vijaypisal49. blogspot. com

मंगळवार, १० डिसेंबर, २०२४

बा.ज. दाते प्रशाला, माझी शाळा

चालू घडामोडींचे विश्लेषण


मला आज थोडं लिहायचं आहे परत एकदा तुझ्या आठवणीत रमायचं आहे.
बालपणी लागला तुझा लळा !
तुझ्यामुळेच मी पाहिला पाटी पेन्सिल व फळा !
माझी आवडती तुच एक शाळा !
मित्र मैत्रीणी आणि  सोबती तुझ्यामुळेच झाले गोळा !
सर्व सुखांची एक तु आठवण !
जीवलगांची ह्यदयात साठवण !
खरंच तुझ्यावर कितीही लिहिलं तरी मला शब्द कमी पडतील पण तुझ्या आठवणी संपणार नाही.
होय मी विजय पिसाळ ,नातेपुते !
  एक सामान्य मध्यवर्गीय कुटुंबातील सर्वसाधारण विदयार्थी म्हणून तुझ्या कडे आलो आणि तुझ्यामुळेच मी घडलो ! ©®विजय पिसाळ नातेपुते. 9665936949
हो हो मी माझी प्रिय शाळा  डॉ. बा.दाते प्रशाले बद्दल थोड व्यक्त होतोय ! मनापासून लिहिण्याचा प्रयत्न केलाय शेवटपर्यंत वाचाल ही अपेक्षा करतो ...
 मी विजय शंकरराव पिसाळ व माझे सगळे मिञ व मैत्रिणी यांनी1987 /1988 या वर्षी दाते प्रशालेत  प्रवेश घेतला आणि  तिच्या अंगणात खेळू लागलो  शिकु लागलो , मस्तपैकी  आनंदाने दिवस घालवत होतो किती मजेचे ते दिवस होते , प्रशालेच्या सहवासात असतांना माझी शाळा या विषयावर  खूपदा मराठीत  मोडकी तोडकी  पत्र लिहिली. निंबध लिहिले  तेंव्हा मराठी विषयात  जेमतेम मार्क मिळायचे म्हटलं तर मी सर्वसाधारण विदयार्थी अगदी कसेबसे पासिंग आणि हस्ताक्षर तर खूपच खराब .. पण, आज आनंदाने माझ्या शाळेविषयी लिहिताना अभिमान वाटतो म्हणून हा लेखन प्रपंच कारण, मला व माझ्या मित्र मैत्रीणींना तुझी  येणारी आठवण व आमच्यातील घट्ट मैत्रीचा तुच एक धागा , तुझ्या मुळे आम्हाला डॉक्टर, इंजिनिअर ,वकील  शिक्षक ,तर कुणी सामाजिक क्षेत्रात काम करणारे तर कुणी तुझ्या संस्कारातून तयार झालेली अभ्यासू  मित्र व मैत्रिणी मिळालेत , खरेतर  बारावी  परीक्षेनंतर( 1995 )तुझ्या पासून दूर जात असताना वाटायचं आता मस्तपैकी कॉलेज करुया , मौजमजा करुया , स्वच्छंदी जगुया , आपले विश्व खूप मोठे होईल आणि पंखांना बळ येईल म्हणून बारावी नंतर  काही वेळ आनंदी जीवन जगायला मिळेल  असं वाटायचं , ग्रॅज्युएशन झालं ,पोस्ट ग्रॅज्युएशन झालं तरीही मी शाळेपासून दुर गेलो याच फार वाईट वाटलं नाही. कारण त्या वयात एकच धारणा होती ‘शाळा’ नावाच्या पिंजऱ्यातुन माझी आता एकदाची सुटका झाली !...
 आता आकाशात मी स्वच्छंदी  झेप  घेतली ... या कल्पनेत मी रममाण झालो होतो ,मी  वेगळ्याच हवेत होतो असेच थोडक्यात .. जेंव्हा मी कॉलेज व पी जी पुर्ण केलं तेंव्हा मला समजलं नाही आपली तीच ती शाळा होती व त्या शाळेची मजा जगातील कोणत्याही ठिकाणी गेला तरीही येणार नाही.
 आता मात्र मी जेंव्हा केंव्हा शैक्षणिक आयुष्यात डोकावतो ,चर्चा करतो तेंव्हा आजच्या या धकाधकीच्या, धावपळीच्या जगरहाटीच्या तथाकथित आयुष्या पेक्षा या उंच  आकाशापेक्षा मला माझ्या दाते प्रशालेचा पिंजरा,  हो  तो पिंजराच किती छान होता ,किती   सुरक्षित होता याची वारंवार  प्रचिती येते .. छडी मिळाली तरी दुःख नाही की , परिक्षा जवळ आली म्हणून कधी टेंशन नाही . खरोखर खूप 
दंगामस्ती करायची, खूप खेळायचं ,एकमेकांचे डबे खायचे , एकमेकांना चिडवायचे हो , खूप खूप बिनधास्त भांडण करायचे पण कधीच खुन्नस नसायची एक दिवसात परत जीवलग मैत्री असायची , मी  मुलांशी काही मुलींशी तेंव्हा खूप भांडलो पण कधी त्यांचे बद्दल राग नसायचा कारण मैत्री म्हटलं की भांडण पाहिजेच , खिजवायला हवंच ,मस्त वाटतं , आजही मी गंमतीने भांडतो , खेचाखेची करतो ,सगळे समजदार असल्यामुळे तात्पुरते चिडले तरीही आपलेपणा जपतात , वैचारिक मतभेदांना मैत्रीत थारा देत नाहीत आणि म्हणून मला माझ्या शाळेतील मित्र मैत्रीणींचाही अभिमान वाटतो , तेंव्हा    एखादी गोळी सुद्धा आनंद द्यायची खरंच ते दिवस आठवले की मन भरून येतं , चिंचा ,बोरं किती मनसोक्त खालली  आम्ही , खरचं सगळे   मित्र मैत्रीणी खूप छान आहेत अगदी  वयाने मोठे आहेत पण आपलेपणा तोच आहे , काहींची परमेश्वरी इच्छेमुळे एक्झिट झालीय पण त्यांच्या आठवणी सुद्धा तशाच सतावत असतात ,  म्हणून  आम्हाला आमच्या शाळेची जाता येता आठवण येते , आमची  शाळा मात्र तशीच जाता येता उभी आहे ...

