vijaypisal49. blogspot. com

मंगळवार, २० फेब्रुवारी, २०२४

समाजरत्न मा.श्री.कै.राजेंद्र (भाऊ) पाटील

चालू घडामोडींचे विश्लेषण
नातेपुते गावच्या राजकीय पटलावरील एक तारा हरपला  !

नातेपुते व पंचक्रोशीत ज्यांचे नाव आदराने घेतले जात होते. ज्यांचा नातेपुते गावात शांतता व सलोखा राहण्यात महत्वाचा सहभाग होता आणि ज्यांना घराण्याचा मोठा वारसा लाभून सुद्धा कोणताही गर्व नव्हता , सर्वांना ते भाऊ म्हणून परिचित होते असे नातेपुते गावचे आदरणीय व्यक्तिमत्व समाजरत्न कै.राजेंद्र (भाऊ) पांढरे पाटील यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आणि नातेपुते गावातील गोरगरीबांचा आधार हरपला , कोणताही गोरगरीब दारात गेला आणि त्याला भाऊंनी मोकळ्या हाताने कधी पाठवले असे झाले नाही. गोरगरीबांचे लग्न असो की अजून कोणतीही अडचण असो लोक भाऊंकडे जायचे आणि भाऊ त्यांना वडिलकीच्या नात्याने जवळ करायचे , चार चांगल्या गोष्टी सांगायचे व अडचण दुर करायचे ,भाऊंनी आपला परका असा भेदभाव केला नाही. महादेवाची यात्रा असो की , नातेपुते गावातील कुस्त्यांचा फड असो की , बेंदराचा सण असो भाऊंचा सक्रिय सहभाग असायचा व भाऊंचा शब्द कुणीही मोडत नव्हते .भाऊंनी देशी गोवंशावर निस्सिम प्रेम केले , जातीवंत खिल्लार गाई बैलांचा खूप आपुलकीने सांभाळ केला , लांबून लांबून जातीवंत खिल्लार खोंड आणुन नातेपुते परिसरातील गोरगरीब शेतकऱ्यांना ब्रिडिंगसाठी मदत केली. गोपालणातून भाऊंना फारसा आर्थिक लाभ नव्हता किंबहुना तोटाच होता पण शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे ही भावना त्यांच्या मनात सदैव असायची, नातेपुते विविध कार्यकारी सोसायटीचा कारभार भाऊंनी अतिशय काटकसने केला , शेतकऱ्यांना कर्ज देताना कधीच दुजाभाव केला नाही. सोसायटीच्या माध्यमातून  चालवले जाणारे स्वस्त धान्य दुकान व रॉकेल वितरण करताना गोरगरीबांना पुरवठा विभागातून आलेले धान्य पुर्ण वाटप केले आणि सगळ्यांचे आशीर्वाद घेतले , कधीच कुणाला धान्य संपले आहे असे म्हणून माघारी पाठवले नाही. गावात जर कुठे वादविवाद झाला तंटा झाला तर लोक भाऊंकडे न्याय मागण्यासाठी जात असत  व भाऊ जवळचा परका असा कोणताही विचार न करता न्यायनिवाडा करत असत  , सगळ्या लोकांचे समाधान भाऊ करत असत . भाऊंवर हजारो लोक प्रेम करायचे ते केवळ त्यांच्या सरळमार्गी स्वभावामुळे , त्यांनी समाजकारण व राजकारण करताना अनेकांना संधी दिली  कुरघोडीचे राजकारण केले नाही, दिलेला शब्द कधी मोडला नाही . त्यांनी ज्यांना संधी दिली ती माणसे खूप मोठी झाली  आणि त्या माणसांनीही भाऊंचे नाव वेळोवेळी घेतले, नातेपुते गावचे खेळीमेळीचे राजकारण रहावे म्हणून भाऊंनी जे काम केले ते पुढच्या पिढीसाठी आदर्श असेच आहे.
भाऊ जरी  शरीराने आपल्यात नसतील तरीदेखील त्यांचे विचार आणि त्यांचे कार्य आपल्या डोळ्यासमोर ठेवून या  पुढे सर्वांनी चालवावे आणि नातेपुते गावाला जी भाऊंच्या जाण्यामुळे पोकळी निर्माण झाली आहे ती भरुन काढण्यासाठी सर्वांनी काम करावे हीच आदरणीय भाऊंना श्रद्धांजली ठरणार आहे.
पिसाळ (देशमुख ) परिवाराचे , विशेषतः आमच्या  वडिलांचे व पाटील घराण्याचे नाते हे कौटुंबिक होते. 
पिसाळ (देशमुख )परिवार हा पाटील परिवाराच्या दुःखात सहभागी आहे.
विजय पिसाळ नातेपुते.