मराठा आमदार व खासदार मराठा आरक्षणाच्या बाबतीत ठोस व खरी भुमिका का घेत नाहीत!
मुळात बहुसंख्य मराठा समाज खेड्यापाड्यात, ग्रामीण भागात व वाड्या वस्तीवर आणि दुर्गम भागात राहतो . शेती हेच मुख्य उपजीविकेचे साधन असल्यामुळे , शिक्षण, व्यापार, नोकर्या , आणि उद्योगधंदे यात मराठा समाज अत्यल्प आहे . मराठा समाजात भयंकर अंधश्रद्धा व रुढी परंपरा पाळल्या जातात. खेड्या पाड्यातील मराठा समाज हा ब्राह्मण समाजाचे जास्त ऐकतो , त्या नुसारच आचरण करतो . त्यामुळे मराठा समाजात देवभोळे पणा , करणी , शांती , या गोष्टीवर विश्वास ठेवला जातो . अशा परिस्थितीत जगणारा मराठा समाज बिलकुल जागृत नसतो . कारण त्याचे विश्व हे मर्यादित आहे . म्हणून बाहेरील जग सातत्याने मराठा समाजाचे शोषण करत आले आहे . यात सावकार, बँका , व्यापारी , यांनी तर मराठा समाजाला लुटले आहे . जो मराठा जास्त देवभोळा आहे . त्यालाही , नारायण नागबळी , ग्रहशांती , पुजा , अभिषेक यात अक्षरशः लुटले जाते . कारण बहुसंख्य मराठा याची कारण मिमांसा करत नाही . त्यामुळे संख्येने प्रचंड असूनसुद्धा काहीही साध्य न झालेला व आर्थिक मागास राहिलेला मराठा जागोजागी दिसून येतो .
महाराष्ट्रातील जवळपास १८० ते २०० मतदारसंघात मराठा समाजाचे प्राबल्य आहे . सहाजिकच त्या ठिकाणी सर्वच राजकीय पक्ष मराठा उमेदवारांना उमेदवारी देतात. काही मराठा शिलेदार अपक्षही उभे राहतात. त्यामुळे त्या मतदारसंघात चार पाच उमेदवार हे मराठा असतात, त्याठिकाणी ४० % पर्यंत जरी मराठा मतदार असले तरीदेखील मराठा मतदार, नातीगोती , सगेसोयरे , आर्थिक हितसंबंध, राजकीय वाटणी यात विभागले जातात, म्हणून कोणत्याही मतदारसंघात मराठा मतदान हे एकसंघ रहात नाही . समजा मराठा समाजाचे ४०% मतदान असेल व मराठा समाजाचेच पाच उमेदवार असतील तर प्रत्येकाच्या वाट्याला मराठ्यांची मते फक्त ८ ते ९% इतकीच येतात. गावागावात मराठ्यांचे गटतट असतात, एक गट अ उमेदवाराकडे असेल तर दुसरा गट ब उमेदवाराकडे आपोआपच जातो , खालची गल्ली विरुद्ध वरची गल्ली अशीही वाटणी असतेच. गावागावात, बांधावरून, शेतीच्या वाटणीवरुन, गणपती मंडळावरुन, भावभावकीवरून वाद चालू असतातच, त्यामुळे एक गट एकिकडे गेला की , दुसरा गट दुसरीकडे जाणार हे पुढार्यांना माहिती असतेच. आणि काही जणांना , दारू , मटण व पैसा दिला की काम फत्ते होतेच. ही मराठा मतदारांची परिस्थिती सर्व राजकीय पक्ष व उमेदवार जाणून असतात. या तुलनेत बाकीचे समाज घटक छोटे छोटे असले तरीदेखील ते राजकीय दृष्ट्या फार जागृत असतात. मुस्लिम, मागासवर्गीय, आणि ओबीसी हे ठरवून एकगठ्ठा मतदान करत असतात. जो उमेदवार त्यांची कामे करेल त्यालाच ते पाठिंबा देतात, या समाजातही फाटाफूट असते पण , त्याचे प्रमाण फार नगण्य असते . यामुळे या लोकांचा ज्या उमेदवारांना पाठिंबा मिळतो ते उमेदवार आपोआपच विजयी होतात. त्यामुळे मराठा समाजातील आमदार, खासदार हे कदापिही इतर समाजाला दुखावू शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे . कोणताही राजकीय पक्ष व नेता राजकीय धोका पत्करू शकत नाही. त्यामुळेच आजवर मराठा समाजाचे प्रश्न कुणीही गांभीर्याने घेतले नाहीत, लाखोंचे मोर्च हे रस्त्यावर एकसंघ जरी दिसले तरीदेखील त्याचे एकसंघपणे मतात परिवर्तन होत नाही . त्यातही मराठा समाजाचे शेकडो नेते वरवरचे मराठा समाजाचे तारणहार वाटतात. काही अपवाद सोडले तर प्रत्येक मराठा नेता कोणतरी राजकीय पक्षांची तळी छुपेपणाने उचलून धरतो आहेच. कोणत्या तरी राजकीय पक्षाच्या प्रमुखांचे व त्यांचे हितसंबंध असतात पण आतील गोष्टी भोळ्या , भाबड्या मराठा समाजाला माहित नसते म्हणूनच आजवर मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही व पुढेही हे मराठा समाजाचे लोकप्रतिनिधी मराठा आरक्षणासाठी काम करतील अशी परिस्थिती नाही .
त्यामुळे मराठा समाजातील , डॉक्टर, वकील, उद्योगपती , सधन शेतकरी , नोकरदार बांधव, व्यापारी बांधव, या सर्वांनी राजकीय पक्ष व राजकीय पुढारी यांच्या नादी न लागता , एकत्र येऊन मराठा समाजाच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी , वेगवेगळी कॉलेज, होस्टेल, नीट व जेईई चे क्लासेस, मेडिकल कॉलेज , आयुर्वेद कॉलेज, स्पर्धा परिक्षा केंद्र, अभ्यासिका व व्यावसाय आणि करिअर मार्गदर्शन केंद्र काढली पाहिजेत. एकत्र येत आयात, निर्यात, परदेशातील नोकरी आणि व्यापाराच्या संधी शोधल्या पाहिजेत. बाहेरच्या देशातील, शिक्षणाच्या संधीही माहिती करून घेतली पाहिजे . सहकारी उद्योगधंदे , पतसंस्था , बँका व नवीन उद्योग निर्माण करून मराठा मुला व्यावसायिक झाले पाहिजे. मराठा मुला , मुलींना माफक फिमध्ये शिक्षण व जास्तीत जास्त नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत . मराठा समाजातील लोकप्रतिधी हे पुर्णपणे व्यावसायिक राजकारणी असतात. तेच समाजाची पद्धतशीर दिशाभूल करतात. राजकीय पोळी भाजण्यासाठी मि कसा समाजाचे काम करतोय, माझाच पक्ष कसा मराठ्यांना न्याय देऊ शकतो हे वारंवार खोटेनाटे सांगून मनावर बिंबवत असतात. विधिमंडळात, कायदेशीर बाबी न तपासता चुकीच्या कायद्यांनाही डोळेझाक करून पाठिंबा देतात , खरेतर मराठा समाजात शेकडो प्रतिभावान विधिज्ञ व माजी आणि विद्यमान न्यायाधीश असताना , टिकणारे आरक्षण कसे देता येईल याची मराठा आमदार व खासदार यांनी एकत्रित चर्चा करून सत्य परिस्थिती समजून घेऊन प्रसंगी पक्षाची भुमिका बाजूला ठेवून, टिकणार्या आरक्षणाचा ड्राप्ट आपआपल्या राजकीय पक्षांना द्यायला पाहिजे होता . अपवाद सोडले तर मराठा समाजाचे कुणालाही घेणेदेणे नाही . म्हणून आजवर मराठा आरक्षण लटकलेले आहे . मराठा समाजाच्या पिढ्या बरबाद करायचे काम सध्या सुरू आहे .
कारण ओपनमध्ये असल्यामुळे महागडी शैक्षणिक फि व शहरातील होस्टेल, मेस व इतर खर्च परवडत नाहीत. भांडवल नसल्यामुळे धंदा करता येत नाही . आणि शेतीतर पुर्णपणे तोट्यात आहे . तरीदेखील मराठा समाजाकडे कुणीही बघायला तयार नाही . ©®
विजय पिसाळ नातेपुते.
९४२३६१३४४९/ ९६६५९३६९४९
खरे आहे
उत्तर द्याहटवा🙏
उत्तर द्याहटवा