आजही वाटत दाते प्रशालेच्या  पिंजऱ्यामध्ये पुन्हा एकदा जाऊन बसावं पाठीवर दप्तर घेऊन यावं ..परत तीच  घंटा वाजावी , वाघ मामा , साळवे मामा , अभंगराव मामा,  वसगडेकर मामा  यांनी  वाजवलेल्या घंटेचा  आवाज परत परत कानी यावा  .....
राऊत सरांनी परत एकदा म्हणावं परेड सावधान ! परेड विश्राम !
जोशी मॅडम यांनी सुंदर पटी वाजवत , प्रार्थना व 
 राष्ट्रगीत आणि पसायदान म्हणावे होय  ती  प्रतिज्ञा आणि  रोज वेगळी प्रार्थना म्हणायची इच्छा आहे. एन बी  दिक्षीत सरांचा तबला कानावर पडावा  आणि आम्ही तल्लीन व्हावे ... 
 फळ्यावर भरते सरांच्या सुंदर हस्ताक्षरात लिहिलेला  सुविचारही वाचायचा आहे.
 बडवे सर , जमदाडे सर , कुचेकर  सरांचे
विज्ञानाचे प्रयोग कुतूहलाने पाहावेत ...
गणिताच्या एस पी  दिक्षीत सरांनी परत एकदा लसावी व मसावी व प्रमेय  शिकवावीत  , हो सगळे आलेख काढूनच जायला लागेल पण हरकत नाही , एस पी  दिक्षीत सर म्हणजे विद्यार्थी घडवणारे मनापासून आवडणारे गुरुवर्य आणि आयुष्यभर ज्यांचे उपकार फिटणार नाही असे व्यक्तीमत्व, वाया गेलेला विद्यार्थी मुख्य प्रवाहात येण्यासाठी दिक्षीत सरांचा खूप मोठा वाटा आहे. 
शिंदे सरांच्या इंग्रजी तासाला जर लक्ष दिले असते तर कदाचित वेगळ्या वळणावर असलो असतो, सर खूप जीव तोडून शिकवायचे पण मी कधीच इंग्रजीचे पुस्तक उघडले नाही, शब्द पाठांतर केले नाहीत की मनापासून इंग्रजी शिकली पाहिजे असे तेंव्हा वाटले नाही.
इयत्ता दहावीला ढोपे सर जर इंग्रजीला आले नसते तर कदाचित पहिल्यांदा डबल परिक्षा द्यायला लागली असती , ढोपे सरांनी व्याकरण खूप चांगले करुन घेतले आणि म्हणून माझी गाडी पुढे सरकली ,  जैन सर , कसबे सर, ढवळे मॅडम, बर्वे मॅडम साळवे सर,  असे अनेक शिक्षकांनी शिकवताना कधीच भीती वाटली नाही. राऊत सरांनी खेळाच्या बाबतीत खूप चांगली प्रॅक्टिस घेतली आणि खेळाचा मनसोक्त आनंद घेतला ,
खोचरे सरांनी व एन बी दिक्षीत सरांनीही खेळाच्या तासाला भरपूर खेळ शिकवले ,तसेच खडतरे सरांच्याही तासाला मजा यायची !
बाबर  सरांचा
मंत्रमुग्ध करणारा इतिहास  परत परत  ऐकायचा आहे...इतिहास म्हणजे पाठांतर करायला आवडणारा विषय मनापासून आवडायचा 
आणि हो
इयत्ता पाचवी ,सहावी,सातवी व आठवी ,नववी पर्यंत ढवळे मॅडम यांचा मराठीचा तास हवा पण दहावीसाठी मात्र मला परत एकदा  मराठीचं व्याकरण जोशी मॅडम यांच्या कडून शिकवायचय कारण तेंव्हा फळ्याकडे थोडं कमी लक्ष होतं म्हणून माझं कधी कधी लिहितांना दिर्घ र्हस्व चुकतं !
आणि मला आठवी ते दहावीला एम पी के मॅडम 
 संस्कृतसाठी पाहिजेत ,कारण अनेक सुभाषितं विसरलोय , उजळणी व पाठांतर हवं आहे. ब मधून अ मध्ये जायचंय व खास संस्कृतच्या तासाला बसायचं आहे, मन लावून सुभाषित ऐकायची आहेत  !
मधल्या सुट्टीत घरुन   आणलेला डबा आणि मित्रांचा डबा एकत्र  खायचाय , मनसोक्त कबड्डी, खो-खो , खेळायचं आहे
 आणि स्काऊट गाईडसाठी परत एकदा ,मांडवे , शिंगणापूर व धर्मपुरी बंगला या ठिकाणी ,
तीन तीन  दिवसांची शिबीर पाहिजेत , सोबतीला डी डी के सर, जाधवर सर , कसबे सर , स्वामी सर ,डांगे सर , एन बी दिक्षीत सर असतीलच , 
ग्रंथालयात जास्त गेलोच नाही पण जेवढी  पुस्तकं शशी काकांकडून आणली तेवढी मी मन लावून दारी धरत वाचली  व अजून  वाचावी वाटतात ... एखाद्या ऑफ  तासाला बाकावर कान ठेवून तबला पण वाजवावा वाटतोय किंवा दंगा करत बसावे वाटतंय , मला अजूनही आठवत, एकदा  मैदानावर खेळायला गेलतो  व मुली मात्र वर्गातच होत्या मी  अचानक  वर्गात आलो तर माझे दप्तर गायब झाले , बघतोय तर दप्तर व माझ्या सगळ्या वह्या पुस्तके  पोरींच्या हातात 😃 पटापट दप्तर व वह्या पुस्तके माझ्याकडे आले,मी पण काय बोललो नाही व त्या पण बोलल्या नाहीत, विषय समाप्त नाहीतर परत आम्हालाच मार मिळाला असता राऊत सरांचा !
26 जानेवारी व पंधरा ऑगस्ट  स्वच्छ गणवेशात झेंडावंदन करायला जावसं वाटतंय  नानासाहेब देशमुख, आर एफ दोशी , चंद्रकांत घुगरदे अशी मोठ्या उंचीची माणसे व शिस्तप्रिय व्ही एस कुलकर्णी सर यांना परत एकदा पहायचं आहे ..होय 
वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाषण केलेलं बक्षिस स्काऊट गाईडचा गणवेश घालून घ्यायचं आहे. रनिंग व वेट लिप्टिंग मध्ये मिळवलेला पहिला नंबर परत काढायचा आहे. शामची आई परिक्षा द्यायला व जोशी मॅडम यांचेकडून शिकायला आवडेल, स्वामी विवेकानंद यांचा वेश परिधान करुन , स्वामी विवेकानंद यांचं अमेरिकेतील ते भाषण परत एकदा  विजय चित्र मंदिर या ठिकाणी म्हणायचं आहे.
पहिल्यांदाच भरते सरांनी पाठांतर करुन घेतले होते व मेकअप पण केला होता!
"All Americans are my Brother and sister" याने सुरुवात करायची व चित्रपट गृहात टाळ्यांचा कडकडाट हवाच , " रघुनाशेठ उराडे, शांतीलाल शेठ गांधी, जंबुकुमार दावडा अशा मोठ्या लोकांसमोर तो कार्यक्रम होता.
वार्षिक स्नेहसंमेलनात , ग्रामपंचायत पटांगणात ,विजय पिसाळ ,बापु रुपनवर ,सुधिर काळे व अजून कोणतरी मिळून एक नाटक केलं होतं तेही परत करायचं आहे.
आणि प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात इयत्ता दहावीत असताना स्काऊट गाईडचा संघनायक म्हणून पाहुण्यांना व ध्वजाला सलामी द्यायची आहे फक्त स्वामी सर हवेत सराव घ्यायला ! खाकी हाफ पँट ,अजूनही आठवते , रस्त्यावरुन  मोठ्याने  ....भारत माता...की......जय.....अशी आरोळी ठोकायचीय !
परीक्षेच्या कालावधीत पाठांतर करायचे आहे तेही घरची कामे करत करत , इतिहास, भुगोल, नागरिक शास्त्र, विज्ञान, गणित, भुमिती ,इंग्रजी खूप खूप छान शिकायचे आहे व  सारा अभ्यास करायचाय... आवडत्या विषयांचे पेपर सोडवताना पुरवण्या जोडलेली उत्तरपत्रिकाही लिहायचीय...
    खर सांगू  शाळेत जेवढं शिकवलं तेच डोक्यात बसायचं घरी कामं खूप असायची त्यामुळे होमवर्क कधी पुर्ण होत नव्हता , गणित व इतिहास , विज्ञान व भुगोल मनापासून आवडायचे , व म्हणून मनापासून शाळेत येऊन बसायचे आहे व शाळे   सोबत घालवलेले ते आनंदाचे क्षण पुन्हा एकदा अनुभवायचेत .  खरं मला सायन्सची आवड होती अकरावीत फार समजत नाही मी एच के सरांच्या तासाला थोडा गोंधळ केला व सरांनी माझ्यावर एक तास लेक्चर दिलं ,मला तेंव्हा वाईट वाटलं आणि मी सायन्स सोडून कॉमर्सचा वर्ग निवडा तिथेही अकाउंट, इकॉनॉमिक्स, सेक्रेटरी प्रॅक्टिस , यासाठी पाटील सर , होळ सर यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं , वाणिज्य अशा विषयांचा अभ्यास केला  , कॉलेज करताना बि कॉम केले तिथेही   स्टँट व मॅथ्स , इकॉनॉमिक्स, अकाउंट ,बँकिंग या विषयांचा अभ्यास करायला मिळाला  , अगदी नंतर  मी माझ्या आवडीच्या कला शाखेतून , इतिहास, पॉलिटिक्स, सायंटिफिक मेथड ,मराठी व इंग्रजी हे विषय घेऊन ग्रॅज्युएशन केलं व पॉलिटिक्स विषय घेऊन एम ए केलं  पण कुठेच दाते प्रशाले सारखा मनापासून आनंद मिळाला नाही .
 मित्रांनो आपण  परत एकदा  आपल्या शाळेत जाऊया  ती आपल्याला  बोलावते आहे , कदाचित फळे बदलले असतील  पण त्याच भिंती ,तेच ग्राऊंड व तिच इमारत पहायची आहे.
होय दाते प्रशाला सांग ना ?  मला परत तुझ्याकडे बोलावशील का ?
    १२ वी निरोप समारंभाच्या वेळी तेंव्हा मुख्याध्यापक असलेले  व्ही एस कुलकर्णी सर यांचे भाषण आजही आठवणीत आहे.
“तुम्ही या शाळेत जे शिकलात ते कितीही मोठे झालात तरी विसरू नका , तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी तुम्हाला या शाळेची आठवण येत राहिल व या शाळेतील आनंदी क्षण  तुम्हाला आता पुन्हा मिळणार नाहीत...”
   म्हणून वाटते !
ते  घालवलेले शाळेतील  दिवस  आपल्या जीवनात  परत येणार नाहीत... याची  मला अगदी मनोमन जाणीव आहे...
दाते प्रशालेतीचे या लेखातून ह्यदयापासून आभार मानायचे आहेत . कारण भारत मातेच्या लाखो लेकरांवर हजारो शाळा संस्कार करत असतील पण आपली  शाळा व आपले  गुरुजन हे केवळ शाळा व गुरुजन नव्हते तर ते साक्षात होते एक विद्येचे माहेरघर , विद्येचे मंदीर व त्या मंदिरात मला व माझ्या मित्रांना   ज्ञान देणारे  साक्षात परमेश्वर समान गुरुजन , म्हणून मला लिहिण्याचे वेड लागले व बोलण्याचे धाडस प्राप्त झाले ! प्रत्येकाचा मान कसा राखावा , कुणाचा  आदर करावा हे धडे कुठल्याच पुस्तकात मिळत नाहीत , त्यासाठी हवी दाते प्रशाला !
माझ्यातील सदसद्विवेकबुद्धी जागृत झाली ती केवळ दाते प्रशालेत  बहुसंख्य शिक्षकांनी शिकवलेल्या एका एका धड्यातून , सांगितलेल्या एका एका गोष्टीतून!
जगण्याचं व लढण्याचं बळ प्राप्त झालं ते तिथेच 
 आज  शेती ,व्यवसाय आणि माझ्या आयुष्यात जे  चांगल घडलं आहे हे दाते प्रशालेतील  सुसंस्कृत ,संस्कारी गुरुजनांचं पाठबळ आहे..
माझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगात, जेंव्हा जेंव्हा मी उंच भरारी घेईन तेंव्हा दाते प्रशालेचा विद्यार्थी म्हणून  मी दाते प्रशालेचे  नाव उंचावण्याचा नक्की प्रयत्न करेल...©®
श्री विजय शंकरराव पिसाळ नातेपुते…
9665936949
😊

शनिवार, ७ डिसेंबर, २०२४

मराठा समाजाची दिशा काय असावी


चालू घडामोडींचे विश्लेषण

मी शक्यतो
मराठा बांधवांनो  जातीच्या विषयावर लिहित नाही , बोलत नाही किंवा त्यावर जास्त व्यक्त होण्याइतपत मला ज्ञानही नाही. हो मी तुमचा बांधव श्री विजय पिसाळ नातेपुते. तुमच्याशी आज या माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय , माझे तुम्हाला मत पटले तर विचार करा नाही पटले तर सोडून द्या!
तर बांधवांनो मी माझे वैयक्तिक मत तुमच्या समोर या मिडियाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतोय ,नंतर सविस्तर पणे माझ्या युट्युब चॅनलवर व्हिडिओ पण करण्याचा प्रयत्न करेन, खरेतर आपल्या देशात  प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या  जातीचा अभिमान असतो , फक्त कुणी तो जाहीर दाखवतो तर कुणी समाजाच्या कामातून दाखवतो तर कुणी छुपा का होईना जातीचा अभिमान बाळगतो ही मी अनेक ठिकाणी पाहिलंय , अनुभवलंय, व काहींचे अनुभव मला त्यांनी शेअर केलेत , म्हणून तुम्हाला सांगतो आपण समाजासाठी एखादी मागणी करताना , एखादी गोष्ट सरकार दरबारी मांडत असताना इतरांच्याही भावनांना ठेच लागणार नाही याचा विचार करणे आवश्यक आहे, मला मान्य आहे की मराठा समाजात जितके अती श्रीमंत, श्रीमंत लोक आहेत त्यापेक्षा कितीतरी पटीने गरीब पण आहेत , आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काही ठोस मागण्या आपण सरकार दरबारी करायलाच हव्यात , जसे की , गरिब मुलांना शैक्षणिक शुल्क माफी , होस्टेल व मेस मध्ये सवलती,  हुशार मुला मुलींना , स्कॉलरशिप  ,मेडिकल , इंजिनिअरिंग व ज्या ठिकाणी शैक्षणिक फि , खूप जास्त आहे ती फि माफी होण्यासाठी  सरकार दरबारी पाठपुरावा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 
अजून एक अत्यंत महत्त्वाचे , मराठा समाजाला कोणतेही सरकार ओबीसीतू आरक्षण देणार नाही हे अगदी सुर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. फक्त ओबीसी बांधवांना ज्या शैक्षणिक सवलती व जेवढे शैक्षणिक शुल्क भरावे लागते तेच गरीब मराठा समाजाला भरावे लागले पाहिजे यासाठी सरकारवर  निश्चित दबाव टाकणे योग्य राहिल .
  कितीही आंदोलने झाली तरी मराठा समाजात फुट पाडायचे राजकीय डावपेच हे सर्व राजकीय पक्षांना माहित आहेतच , त्यामुळे यापुढे कोणत्याही पक्षाचा नेता आरक्षण  देणार असे बोलत असेल तर ते तो  खोटं बोलतोय हे ध्यानी घ्या ,  मराठा- दलित, मराठा- ओबीसी, मराठा-मुस्लिम , मराठा -ब्राह्मण असे वाद लावून सगळ्या राजकीय पक्षांनी आपआपली पोळी भाजून घेतली आहे पण मराठ्यांच्या पदरात काही मिळालेले नाही, व मराठा समाजाचा राजकारणासाठी वापर अगदी सर्वांनीच केलाय व नेत्यांना त्यातून पाहिजे ते मिळाले आहे पण गोरगरीब मराठ्यांना काहीच मिळाले नाही, म्हणून मराठा बांधवांनो माझी तुम्हाला विनंती आहे,  जो अभ्यासात हुशार आहे त्यांने मन लावून अभ्यास करावा , व फक्त क्षमता असेल त्यांनीच स्पर्धा परीक्षांची तयारी करावी व प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी प्रयत्न करावेत , न्यायपालिका, आयटी क्षेत्र यात विशेष परिश्रम घेऊन संधी प्राप्त कराव्यात तिथे  क्षमता असेल तर तुम्हाला संधी आहेत  पण सरसकट सर्वांनी एकमेकांच्या नादी लागून स्पर्धा परीक्षा देत बसू नये  किंवा सर्वांनीच आयटी क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी इंजिनिअरिंग करु नये पण स्वतःकडे क्षमता असेल तर निश्चित ते क्षेत्र निवडावे अन्यथा वेळ पैसा खूप जातो आणि मानसिक ताणतणाव येऊन जीवनात नैराश्य येते व   इतर क्षेत्रात करिअर करायच्या संधीपण निघून जातात ,  ज्यांना शेती आहे  पाणी आहे  त्यांनी शेतीत मन लावून अभ्यासपुर्ण शेती करावी , शेतीकडे दुर्लक्ष करु नये , शासनाच्या योजनांचा फायदा जरुर घ्यावा पण त्या योजनांसाठी एखादा प्रोजेक्ट बिलकुल करु नये , केवळ आणि केवळ आपले उदिष्ट हे ज्या पिकांना चांगला बाजारभाव मिळू शकतो व ज्या पिकांमध्ये रिस्क कमी असते ती पिके घेऊन , त्याकडे पुर्ण लक्ष देऊन भरघोस उत्पन्न घेण्यासाठी कार्यरत रहावे ,  आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जास्तीत जास्त करावा , बाजारभाव जरी हातात नसला तरी एकाच पिका ऐवजी वेगवेगळी पिके घेऊन व ताजे चलन कसे मिळेल याकडे लक्ष द्यावे , मजूर टंचाई खूप भासतेय त्यामुळे सर्वच क्षेत्र लागवडीसाठी न वापरता काही क्षेत्राला विश्रांती द्या ,  विषमुक्त , सेंद्रिय शेती हे ऐकायला मस्त वाटते पण करायला थोडे कठिण असते म्हणून सेंद्रिय व विषमुक्त शेती करायचीच असेल तर , अगोदर या शेतीच्या मार्केटचा अभ्यास करावा ,  व शेती करताना  पिकांची फेरपालट करा , जरी सरकारी धोरणे शेतकरी विरोधी असली तरी ,  नकारात्मक दृष्टीकोन बाजूला ठेवा आणि ज्या पिकांना सरकार हात लावू शकत नाही अशा पिकांवर लक्ष द्या, सोयाबीन, कापून ,कांदा या पिकांची लागवड थोडी हिशोबात करा व एकरी उत्पन्न कसे वाढेल यावर लक्ष केंद्रित करा , हे झालं शेतीचं , अजून खूप तुमच्याशी शेअर करायला मुद्दे आहेत हळूहळू प्रत्येक मुद्दा मी बोलत राहिल , मित्रांनो  तुम्हाला जिथे कुणाचाही द्वेष ,राग मत्सर शिकवला जात नाही अशा कोणत्याही संघटनेत जायला हरकत नाही पण जास्तीत जास्त वेळ आपल्या कामासाठी, धंद्यासाठी द्या,  बहुजनवाद , हिंदुत्व वगैरे गोष्टी फक्त राजकीय आहेत , त्याने तुमच्या रोजच्या जीवनाचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, तुम्हाला तरीही जावेच वाटले तर नक्की जा पण घरात आपल्या पीठ आहे का  हे पण बघा , आपल्या आई वडिलांना शेतात , धंद्यात मदत करा , नव नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा व कोणतेही काम हलके समजू नका व कोणत्याही व्यवसायाला लाजू नका ,  सकाळी रोज 100 पेंढ्या कोथिंबीर विकून आनंदी व मजेत जगणारे लोक मी पाहतो तुम्ही पण मंडईत जाऊन बघा, फक्त सकाळी दोन तास ,संध्याकाळी दोन तास काम असते,
बांधवांनो  आजचे युग हे खाजगीकरणाचे आहे ,त्यामुळे खाजगी नोकरीत जास्त पगार मिळणार नाहीत किंवा तुम्हाला परमनंट ऑर्डर पण भेटण्याची शक्यता कमीच आहे, म्हणून ज्यांना जमेल त्यांनी न लाजता परिस्थितीनुसार ,  किराणा, ऑटोमोबाईल, हार्डवेअर, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिक,  हॉटेल ,मेस ,पान टपरी ,फर्निचर , वेल्डिंग, पंक्चर , गाड्या दुरुस्ती , रिपेअरिंग , शिलाईकाम असे शेकडो धंदे आहेत करण्यासाठी धडपड केली पाहिजे, काही दिवस जम बसायला लागतो, शून्यातून सुरवात करावी लागते ,पण न खचता काम करत राहिले तर धंदा यशस्वी होतो हे 100% सत्य आहे. 
आणि सगळ्यात महत्वाचे मराठा बांधवांनो आपण मोठेपणासाठी नको तिथे वारेमाप खर्च करतो तो टाळायला हवा, साधेपणा व कमी खर्च यातूनच बचत होऊ शकते, मानवी जीवनात रोज संकटे येतात , त्यामुळे थोडी बचत करा , आणि आपण स्वतः व्यसन करु नका , कुणाला व्यसन लावू नका व जर कुणी व्यसनी होत असेल तर त्याला व्यसनापासून दुर करा , व्यसनामुळे कितीतरी बांधवांनी जमिनी विकल्यात, कितीतरी बांधव कर्जबाजारी झालेत व कितीतरी बांधवांनी आत्महत्या केल्या आहेत,  आणि अजून खूप महत्त्वाचे आपल्या घरात एकनिष्ठ रहा , कुटुंब ही संपत्ती आहे , ती टिकवा , एखादा चुकला तर थोडे दुर्लक्ष करा पण नको तिथे हुज्जत घालून वेळ व पैसा बरबाद करु नका, बाई ,बाटली , नाच गाणे यात जो वहात गेला तो बरबाद झाला हे विसरू नका, जमिनी शक्यतो विकू नका आणि तुम्हाला नवीन प्रॉपर्टी घ्यायची असेल , नवीन चांगली गुंतवणूक असेल  तरच काही जमिन विकायची वेळ आली तरच विका पण शक्यतो जमिनी परत मिळणार नाहीत, याचे भान सदैव असुद्या ,आपल्या  समाजात व इतर कोणत्याही समाज बांधवांबरोबर  कोणताही व्यव्हार करताना  फसवणूक करु नका , विश्वासाला तडा जाईल असे वर्तन केले तर थोडाफार फायदा काही काळ होईल  मार्केटमध्ये नाव खराब होऊन कालांतराने त्याचे वाईट व दुरगामी परिणाम होत असतात, आपल्या घरातील सर्वांना  वाचन ,लेखन याची आवड निर्माण झाली पाहिजे , अध्यात्मिक  पुस्तके , कथा काव्य ,कादंबरी, महापुरुषांची चरित्र , धर्मग्रंथ , आणि यशस्वी लोकांची आत्मचरित्र वाचा  ,त्यातून संस्कार होत असतात हे ध्यानी घ्या , आपले सर्व जाती धर्मातील  शेजारी, आपले भावबंध यांच्या सर्व सुख दुःखात सहभागी व्हा , सर्वांना मदतीची भावना ठेवा , आपोआप तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही, राजकारणात भाग घेताना आपली योग्यता, स्वतःचे सामाजिक काम , याचाही विचार करा ,केवळ आपल्याच बांधवांना त्रास देण्यासाठी , भावकीची जिरवण्यासाठी  राजकारणात भाग घेऊ नका,  आपल्या समाजातील आपल्या गावातील एखादा जर राजकीय दृष्ट्या सक्षम असेल ,त्यांना किंमत असेल तर पायात पाय घालू नका, तो मराठा असो की कोणत्याही जातीचा असो  नेहमी सपोर्ट करा तरच तुमची कामे होतील  व इतर समाजातील कोणत्याही नेत्याबाबत खालच्या लेवलला जावून टिका करु नका, त्याने तुमचे संस्कार दिसून येतात, 
मराठा समाजाचा कुणीही शत्रू नाही, ब्राह्मण, मुस्लिम, ओबीसी, दलित बांधव हे हजारो वर्षापासून मराठा समाजाचे नैसर्गिक मित्र आहेत , कुणीही आपला विरोधक नाही, कुणीही आपला स्पर्धक नाही व कुणीही आपल्याला त्रास दिलेला नाही , आपले सर्व जाती धर्मातील लोकांशी पिढ्यानपिढ्या  ऋणानुबंध राहिले आहेत, एकमेकांना सर्वांनी मदत केलीय हा इतिहास आहे, काही वाद हे सर्व राजकीय पक्षांनी पेरलेले आहेत व त्यापासून आपण सावध असले पाहिजे.
आपल्या घरी सर्व जाती धर्मातील लोक येतात व त्यांचे आदरपूर्वक स्वागत आपण करतो हे संस्कार आपल्यावर आपल्या पूर्वजांनी केलेत याचा विसर पडू देऊ नका , आपल्या समाजातील काही प्रश्न सोडवण्यासाठी इतरांना टार्गेट करणे हे अत्यंत चुकिचे आहे,
हो मी पण माझे शेतीचे प्रश्न मांडताना सरकार विरुद्ध लिहितो पण व्यक्तीगत द्वेष ,जातीय चेष्मा  म्हणून माझे लिखाण नसते, राजकीय भुमिका वेगळी व सामाजिक काम ते मराठा समाजाचे असो कि ,  बाकीचे सामाजिक काम असो तिथे कोणताही पुर्वग्रह नको की कुणाच्या भावनांना ठेच नको ,
न टिकणारे आरक्षण रद्द करावे व ईडब्ल्यूएसचा लाभ समाजाने घ्यावा हे माझे मत आहे.
आणि सर्वात महत्वाचे सरकार कडे जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी आग्रही रहावे , सर्वांची संख्या समजली तर प्रत्येक समाजाला त्याचा फायदा होईल व सरकारला सुद्धा सर्व समाजाच्या गोरगरीब लोकांसाठी योजना राबवताना सर्वांना लोकसंख्येच्या पटीत आर्थिक तरतूद करता येईल.
मला खूप बोलायचं आहे लिहायचं आहे पण सर्वांना माझे मत रुचेल असेही नाही.©®
विजय पिसाळ नातेपुते.
9665936949

मंगळवार, २६ नोव्हेंबर, २०२४

भावनांची गुंतवणूक

चालू घडामोडींचे विश्लेषण

भावनांची गुंतवणूक!
©®विजय पिसाळ, मनाशी संवाद साधताना !

माणसं ही मनापासून एकमेकांना समजून ,सुद्धा समजूतदार वागतातच असे नाही ,   भावनाची कदर हल्ली कुणाला  करावी वाटते असेही दिसत नाही, आज काल माणूसपण हरवत चाललंय , एकांत आणि एकटेपणा यातच प्रत्येक व्यक्ती स्वतःच विश्व म्हणत आहे.  आपलेपणा कुठेतरी हरवत चाललाय , आज विश्वासाला तडे जात आहेत  आणि विचारांची देवाणघेवाण कमी होत आहे. स्वच्छंदी जगण्याची व्याख्या वेगळीच असते. पै पाहुणे , नातीगोती , मित्र , शेजारी पाजारी सगळं जग हे व्यव्हारी झालंय, फायदा नसेल तर बोलतानाही हातचा राखला जातोय , फायदा फक्त आर्थिक असतो असे नाही ,स्वतःची मते इतरांनी स्वीकारली पाहिजेत , तरच ती व्यक्ती योग्य आणि जर वैचारिक विरोधी विचार असेल तर ती व्यक्ती चुकिची आणि म्हणून त्या व्यक्तीचा संबंध सुद्धा नको ही भावना आजकाल वाढीस लागते ,  आणि एखादी व्यक्ती व्यसनी  असेल , खोटी असेल पण ती आपलं ऐकत असेल तर मात्र ती व्यक्ति चांगली असते असा मानवी स्वभाव आजकाल दिसून येतो.
मी जेंव्हा समाजात वावरतो तेंव्हा माणासांचे स्वभाव मला समजून येतात , 
 माणसं माणसांना कमी पण बाजारात खरेदी केलेल्या  वस्तूंना जीवापाड  जपतात.  घर ,गाडी कपाट ,  स्वच्छ करतात , साचलेली घाण, जळमटे साफ करतात. एखादे मशीन बिघडू नये म्हणून  तिचा नियमित वापर करतात , आपली गाडी सुद्धा रोज  फिरवतात, दिवाळी ,दसरा ,पाडवा या दिवशी तीची पुजा करतात , तिचे सर्व्हिसिंग नियमित करतात , तेलपाणी करतात. तिचे लाईफ वाढले पाहिजे ही भावना असते , सगळे लोक भविष्याचा विचार करून काही  वस्तूत म्हणजेच सोने ,चांदी , अशा वस्तूत गुंतवणूक करतात. वस्तू खरेदी केल्या कि त्याचं  सेलिब्रेशन केले जाते , पण आजकाल भावनांची गुंतवणूक होताना दिसत नाही , प्रत्येक गोष्टीत मान अपमानाच्या तराजूत नाती तोलली जातात,  पैसा मिळाला व त्यातून  ,सोने ,चांदी ,जमीन खरेदी केल्या नंतर पेढे वाटले जातात व आनंद साजरा केला जातो पण या  वस्तू  कधी असतील, नसतील किंवा त्याचं मुल्य कमीजास्त होईल याची कल्पना असतानाही त्यावर प्रेम केले जाते पण  आजकाल भावनांची कदर व गुंतवणूक होत नाही एखादी वस्तू  तुटल्यावर , फुटल्यावर किंवा हरवल्यास ,निराश होतात,  अस्वस्थ होतात, काहीही करून अगदी तुटलेली   वस्तू जोडू पाहतात.  पण जिवंत माणसांना माणसे सहजासहजी जोडत नाहीत, अगदी आटलेला झरा प्रवाही होऊ शकतो , समुद्राला भरती ओहोटी येऊ शकते पण माणसं मात्र तुटलेला संवाद जोडत नाहीत , परकीय शत्रू राष्ट्रांचाही संवाद सुरु होतो पण तात्विक कारणांनी ,मतभिन्नता असेल , द्वेष केला जातो ,  तिटकारा करतात व  माणसे संवादच बंद करतात हा मानवी स्वभाव का होत आहे?     मुक  व निर्जीव वस्तुंशी माणसे  संवाद करत असतात .  तिथे मात्र  समजूतदार  होतात. आजकाल तर  निर्जीव वस्तू नसतील तर माणूस  जगण्याची कल्पनादेखील  करू शकत नाही इतकी सवय त्या निर्जीव वस्तुंची होते , माझं पैजण, माझं कानातलं ,माझं घड्याळ, माझा मोबाईल यातच त्यांचं विश्व असतं आणि सजीव नात्यांचा गोडवा नसतो की ,भावनांची कदर नसते . का हरवत चाललाय हा संवाद?
प्रत्येक वस्तू आम्हाला सुंदर हवी , आकर्षक हवी , टापटीप हवी पण  मनातील , राग, मनातील  दुःख अशी  जळमटं साफ करायची कल्पनाच आम्ही करत  नाही , इतरांच्या पराभवात , इतरांच्या वेदनात ,इतरांच्या दुःखात हल्ली कोणच वाटेकरी नसतो , उलट त्याचा आनंद राजरा कसा  करता येईल याचे विचार मंथन केले जाते.
मानवी नाती आटलेल्या प्रवाहासारखी दिसतात , भावनांची तहान भागवताना मात्र दमछाक होते .
 संबंधात    गोडी  असावी      यासाठी नवीन काहीही करत नाहीत, त्यामुळे नाती दुरावतात ,ती  अबोल होतात. 
 तसंही आपण सगळे माझा परिवार, माझा संसार ,  माझं घर, माझी प्रॉपर्टी , माझं हे माझं ते सगळं माझं ,माझं करतो पण ती हस्तांतरित होतं याची कल्पना असूनही  ते मिळवण्यासाठी झटत असतो व शेवटी यातील काय सोबत येते व काय  उपयोगाचे असते  याचा सारासार विचार कधीच केला जात नाही?
 चैनीची वस्तू खरेदी केली तर तीचा पुरेपूर वापर करता यावा यासाठी धडपणारी माणसं , माणसांना वापरताना  कशाचीही कदर करत नाहीत, राजकारणात जसे वापरले जाते तसे आज सगळीकडेच वापरले जाते अशी मानवी मनाची भावना रुजत चाललीय , मला माझेच आत्मचिंतन करावे वाटते , मी व्यक्त होतो ,मी लिहितो , कुणी माझे ऐकावे म्हणून नव्हे तर स्वतःच्या  मनाशी तरी संवाद साधुन चिंतनशील रहावे या भावनेतून, 
   का असे होत असेल ?म्हणूनच मला वाटू लागते   निर्जीव वस्तूंना सुद्धा सुंदर लाईफ आहे आणि त्यांना काळजीपूर्वक जपले जाते व त्या टिकतात, मात्र जीवापाड जपलेली नाती व माणसे आजकाल टिकणे कठीण झालंय असं नाही वाटत तुम्हाला?. 
मोबाईल दोन मिनिट सापडला नाही तर जीव कासावीस होतो , शोधा शोध होते पण , ऋणानुबंध जपायला मात्र  जीव तुटत नाही कारण सजीवांशी संवाद हरवलाय व अनोळखी निर्जीव वस्तु बरोबर संवाद मात्र हवाहवासा वाटतोय ? होय ना?
 माणसे दुरावली तरीही कोणी जास्त दुःखी दिसणार नाही पण मार्केट मधून साधी चप्पल आणली व ती तुटली तर मात्र आम्ही दुःखी होणार?  निर्जीव वस्तुंवर आम्ही प्रेम करतो व पण माणसे  तुटण्याचं दुःखही होत नाही.  आजकाल तर  तू तुझ्या मार्गाला, मी माझ्या. यालाच समजूतदारपणा  म्हणतात . 
शेवटी  एकाच बाजूने नात्याचा तोल सांभाळणारी व्यक्ती थकते आणि  मनात स्वतःशीच संवाद साधते , चिंतनशील व्यक्ती पुढे पर्याय नसतात कारण त्यांनी भावनांची गुंतवणूक केलेली असते.
  मायाळू माणसं हल्ली शोधावी लागतात ती सापडत नाहीत .  म्हणून मला आसपास दिसते 
निर्जीव होत आहेत व वस्तु मात्र सजीवांशी एकरूप ?
खरं आहे ना ?
©®विजय पिसाळ ,नातेपुते.....

गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०२४

शालेय मैत्री ! कारे दुरावा ?

चालू घडामोडींचे विश्लेषण



















का रे दुरावा ...
एक छोटासा प्रयत्न जीवलग मित्रांसाठी ... 
श्री . विजय पिसाळ नातेपुते!!!
क्षणभंगुर आयुष्यात कोणते मागणे नाही !
 माझे तुला कोणतेही सांगणे   नाही !
आपुली, आपलेपणा पहिल्या सारखीच  फक्त जप , मैत्री सारखे शुद्ध नाते नाही !
विश्वास होता, विश्वास आहे , मैत्रीत दुरावा योग्य नाही!

मैत्री जपली तर काळजाचा तुकडा वाटते !
आणि 
मैत्री तुटली तर काळीज तुटते !

 संवेदनशील व्यक्ती मैत्री करतात ,मैत्री जपतात व समजूतदार वागतात !
खरेतर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना असंख्य मित्र होतात पण !
शालेय मित्रांची गोष्ट काही वेगळीच असते !
एकाच वर्गात शिक्षण घेत असताना खूप भांडायचे ,चेष्टा करायची , कधी कधी तर हाणामारी पण करायची आणि पुढील शिक्षणाच्या निमित्ताने, किंवा वेगवेगळ्या कारणांनी शालेय जीवनातील शैक्षणिक वाटा बदलल्या नंतर ,  दुर गेल्या नंतर , परत कित्येक वर्ष भेटीगाठी नाहीत, कित्येक वर्ष संपर्क नाही, कित्येक वर्ष कोण कुठे याचा ठावठिकाणा नाही फक्त चुकून कुठे कोण भेटले तर तो काय करतो , कुठे असतो , त्याचा फोन वगैरे मिळतोय का ? बघ की , गेट टुगेदर करुयात , मग शोधाशोध सुरु होते,  त्याचे नाव ,तिचे  नाव शोधायचे संपर्क मिळवायचे , लग्नानंतर तिचे नाव वेगळे , मग तिचे  फेसबुक प्रोफाइल कोणत्या नावाने असेल ,ति कुठे असेल असे एक एक करत पत्ते ,फोन नंबर शोधायचे ,  आणि हळूहळू संपर्क होतात , लहानपणीच्या आठवणी, एकमेकांच्या काढलेल्या खोड्या दंगा मस्ती यावर मेसेंजर वर बोलणे होते , तु काय करतो ,तुझं काय चाललंय याची चौकशी होते , व्हॉटसअॅप नंबर शेअर केले जातात , व्हॉटसअॅप वर शालेय बाल गोपाळांचे ग्रुप होतात आणि परत एकदा दंगामस्ती , तासंतास चेष्टा मस्करी , गेट टुगेदर, शिक्षकांची चौकशी, कार्यक्रमाचे नियोजन, धमाल मस्ती , 
 परत काही जणांशी ,तात्विक, वैचारिक, राजकीय मतभिन्नता, मग काही जण एक्झिट, तर काहीजण अबोल तर काहीजण वेळेच कारण देत तथास्तु आणि निरव शांतता...
वय वाढल्यानंतर एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आपण नाही का संयम ठेवू शकत ,  कधी कोण चुकला हेच उगाळत बसायचे का ?  ग्रुपमध्ये ग्रुप करुन गैरसमज कमी करण्या ऐवजी वाढवायचे का ? हीच आपली मॅच्युरिटी का ?  कित्येक वर्षांनी जेंव्हा भेटलो ,संपर्क झाला तेंव्हा
मला तुला काहीतरी सांगायचे आहे, तुला वेळ आहे का ? आरे तु कुठे आहेस तुला  वेळ असेल तर भेटायला ये इकडे कधी येतोस का ?  , फक्त येताना तासभर अगोदर फोन कर म्हणजे मी घरी थांबेल , एकमेकांची चौकशी, व्हॉटसअॅप वर न चुकता बोलणे, वेळ असेल तेंव्हा न चुकता खुशाली विचारणे , जोक शेअर करणे , माहितीची देवाण घेवाण करणे , 

मनसोक्त बोलावे , तासंतास बोलत रहावे , मनात काहीच न ठेवता  कोणतीही गोष्ट, कोणतीही घटना , पहिल्यांदा सर्व काही त्याच व्यक्तीला सांगावे , कोणताही संकोच मनात न ठेवता मनातील  सगळ्या गोष्टी शेअर कराव्यात ,  धकाधकीच्या धावपळीच्या आयुष्यात, कधी वेळ मिळाला तर त्याच व्यक्तीला भेटावे , काही वेळ एकमेकांसोबत घालवावा , चहा ,कॉफी ,नाश्ता याचा आग्रह करत हसतखेळत बोलून सुख दुःख शेअर करावीत , एकमेकांनाचा इतका विश्वास असतो की , कोणतीच गोष्ट एकमेकांनी एकमेकांपासून लपवली जात नाही, 
या नात्यात ,जात धर्म, हुशार , कमी हुशार, गरिब श्रीमंत हा विचार नसतो, कितीही मतमतांतरे झाली तरीही एकमेकांचा आदर करत नाते जपले जाते आणि ते नाते म्हणजे *"मैत्री"*
आणि शुल्लक गोष्टीवरुन किंवा कुणाच्यातरी गैरसमज पसरवण्यावरुन   मित्रांना एकमेकांपासून दुर करण्या पर्यंत स्वतःत बदल करणे हे योग्य आहे का ?
तुम्हाला काय वाटते ?

माझे तुझे काहीच मतभेद नाहीत, तरीही का कोण जाणे तुला आता वेळ नाही?

©®विजय पिसाळ नातेपुते.
9665936949

गुरुवार, २४ ऑक्टोबर, २०२४

मानवी स्वभाव

चालू घडामोडींचे विश्लेषण

मानवी स्वभाचा थांगपत्ता लागणे तसे महाकठीणच ! 
तुम्हाला माहित असेलच ,तुम्हाला अनुभव आला असेलच , या जगाची रित काय असते ते ,  आपण या  दुनियेत वावरत असताना जेंव्हा आपण सामान्य असतो तेंव्हा कुणी आपल्या अवतीभवती नसते , मोजके मित्र किंवा मोजकेच नातेवाईक आपल्याशी संबंधित असतात, जेंव्हा आपण चांगले पैसे कमावतो , आपल्याकडे चांगले घर,गाडी ,आणि अजून बरेच काही असते तेंव्हा अजून माणसे आपल्याकडे आकर्षित होतात,  आणि आपण जर काही मंडळांना, सामाजिक काम करणाऱ्या लोकांना मदतीचा हात पुढे केला तर खूप माणसे जवळ येतात,  आपण राजकीय आखाड्यात उतरुन थोडा हात सैल ठेवताच कित्येक अनोळखी सुद्धा मागे फिरतात ,  मग आपण अजून हवेत जातो आणि आपण खर्च करत राहतो पण जेंव्हा आपला हात कमी खर्चिक होतो तेंव्हा बरेच लोक दुर दुर होत जातात आपली आठवण लोकांना व्हायचे कमी होत जाते. हे खरं आहे का?
मित्रांनो अजून एक मी तुम्हाला आवर्जून सांगणार आहे , ते म्हणजे पैसा,राजकारण व आर्थिक हितसंबंध यामुळे जोडलेले लोक कधी ना कधी दुर जातात पण आपल्यातील असलेल्या कलागुणांवर प्रेम करणारे, आपल्या कामावर प्रेम करणारे वआपल्या चांगुलपणामुळे जीवनात आलेले लोक मात्र कायम सोबत राहतात, त्यांना पैसा श्रीमंती या पेक्षाही व्यक्ती आपली वाटते , आपल्या विचारांना ते मानत असतात . याचा प्रत्येय मला आला ,
माझ्याही जीवनात
 वेगवेगळ्या कारणांनी 
  कित्येक जण माझ्या सोबत  जोडले गेले यात शालेय जीवन, कॉलेज ,व्यावसाय ,सोशल  मिडिया, खेळ यामुळे खूप यादी मोठी होत गेली , कळत नकळत  कित्येकजण अत्यंत विश्वासू बनले,  मला  त्यांचा पुर्ण स्वभाव समजला आहे , ते आपली कदर करतात , आपण सुद्धा त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही पाहिजे  असे आपण आपल्या मनाशी ठरवतो   ,मुळातच आपण इतके हळवे आणि भावनिक असतो की , प्रत्येक व्यक्ती ही  मनापासून आपल्याशी आपलेपणाने बोलते  असेच  मनोमन वाटत   वाटते , आणि आपण निगेटिव्ह कधीच विचार करत नसल्यामुळे   कुणाबरोबरच  आपले मत निगेटिव्ह तयार होत नाही.  कुणा बद्दल आपण मनात किंचितही कटूता ठेवत नाही पण कधी कधी आपल्या विषयी , आपल्या राजकीय ,सामाजिक भुमिकेविषयी किंवा आपल्या बद्दल आपल्या परस्पर काही लोकांनी चुकिची मतं मांडली तर अंत्यत विश्वासू व्यक्तीचाही गैरसमज होतो व काही व्यक्ती आपल्या पासून अंतर ठेवू लागतात . तेंव्हा मात्र  काहीच सुचत नाही,  कित्येक लोकांना आपण जीवलग मानतो, पण सगळेच आपल्याला जवळचे मानतील असेही नाही. खरेतर 
मानवी स्वभाव ओळखणे व एखाद्याच्या मनाचा थांगपत्ता लावणे महाकठीणच ,
मित्र,जीवलग मित्र, नातेवाईक, रक्ताची नाती , असे अनेक लोक आपल्या जीवनात जोडले जातात पण खरेच आपण  सर्वांना जोडताना त्यांचे मन कधी जाणू शकतो का ? एखादी व्यक्ती  बोलताना  गोड बोलते , आस्थेवाईकपणे चौकशी करते , आपल्याशी अनेक विषयांवर मनमोकळेपणाने चर्चा करते , आपणही आपलेपणाने आडपडदा न ठेवता मनमोकळ्या गप्पा मारतो व त्या व्यक्तीला सहाजिक एक विश्वासू मित्र किंवा आजच्या युगात बेस्ट फ्रेंड म्हणतो पण अशा व्यक्तीने कुणाचेतरी  ऐकून आपल्या बाबतीत गैरसमज करुन घेतला तर , आपल्याला काय वाटू शकते ?
तुमचे अनुभव काय?

तुमचे मत काय?

मित्रांनो मला एकच सांगायचे आहे , एकदा मैत्री केली तर ,ओठात एक पोटात एक असे कधीच करु नका, जे काय असेल ते स्पष्ट वागा,व्यक्त व्हा , बिनधास्त बोला , ज्यांना योग्य वाटेल ते समजून घेतील, ज्यांना योग्य वाटणार नाही ते सोडून जातील .खरं आहे ना?

विजय पिसाळ नातेपुते.

मंगळवार, २० फेब्रुवारी, २०२४

समाजरत्न मा.श्री.कै.राजेंद्र (भाऊ) पाटील

चालू घडामोडींचे विश्लेषण
नातेपुते गावच्या राजकीय पटलावरील एक तारा हरपला  !

नातेपुते व पंचक्रोशीत ज्यांचे नाव आदराने घेतले जात होते. ज्यांचा नातेपुते गावात शांतता व सलोखा राहण्यात महत्वाचा सहभाग होता आणि ज्यांना घराण्याचा मोठा वारसा लाभून सुद्धा कोणताही गर्व नव्हता , सर्वांना ते भाऊ म्हणून परिचित होते असे नातेपुते गावचे आदरणीय व्यक्तिमत्व समाजरत्न कै.राजेंद्र (भाऊ) पांढरे पाटील यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आणि नातेपुते गावातील गोरगरीबांचा आधार हरपला , कोणताही गोरगरीब दारात गेला आणि त्याला भाऊंनी मोकळ्या हाताने कधी पाठवले असे झाले नाही. गोरगरीबांचे लग्न असो की अजून कोणतीही अडचण असो लोक भाऊंकडे जायचे आणि भाऊ त्यांना वडिलकीच्या नात्याने जवळ करायचे , चार चांगल्या गोष्टी सांगायचे व अडचण दुर करायचे ,भाऊंनी आपला परका असा भेदभाव केला नाही. महादेवाची यात्रा असो की , नातेपुते गावातील कुस्त्यांचा फड असो की , बेंदराचा सण असो भाऊंचा सक्रिय सहभाग असायचा व भाऊंचा शब्द कुणीही मोडत नव्हते .भाऊंनी देशी गोवंशावर निस्सिम प्रेम केले , जातीवंत खिल्लार गाई बैलांचा खूप आपुलकीने सांभाळ केला , लांबून लांबून जातीवंत खिल्लार खोंड आणुन नातेपुते परिसरातील गोरगरीब शेतकऱ्यांना ब्रिडिंगसाठी मदत केली. गोपालणातून भाऊंना फारसा आर्थिक लाभ नव्हता किंबहुना तोटाच होता पण शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे ही भावना त्यांच्या मनात सदैव असायची, नातेपुते विविध कार्यकारी सोसायटीचा कारभार भाऊंनी अतिशय काटकसने केला , शेतकऱ्यांना कर्ज देताना कधीच दुजाभाव केला नाही. सोसायटीच्या माध्यमातून  चालवले जाणारे स्वस्त धान्य दुकान व रॉकेल वितरण करताना गोरगरीबांना पुरवठा विभागातून आलेले धान्य पुर्ण वाटप केले आणि सगळ्यांचे आशीर्वाद घेतले , कधीच कुणाला धान्य संपले आहे असे म्हणून माघारी पाठवले नाही. गावात जर कुठे वादविवाद झाला तंटा झाला तर लोक भाऊंकडे न्याय मागण्यासाठी जात असत  व भाऊ जवळचा परका असा कोणताही विचार न करता न्यायनिवाडा करत असत  , सगळ्या लोकांचे समाधान भाऊ करत असत . भाऊंवर हजारो लोक प्रेम करायचे ते केवळ त्यांच्या सरळमार्गी स्वभावामुळे , त्यांनी समाजकारण व राजकारण करताना अनेकांना संधी दिली  कुरघोडीचे राजकारण केले नाही, दिलेला शब्द कधी मोडला नाही . त्यांनी ज्यांना संधी दिली ती माणसे खूप मोठी झाली  आणि त्या माणसांनीही भाऊंचे नाव वेळोवेळी घेतले, नातेपुते गावचे खेळीमेळीचे राजकारण रहावे म्हणून भाऊंनी जे काम केले ते पुढच्या पिढीसाठी आदर्श असेच आहे.
भाऊ जरी  शरीराने आपल्यात नसतील तरीदेखील त्यांचे विचार आणि त्यांचे कार्य आपल्या डोळ्यासमोर ठेवून या  पुढे सर्वांनी चालवावे आणि नातेपुते गावाला जी भाऊंच्या जाण्यामुळे पोकळी निर्माण झाली आहे ती भरुन काढण्यासाठी सर्वांनी काम करावे हीच आदरणीय भाऊंना श्रद्धांजली ठरणार आहे.
पिसाळ (देशमुख ) परिवाराचे , विशेषतः आमच्या  वडिलांचे व पाटील घराण्याचे नाते हे कौटुंबिक होते. 
पिसाळ (देशमुख )परिवार हा पाटील परिवाराच्या दुःखात सहभागी आहे.
विजय पिसाळ नातेपुते.

गुरुवार, ११ जानेवारी, २०२४

परमेश्वराचे अस्तित्व !

