vijaypisal49. blogspot. com

सोमवार, २५ जुलै, २०२२

मुले जेंव्हा मोठी होतात

चालू घडामोडींचे विश्लेषण


मुलं जेंव्हा मोठी होतात !
मुलगा असो की मुलगी जेंव्हा मुलं  मोठी होऊ लागतात ,तसे प्रत्येक आई वडिलांना त्यांच्या उच्च शिक्षणाची ,भविष्याची ,करिअरची  काळजी वाटायला लागते. मुलं अभ्यासू असतील ,मेहनती असतील तर आई वडिलांना खूप समाधान वाटते ,  आणि मुलांसाठी  कितीही त्रास सहन  करायची तयारी आईवडीलांची असते ,  मुलांसाठी प्रत्येक  आईवडील धडपड करतात , गरिबातील गरिब आईवडील सुद्धा आपल्या मुलांसाठी काहीही करायला तयार होतात. आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे, आणि आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रत्येकाला धडपड करावी लागते. मग उच्च शिक्षण असो की व्यावसाय असो ! या स्पर्धेच्या युगात आपल्या मुलांनी उंच भरारी घ्यावी ,आपले नाव उज्वल करावे यासाठी मुलांचे  आईवडील सगळे प्रयत्न व मेहनत  करत असतात.  मुलांचे यशस्वी जीवन हेच आईवडीलांनी पाहिलेले स्वप्न असते आणि यासाठी  आईवडील हे मेहनत करतात, बचत करतात , प्रसंगी उपाशी सुद्धा राहतात   हे करत असताना  मुलांसाठी  कोणतेही क्षेत्र निवडताना मुलांच्या आवडी निवडी काय आहेत हे पाहतात का ?  त्यांची काय इच्छा आहे हे लक्षात घेतात का ? आपल्या आवडी जशा   महत्वाच्या  असतात  तशा मुलांच्या आवडीनिवडी काय आहेत हे पाहतात का ? आपले मत मुलांवर न लादता 
त्यांना ज्या गोष्टीत करिअर करायचे आहे ,त्यासाठी आईवडीलांनी प्रोत्साहन दिले तर त्यांच्या स्वप्नांना बळ मिळते . जवळपास सर्व मुलांची बौध्दिक पातळी असते पण घरातील वातावरण ,आईवडीलांचा मुलांशी होत असलेला संवाद यातूनच मुले घडतात, मुलांशी जर मैत्री केली त्यांना समजून घेतले ,त्यांचा आत्मविश्वास वाढवला ,त्यांच्या पंखाना बळ  दिले तर मुले निश्चितपणे आपले कर्तृत्व सिद्ध करतात,  घरात मुलांशी आईवडीलांनी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या पाहिजेत ,आपुलकीने बोलले पाहिजे , तरच मुले दडपण घेत नाहीत, यश मिळवण्यासाठी , फार दडपण देण्याची गरजच नसते फक्त त्यांना अतिउच्च ध्येय गाठण्यासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक असते .
आणि संस्कारात घडलेली मुले आपोआपच आईवडीलांचे नाव मोठे करतातच . मुलं मोठी झाली की त्यांना जे आपण लहानपणी पासून घडवले आहे ,संस्कार दिले आहेत त्याप्रमाणे वागत असतात, मुले मोठी होत असताना जर घरातील वातावरण छान असेल तर त्यांच्या अंगी नम्रता निर्माण होते. अशी मुले ,नोकरी ,व्यवसाय व नागरिक म्हणूनही  यशस्वी होतात. 
मुलांना समजून घ्यावे लागते। त्यांना मानसिक आधार द्यावा लागतो .त्यांचा  मित्र परिवार, त्यांची उठबस, त्यांची विचार पद्धत समजून घ्यावी लागते . 
मुलांकडून अवास्तव अपेक्षा न ठेवता त्यांचा कल हेही तपासावे लागते तरच मुलांचे करिअर यशस्वी होते.
मुले मोठी जेंव्हा मोठी होतात तेंव्हा त्यांना समजून घेतले पाहिजे. त्यांच्याही मतांचा आदर केला पाहिजे, यश अपयश ,आनंद , दुःख, नैराश्य अशा प्रत्येक वेळी त्यांच्या सोबतीला असले पाहिजे , मुलांचा एखादा निर्णय चुकला तर त्याला नाउमेद न करता नवी दिशा दाखवली पाहिजे, त्यांच्या मनातील भावना समजून घेतल्या पाहिजेत .मुलांना वारंवार चुकांची जाणीव करून देताना त्यांच्या मनात अपराधी भावना निर्माण होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. मुलांशी कधीही दुरावा निर्माण झाला नाही पाहिजे. मुलांनी कायम आपल्या बरोबर मनमोकळेपणाने बोलले पाहिजे असे वातावरण घरातील असले पाहिजे.  मुलांना प्रोत्साहन देत असतांना, कर्तव्य, जबाबदारी या बाबतीत जरुर अवगत केले पाहिजे पण मुलांवर कधीही आपल्या विचारांचे ओझे देऊ नये.  प्रत्येक आईवडीलांनी मुलांची  सावली बनावे पण इतकीही सावली बनू नये की त्या सावलीत त्याची वाढ खुंटली जाईल.   मुलं मोठी झाली की आपणही ती मोठी झाली आहेत याची जाणीव मनात ठेवली पाहिजे.  आईवडील हे मुलांसाठी पाझरणार्या झर्या सारखे असले पाहिजे , म्हणजे मुलांना माया ,ममता मिळेल व सदैव सोबत राहतील, मुलं मोठी झाली की आपल्या रागावर नियंत्रण हवे , त्यांनाही चांगले वाईट समजते यावर आपला विश्वास हवा  ,  मुलांना मानसिक आधार हवा असतो ,मुलांना शाबासकीची ,कौतुकाची थाप हवी असते , मुलां त्यांच्याशी आदरयुक्त नाते हवे असते . 
याची जाणीव प्रत्येक आईवडीलांनी ठेवली तर मुले घडतात हे नक्की..©®
विजय पिसाळ नातेपुते.
9423613449