माळवदं यातून निघालेले सगळे मटेरियल नदीकडेला , ओढ्याच्या पात्रात टाकायचे , अजून एक गोष्ट  नदीकडेला व ओढ्याकडेला वेडी बाभळ , चिल्लर, काटेरी झाडी, वाढत गेली आहे ,त्यामुळेही नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण झाला आहे.

मानवी चुका आणि नैसर्गिक प्रवाहाकडे दुर्लक्ष यामुळेच या पावसाने या ओढे, नाले, नद्यांनी आपली मूळ पात्र शोधली आणि वाहत्या झाल्या. 

पाण्याची  ताकद इतकी मोठी असते की, ती ताकद  मार्गात येणार सगळं वाहून नेत उध्वस्त करून पुढे जात राहिली.  सरकार कोणतेही असो.

सरकारच्या पातळीवर रस्त्यांची कामे करताना दहा पंधरा फुट उंचीचे रस्ते , उड्डाण पुलाचे भराव करून शेकडो किलोमीटर पाण्याचे नैसर्गिक प्रवाह अडवून सगळ्या व्यवस्थेची मोडतोड झालेली आहे हे समृद्धी महामार्गाने आणि सगळ्याच उन्नत राष्ट्रीय  महामार्गांनी दाखवून दिलेलं आहे.  विकासाची कामे करत असताना  झाडांची कत्तल करून अशास्त्रीय पद्धतीने रस्ते बांधणी करून विनाशाला जवळ करत आहोत हे कोणते  सरकार मान्य करणार आहे व  चुक दुरुस्त करुन यापुढे रस्ते बांधणी होणार  आहे का ? 

खरेतर मानवी चुकीमुळेच पर्यावरणाचा ऱ्हास होतोय या

पर्यावरण बदलाचा परिणाम निसर्ग चक्रावर होत  आहे आणि त्याच्यापुढे कुणाचीही संपत्ती, राजकीय पक्षाची ताकद ,सरकारच्या यंत्रणा कुचकामी ठरत  आहेत हेही आता सर्वांना दिसून  आलेलं आहे. आज काही लोकांचा भ्रम असेल आपली जमिन  घरं , शहरं  उंचावर आहेत, आपल्या जवळपास नद्या किंवा मोठे ओढे नाहीत म्हणून  आपण सुरक्षित आहोत हा त्यांचा समज भविष्यात खोटा ठरवणार आहे? आज महापूर आहे , उद्या महाभयंकर वादळं आपल्या दारावर ,शहरावर घोंगावत येणार नाही कशावरून? ढगफुटी कुठेही कधीही होऊ शकते , संतुलन बिघडले तर निसर्ग दया माया दाखवत नाही..या  नैसर्गिक आपत्ती मधून  आपण काही धडा घेणार आहोत  का ?

पावसाचे पडणारे पाणी मुरण्यासाठी बिगर कॉंक्रीटची जागा मोकळी ठेवणार का ? मोकळी मैदाने ,  झाडे  जोपासून , नदी नाले ओढे स्वच्छ करुन अतिक्रमण हटवून   नुकसान कसे टाळता येईल याची काळजी घेणार आहोत  का ? 

 नदीकडेच्या ,ओढ्या कडेच्या 

शेताची ,घरांची दुरुस्ती  करताना परत असा  निसर्गाचा प्रकोप झाला तर नुकसान होणार नाही अशा काही रेषा आखूनच बांधकाम करणार आहोत का? तुम्ही जर निसर्गाची छेड काढली तर निसर्ग तुम्हाला कोणत्याही कोर्टात सुनावणीची संधी देणार नाही व  अंतिम तुम्हाला शिक्षा मिळणारच . 

सरकार कुणाचेही असले तरी होणारी अतिक्रमणे मतांसाठी दुर्लक्षित करायची , त्यातून घरे भरायची ,आपल्या दादा ,भाईंना जोपासायचं , हे कितपत योग्य आहे? संरक्षण द्यायचं अगदी हप्ते वसूल करायचे, गाव गुंड व मवाली गुटखा, दारु ,मटका बहाद्दर कार्यकर्ते सांभाळायचे हे  कथित नेत्यांचं  धोरण असत. 

 ना विकासाचं  धोरण ना भविष्याचं व्हिजन फक्त पैसा आणि राजकारण हेच आजचं वास्तव झालंय..

पण आपण सामान्य लोक यात भरडले जातोय, आपला जीव चाललाय हेच सुज्ञ लोकांना कळत नाही.

आता यापुढे सतत  अनियमित वादळे , गारपीट , बेमोसमी पाऊस याची भीती राहणार आहे तर किती वेळा तुम्ही नव्याने डाव मांडणार आहात आणि तुमची शारीरिक , आर्थिक क्षमता असणार आहे ? 

या प्रश्नांची उत्तर गावगाड्यातील सुज युवकांनी शोधली पाहिजे प्रत्येकाने व्यक्तिगत आणि सामूहिकरीत्या  आता अतिक्रमणा विरुद्ध आवाज होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, 

परत परत  तिच नैसर्गिक आपत्ती तीच  दृश्य, रडवेले चेहरे, तेच रील्स आणि त्याच मदतीच्या याचना ठरलेल्या आहेत. 

निसर्गाने खूप मोठा धडा शिकवला आहे . त्यातून आपण काय बोध घेणार   आहोत?

विजय पिसाळ, नातेपुते..

#ओला_दुष्काळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा