vijaypisal49. blogspot. com

रविवार, २८ ऑगस्ट, २०२२

आरक्षण तिढा आणि पर्याय !

चालू घडामोडींचे विश्लेषण

आरक्षण ! आरक्षण !! आरक्षण !!!  हा तिढा कायमचा सुटू शकतो !

भारत देशात हजारो जाती आहेत आणि त्यांची घटनेनुसार विभागणी ही , सर्वसाधारण , ओबीसी, एस सी आणि एसटी या चार गटात झाली आहे. हे ध्यानात घेता  या चा गटांची प्रत्येक ,राज्यात स्वतंत्र  जातनिहाय जनगणना का होत नाही ?  
जर जातनिहाय जनगणना झाली तर नियमानुसार सर्व चारही घटकांना लोकसंख्येच्या नियमानुसार  प्रतिनिधित्व देता येईल व   न्याय देणे सुसंगत होईल हे सरकार लक्षात का घेत नाही ?
 ओपन  गटात , ओबीसी गटात,  एससी गटात, व एसटी गटात जातींची संख्या किती याला काय  महत्व आहे ?
 या  चारही गटांची लोकसंख्या  हेच महत्वाचे आहे .  कारण आरक्षण टक्केवारी नुसार दिले जाते.
जर आरक्षण 50% पेक्षा जास्त देता येत नाही .
50% हीच  जर लक्ष्मण रेषा कायम केलीच आहे तर जातनिहाय प्रत्येक राज्यात स्वतंत्र जनगणना करा व चारही गटांची लोकसंख्या निश्चित करा,  अडचण काय आहे?
जर लोकसंख्या निश्चित झाली तर एससी व एसटी यांना  घटनेतील तरतूदी नुसार  त्यांच्या  लोकसंख्येच्या 100% जागा राखीव ठेवता येतील।
 म्हणजे समजा एसी व एसटी यांची लोकसंख्या ही  22.5 %असेल  तर 22.5 % इतक्या जागा राखीव ठेवता येतील आणि उर्वरित 77.5%  मध्ये  ओपन व ओबीसी यांची लोकसंख्या निश्चित करुन  आरक्षित जागा निश्चित करता येतील .  समजा ओबीसीं मधील  एकूण जातींची लोकसंख्या  30%  असेल तर त्यांना 15% जागा राखीव ठेवता येतील  ,समजा ओबीसी सर्व जातींची मिळून  एकूण लोकसंख्या 40 % असेल तर त्यांना   20% राखीव जागा ठेवता येतील, जर ओबीसीं जातींची  लोकसंख्या 60% असेल  तर त्यांना  30% जागा राखीव ठेवता येतील . 
पण महाराष्ट्रात व इतर बर्याच राज्यात सुध्दा  कोणतीही जनगणना  झाली नाही आणि आरक्षण मात्र विविध जातींना  दिले गेले आहे .विशेष म्हणजे बर्याच जातींना कोणताही मागासवर्ग आयोग गठित न करता आरक्षण दिले गेले आहे . संबंधित जातींचे मागासलेपण सिध्द न करता आरक्षण वाटले आहे . हा ओपन जातीतील लोकांवर अन्याय नाही का ?  कोणाच्याही आरक्षणाला विरोध नाही पण नियम आणि कायदे सर्व जाती घटकांना समान अाहेत ,म्हणून घटनेतील तरतूदी नुसार व कोर्टाने जे सांगितले आहे त्या नुसार लोकसंख्येच्या 50%  आरक्षण दिले पाहिजे. आणि मागासलेपण सिध्द करुनच ते दिले पाहिजे. 
पण यावर  महाराष्ट्रातील कोणताही राजकीय नेता ,सत्ताधारी किंवा विरोधक  आणि ओपन समाजातील प्रत्येक जातींचे नेते जातनिहाय जनगणना झाली पाहिजे हे ठामपणे का बोलत नाहीत. जातनिहाय जनगणना झाली तर आणि तरच आरक्षित वर्गांची लोकसंख्या निश्चित होईल आणि त्यांना त्यांचा घटनेनुसार वाटा निश्चित करुन  ,सर्व गटांच्या लोकसंख्येच्या टक्केवारी नुसार त्यांच्या सामाजिक कल्याणाच्या योजना , निधीची तरतूद  व आरक्षणाची टक्केवारी निश्चित करता येईल. 
म्हणून सर्वच लोकांनी सरकार कडे जातनिहाय जनगणनेचा आग्रह धरावा आणि सरकारवर या साठीच प्रेशर आणावा तरच आरक्षणाचे प्रश्न निकाली निघतील अन्यथा हे भिजत घोंगडे कायम त्रासदायक ठरणार व पुन्हा पुन्हा आंदोलने होत राहणार.
विजय पिसाळ .नातेपुते.

शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०२२

काय ती झाडी ! काय ते डोंगर !!!

शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०२२

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव !!


चालू घडामोडींचे विश्लेषण


*स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव !*
भारताला स्वातंत्र्य मिळून येत्या 15 ऑगस्टला 75 वर्ष होत आहेत . 

*महात्मा गांधींजींच्या आंदोलनाने, सुखदेव, भगतसिंग, राजगुरू यांच्या बलिदानाने , सुभाषचंद्र बोस,  यांच्या जहाल विचारांनी आणि हजारो भारतीयांच्या बलिदानाने  आपल्या भारताच्या  स्वातंत्र्याची मशाल पेटली* लोकमान्य टिळक ते महात्मा गांधी हा स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास फार मोठा आहे . तत्कालीन काँग्रेसने व काँग्रेसच्या नेतृत्वाने  अहिंसेच्या मार्गाने जी चळवळ उभारली ती चळवळ जगाच्या इतिहासातील एक सुवर्ण पान आहे.
 लाखो भारतीयांनी गांधीजींच्या नेतृत्वात इंग्रज सरकार विरुद्ध   असहकार  ,भारत छोडो , परदेशी मालावर बहिष्कार  चलेजाव  अशा विविध आंदोलनात भाग घेऊन इंग्रज सरकार विरुद्ध रणसिंग फुंकले . 
इथल्या लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी जुलमी  इंग्रज सरकारचा लाठीमार सहन केला, कित्येकांना तुरुंगवास भोगावा लागला , मागे वळून पाहताना आपल्याला फक्त सावरकरांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली हे माहित आहे पण त्या बरोबरच हजारो भारतीयांनी  काळ्या पाण्याची शिक्षा भोगली हे आंदमानातील सेल्युलर जेलच्या दप्तरात निश्चितपणे पहायला मिळते , कित्येकांनी  हालअपेष्टा सहन केल्या जणू घरावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्य संग्रामात स्वतःला झोकून दिले , 
इंग्रज सरकारचा निषेध करण्यासाठी एकत्र जमलेल्या शेकडो नागरिकांवर 
जालियनवाला बागेत जनरल डायरने केलेल्या गोळीबार केला व  शेकडो निरापराध भारतीयांना भारतमातेसाठी प्राणांची आहुती द्यावी लागली .  हे आपण इतिहासात वाचले आहे , जुलमी इंग्रज सरकारने तेंव्हा  मिठावर  सुद्धा कर लावला  गरिबांना मीठही  खायला  महाग घ्यावे लागेल म्हणून मिठावरील कर रद्द करण्यासाठी महात्मा गांधी यांनी पोरबंदर ते दांडी यात्रा काढली  आणि मुठभर मीठ उचलून इंग्रजी सत्तेचा पाया कमकुवत करुन  टाकला .   हे अहिंसेचे यश आहे.  कित्येक लोकांना सावरकरांनी सुटकेसाठी लिहलेली  माफी पत्रे  पटत नाहीत पण जुलमी  इंग्रज सरकार विरुद्धचा लढा बुद्धीच्या बळावर दिला पाहिजे कारण आपण तुरुंगात खितपत पडून स्वातंत्र्य चळवळ पुढे कशी जाणार हाही विचार असला पाहिजे,    भारतीयांनी
स्वातंत्र्याचा लढा सर्व ,जाती,धर्मातील, लोकांनी  एकजुटीने  लढला आणि भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले . स्वातंत्र्य   फुकट मिळाले नाही !
 म्हणून स्वातंत्र्य कसे मिळाले याची आपण पुर्णपणे उजळणी केल्या शिवाय ,स्वातंत्र्याचे महत्व आपल्याला समजत नाही किंवा पारतंत्र्य काय होते हेही लक्षात येत नाही. स्वातंत्र्य समर इतके मोठे आहे की हजारो पाने लिहिली तरीदेखील कमी पडतील .
15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले पण भारताने कोणत्या दिशेने जायचे आहे हे ठरवले  नव्हते कारण स्वातंत्र्य मिळत असतानाच इंग्रजांनी फोडा व राज्य करा नीतीचा अवलंब केल्याने  अखंड भारताती फाळणी  होऊन व धर्माच्या अधारावर पाकिस्तानाची निर्मिती झाली पण महात्मा गांधी , पंडित नेहरू यांच्यामुळे भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनला ,इथे हिंदु ,मुस्लिम, शिख ,इसाई ,बौद्ध असे सगळे जण आपण भारतीय म्हणून स्वतंत्र भारतात गुण्या गोविंदाने एकत्र नांदु लागलो.
म्हणून तर आपल्या भारताला आपण।  "सारे जहाँ से अच्छा हिंदोस्था   हमारा "    असे म्हणतो .
15 ऑगस्ट 1947 पर्यंत इंग्रजांनी भारताची पुर्णपणे लुट केली होती ,  भारत हा केवळ  इंग्रजांच्या पारतंत्र्यात खितपत पडलेला देश होता .
 इंग्रजाच्या लुटीमुळे  आपला देश तेंव्हा खूप मागे  पडला होता .   भारताला 1947 नंतर शुन्यातून नव्याने सुरवात करावी लागली .
पण भारताने
स्वातंत्र्या नंतर आपल्या प्रगतीची हळूहळू सुरुवात केली , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 जानेवारी 1949 ला मजबूत संविधान दिले , कार्यकारी मंडळ ,कायदेमंडळ, न्यायपालिका आणि स्वतंत्र निवडनुक आयोग या स्वतंत्र संविधानिक यंत्रणा   मिळाल्या व भारताची लोकशाही मजबूत होऊ लागली. भारताने 1947 ते 2022 या 75 वर्षात शुन्यातून जणू  विश्व निर्माण केले ,इस्त्रो , भाभा अणुशक्ती केंद्र, एम्स ,अशा जागतिक दर्जाच्या संस्था निर्माण केल्या ,  संशोधन केंद्र उभारली  शेकडो किलोमीटरचे रस्ते , संपूर्ण देशात वीज , पाणी  रस्ते या गरजा पुर्ण करतानाच शिक्षणाची  व्यवस्था केली ,  जल विद्यूत केंद्र, औष्णिक विद्युत केंद्र, शेकडो रेल्वे स्टेशन आणि भारतभर रेल्वेचे जाळे निर्माण केले ,  राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानतळांची निर्मिती केली , शेकडो धरणांची उभारणी केली व त्या  माध्यमातून शेतीला व शहरांना पाणीपुरवठा होऊ  ,माहिती तंत्रज्ञानाच्या बाबतीत स्वर्गीय राजीव गांधी यांनी यांनी योग्य पावले उचलल्यामुळे संगणकीय तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारताची जगात  ओळख निर्माण  झाली, माहिती व तंत्रज्ञान यात परिपूर्ण कौशल्य मिळवलेले मनुष्यबळ  संपूर्ण जगाला  पुरवण्याचे काम आपला देश करत आहे.  आपल्या देशाने हरितक्रांती केली व  आपल्या शेतकऱ्यांनी आपला देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केला .
आपल्या देशाची अन्नधान्याची  गरज भागून कोठ्यावधी डॉलरची  अन्नधान्य, फळे ,भाजीपाला निर्यात आपण करत आहोत. 
भारतातील अभियंते ,डॉक्टर, यांनी जागतिक स्थरावर आपल्या कामाचा  ठसा उमटवला आहे. इथल्या उद्योगपतींनी  व व्यापाऱ्यांनी देशाच्या प्रगतीला फार मोठा हातभार लावला आहे. 1947 पासून ते आत्तापर्यंतच्या सर्व  पंतप्रधानांचे ,राष्ट्रपतींचे व प्रत्येक राज्यातील सरकारांचे भारताच्या प्रगतीत खूप मोठे योगदान लाभले आहे. प्रत्येक सरकाने  एक एक वीट रचली व त्याला जनतेने साथ दिली  म्हणून  भारत राष्ट्राची मजबूत इमारत उभी राहिली .  भारत हा संशोधनात पुढे गेला आणि शस्त्र सज्ज राष्ट्र म्हणून उदयाला येत आहे. आपण यशस्वी अणुचाचणी करुन जगातील मोजक्या देशाच्या पंक्तित स्थान मिळवले आहे.
स्वातंत्र्या  नंतरच्या या 75 वर्षात भारताने चौफेर प्रगती साधली आहे .भारत प्रत्येक क्षेत्रात आज पुढे जाताना पाहून सर्वांना अभिमान वाटतो . माहिती तंत्रज्ञान , खेळ ,मनोरंजन ,शिक्षण ,आरोग्य , शेती सहकार या बाबतीत भारत जगाला मार्गदर्शक ठरलेला आहे.
 भारतीय पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून भारतीय महिलांनी  सुद्धा या देशाच्या प्रगतीला फार मोठा हातभार लावलेला आहे.  म्हणून तर इथल्या महिला ,परराष्ट्रमंत्री, अर्थमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती  या सर्वोच्च पदावर बसल्या !
 काश्मीर ते कन्याकुमारी ,  मुंबई ते कलकत्ता  हिमालय ते सह्याद्री ,  अशा आपल्या महाकाय देशात  विभिन्न चालीरीती , विभिन्न भाषा , विभिन्न संस्कृतीचे लोक एकत्र   राहतात व भारतीय म्हणून सगळे एकसंघ असतात .  प्लेगची साथ असो की पोलिओ निर्म्युलन असो ,कुपोषणाचा विषय  असो  की ,अलिकडच्या काळातील कोरोना महामारीचा विषय असो  आपण सगळ्यांनी प्रत्येक संकटांचा मुकाबला एकजुटीने केला आहे .   
देशावर वेळोवेळी येणाऱ्या संकटात आपले सैनिक, पोलिस, शास्त्रज्ञ ,  डॉक्टर , इंजिनिअर आपला जीव धोक्यात घालून काम करतात आणि त्यामुळे आपल्या एकजुटीने प्रत्येक राष्ट्रीय संकटावर आपण मात करतो . स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना आपल्या देशाने खूप प्रगती केली आहे तरीदेखील आपल्या पुढे काही आव्हाने सुद्धा  निश्चितपणे आहेत , आजही खूप मोठी जनता दारिद्र्यात जीवन जगत आहे ,वाढती लोकसंख्या यामुळे शहरावर भयंकर ताण पडत असून झोपडपट्ट्यांची स्थिती भयंकर आहे ,कित्येक मुला मुलींना आजही खराब रस्त्यांनी ,डोंगर दर्यातून    पायी चालत शाळेपर्यंत जावे लागत आहे . तरुणांच्या हाताला काम मिळणे कठीण झाले आहे. राजकीय नेते खोटी अश्वासने देऊन दिशाभूल करत असतात, आरक्षणाचे विषय नीट हाताळता आले नाहीत , जातनिहाय जनगणना नाही त्यामुळे , प्रत्येकाला न्याय  वाटा किती मिळाला पाहिजे हे समजत नाही .भ्रष्टाचार कमी होत नाही.   देश पोखरला जात आहे , गरिब व  श्रीमंत यात दरी वाढत आहे . काळ बदलला मात्र जाती धर्माच्या भिंती उलट गडद होत आहेत .  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतानाच  आपले शेतकरी बांधव आत्महत्या करत आहेत , यावर योग्य धोरणांची  ठोस कृतीची गरज आहे. सगळ्यांना सगळ्या क्षेत्रात  समान संधी  मिळत नाही. पर्यावरणाचा गजर आपण करतो पण सरकार कडक पावले उचलत नाही व 
 आपणही  भारताचे सजग नागरिक म्हणून प्लास्टिक बंदी स्वतःपासून करत नाही . प्रचंड वृक्षतोड होत आहे मात्र वृक्षसंवर्धन पाहिजे तेवढे होत नाही. स्वच्छता ,
कचरा व सांडपाणी यावर   आपल्याला भरपूर काम करावे लागेल .
खडोपाडी ,झोपडपट्टी परिसरात उघड्यावर शौचाला जाणारांची आजही लक्षणीय संख्या आहे. यापुढच्या काळात आपण सर्वांनी  यावरही सरकारच्या खांद्याला खांदा लावून काम करावे लागेल . आरोग्य दक्ष , व्यावसाय शिक्षण , सार्वजनिक स्वच्छता व स्वयंशिस्त यातून पुढची पिढी घडवावी लागेल . 

"जहाँ  डाल डाल पर सोने कि चिढिया करतीथी बसेरा, ओ भारत देश था मेरा"

असा भारत आपण सर्वांनी मिळून परत एकदा घडवायचा आहे .
चला चर मग स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करुया आणि सशक्त भारताला बलशाली बनवूया  !
वंदे मातरम् ! भारत माता की जय !
जय जवान ! जय किसान !! जय विज्ञान !
धन्यवाद !©® विजय पिसाळ नातेपुते !