चालू घडामोडींचे विश्लेषण
परमेश्वराचे अस्तित्व कुणीही नाकारु शकत नाही. आम्ही धार्मिक हिंदू तर  इथल्या मुक्या  प्राण्यामध्ये, अगदी कासव , नाग , गाई ,उंदीर , यातही परमेश्वराला पाहतो , कारण जे मानवासाठी ,सृष्टीसाठी उपयुक्त आहे ते ते आम्ही परमेश्वराचा अंश म्हणून स्वाकरले आहे. प्रत्येक गोष्ट निसर्गाने निर्माण करताना एकमेकांना पुरक निर्माण केली आहे व त्यामुळेच मानव जातीचे अस्तित्व टिकून आहे. प्रत्येक गोष्टीत हिंदू धर्म देवाला पाहतो कारण त्याचा उद्देश त्यांचे संवर्धन करणे हाच आहे. म्हणून  निसर्ग ही सुद्धा  आमची देवता आहे .
इथल्या  नद्यांमध्ये , इथल्या निसर्गामध्ये , इथल्या पानाफुलात , इथल्या संपूर्ण चराचरात परमेश्वराला आम्ही  पाहतो. 
तसेतर  मनशांतीसाठी आम्ही धार्मिक हिंदू  उपासना स्थळांची  म्हणजेच मंदिरांची निर्मिती  करतो. काबाडकष्ट करुन थकल्यानंतर  कुठेतरी मनावरील ताणतणाव दुर व्हायला हवा , कुठेतरी कष्टाचा क्षीण कमी व्हायला हवा ही त्यामागची कल्पना असते मनुष्याने नीट वागावे, बंधुभाव जपावा ,म्हणून असंख्य धर्मग्रंथाची संत सज्जनांनी निर्मिती केली,  त्याचीच पारायने अशा ठिकाणी व्हावीत व चांगले काय ?वाईट काय हे सामान्य बुद्धीच्या लोकांना समजावे ,  असंख्य ऋषीमुनींनी  तपश्चर्या केली ती , कशासाठी होती ?  तर शांत डोक्याने मानवी कल्याणासाठी दिशादर्शक काही  लिहावे म्हणजे मनुष्य प्राण्याचे वर्तन हे सदाचारी राहिल आणि त्याला आपल्या कर्तव्यांची,नात्यांची , व्यव्हारीकतेची जाणीव होईल ,त्यामुळे मनुष्य हा राग ,लोभ ,मत्सर , वासना यापासून दुर राहिल आणि त्याला जीवन जगताना स्वतःची उच्च मुल्य जपता येतील हे  ऋषीमुनींच्या उपासनेचे व तपस्येचे मुख्य कारण असले पाहिजे. रामायण महाभारत , हे ग्रंथ तुम्हाला सदाचारी व दुराचारी, धर्म आणि अधर्म यातील अंतर दाखवतात . एखादे उपासना केंद्र कसे असावे त्याचे एक छानसे उदाहरण आमच्या पासून जवळच श्री क्षेत्र गोंदवले या ठिकाणी पहायला मिळते,तिथे तुम्हाला राहण्याची , ध्यान धारणा करण्याची , दोन वेळ जेवणाची व्यवस्था मोफत केली आहे. कुठेही पैसे मागितले जात नाहीत किंवा पावती फाडावी म्हणून गळ घातली जात नाही .कित्येक भाविक सेवेसाठी रात्रंदिवस झटत असतात. आणि तिथल्या अन्नछत्रामध्ये दोन वेळेला लोक महाप्रसादाचा लाभ घेतात व हे निस्वार्थी काम पाहून शेकडो भाविक , गोंदवलेकर महाराजांचे चरणी नतमस्तक होऊन, कुणी डाळ,कुणी तेल,कुणी तांदूळ, कुणी गुळ ,कुणी भाजीपाला तर कुणी रोख पावती फाडतात पण तिथे त्या ट्रस्ट कडून कधीही काहीही मागितले जात नाही, सगळे स्वेच्छेने दिले जात. या मिळालेल्या दानातून हॉस्पिटल व इतर कित्येक उपक्रम हे सेवाभाव म्हणून राबवले जातात इथे बंधू भाव जपला जातो,  सगळ्या भक्तांना वागणूक समान असते, गोंदवलेकर महाराज यांनी प्रभु श्रीरामाची भक्ती सांगितली होती व भक्ती म्हणजे काय तर रामा सारखे तुमचे वर्तन असावे व तसे वर्तन सतत  घडत रहावे म्हणून रामाचे नामस्मरण करावे हा साधा उपाय  गोंदवलेकर महाराजांनी सांगितला आणि बिघडलेले महाभाग सुद्धा सुधारले .यावरून उपासना केंद्र कशासाठी असावीत व उद्देश काय असावा हे समजून येते. पण ....
हिंदूंची असंख्य उपासना केंद्र आज मुळ उद्देशापासून दुर गेलेली सुद्धा दिसून येतात , इथल्या काही बाजारु  लोकांनी धार्मिकतेला  फाटा दिला आणि भोळ्या भाबड्या हिंदू समाजाला अंधश्रद्धेत गुंतवून त्याचे आर्थिक शोषण तर केलेच पण मानसिक गुलाम सुद्धा केले, आणि मानसिक गुलाम झालेले कितीही उच्चशिक्षित असले तरी , ज्यांची कोणतीही कुवत नाही अशा लोकांच्या चरणी नतमस्तक होतात. मानसिक गुलामगिरी मुळे अमुक पुजेसाठी,तमुक अभिषेकासाठी हजारो रुपये उकळले जातात  , देवाला प्रसन्न करण्यासाठी सोने ,नाणे ,हिरे ,माणिक ,मोती व प्रचंड दान करायला भाग पाडतात , मुळात कोणत्याही देवाला यातील काही लागत नाही.  जो कोणी परमेश्वराची पूजा करेल , तिथे स्वच्छता,साफसफाई करेल त्याला त्याचे पोट चालावे,त्याचा प्रपंच चालावा म्हणून निश्चित चार पैसे मिळाले पाहिजेत, अगदी पगार सुद्धा दिला पाहिजे पण , भोळ्या भाबड्या लोकांना हजारो रुपयांचे दर्शन पास किंवा व्हीआयपी वागणूक देण्यासाठी पैसे घेणे हा धर्म नसून अधर्म आहे.  आणि यामुळेच आज  धार्मिक हिंदू दुखावला जातोय  ! 
आणि दुसरी गोष्ट  राजकीय हिंदूंनी मतांसाठी, सत्तेसाठी व सत्तेतून मिळणाऱ्या मलिद्यासाठी धर्मात राजकारण घुसवले आहे , धर्माला राजकीय रंग दिला आहे. पक्षाचा व स्वतःच्या स्वार्थी विचारांचा प्रचार व प्रसार देवाच्या व धर्माच्या नावाने सुरु आहे  यामुळेच धार्मिक हिंदू व राजकीय हिंदू अशी स्पष्ट रेषा तुम्हाला दिसून येईल ,   धर्मात आपआपसात गैरसमज व   वादविवाद होत आहेत. सत्तेसाठी धर्माचा वापर बंद होईल तेंव्हाच खऱ्या अर्थाने इथल्या हिंदू धर्माची शिकवण तुमच्या मनात रुजेल इतकेच!
©®विजय पिसाळ नातेपुते.

सोमवार, १८ डिसेंबर, २०२३

हितगुज स्वतःशी


चालू घडामोडींचे विश्लेषण


हितगुज स्वतःशी 
©®विजय पिसाळ.. नातेपुते.

आज थोडा वेळ मी मला दिला !
घेतली थोडी विश्रांती, समजून घेऊ लागलो स्वतःला !
समाज, कुटुंब, नातेवाईक, प्रपंच  हे तर असतं प्रत्येकाला !
  तु तुझ्यासाठी काही वेळ देतोस का ? थोडे  प्रश्न विचारले मनाला !
 अरे सतत पळतोस ,धावतोस पण   कधी वेळ  असतो तुला स्वतःशी बोलायला ?
अन काही प्रश्नाची उत्तरे लागलो शोधायला !
कष्ट तर करावेच लागते ,पर्याय नसतो जीवनात कुणाला !
रात्रंदिवस कष्ट केले , हे का सांगावे जगाला !
आपली जबाबदारी आपणच निभावतो , आणि आयुष्य लावतो पणाला !
तसेतर  बर्याचदा एकटेच असतो आपण , फक्त आपलीच सावली असते आपल्या सोबतीला !
एक एक पाईप जोडला तर पाईपलाई तयार होते आणि पाणी मिळते शेताला !
तसा प्रत्येक टप्पा सर करत आपण शिकले पाहिजे  आकार द्यायला !
आपले बोलणे आपल्याशीच झाले तर   दुर घालवतो आपण थकव्याला  !
 स्वतःच्या हाताने रोप लावून ते वाढवले ,त्याला  पाणी दिले तर  गोड फळे लागतात त्याला  !
तसे आयुष्याचेही आहे थेंब थेंब घाम गाळून पुढे जावेच लागेल हे सांगितले मनाला  !
कष्ट करताना , प्रपंच चालवताना कित्येक रात्री जागवल्या ,हे मन सांगत होते मला !
पण तुझ्या कष्टाचे अन तुझ्या घामाचे पडले आहे काही कुणाला ?
जसे पाण्याचा थेंब थेंब देऊन जगवतो आपण पिकांना !
तसे एक एक पाऊल टाकत घडवावे लागते स्वतःला!
 तेंव्हाच आकार मिळतो तुमच्या भविष्याला  !
आज मी स्वतःशीच हितगुज केले , माझ्या मनातील  तळमळ ,माझ्या भावना , माझे भवितव्य जाणून घेतले , थोडक्यात आज माझी भेट मी  घेतली , वामनराव पै म्हणायचे ना !
" तुच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार"  तसा  मीच  माझ्याशी बोलत होतो अगदी मनसोक्त स्वतःशीच  बोलणे झाले..  जगण्यात काही आपण चुकलो असेल, काही गोष्टी राहून गेल्या असतील तर त्याचा थोडा विचार  पण केला  !  
आजवर आपण खूप छान जगलो याचाही आनंद मनात  भरभरून साठवला ,
जरी कष्ट केले तरी मनसोक्त स्वच्छंदी आजवर प्रवास केला हेही सांगितले स्वतःला , माणसे पाहिली , माणसे ओळखली , कमीजास्त चुकलोही पारखण्यात पण  माणसे जोडली व आनंद घेत जगत आलो  .. आणि असेच स्वच्छंदी  जगणे सुरू ठेवणार आहे. स्वतःशी 
हितगुज करताना  जाणवले ,माझी काही कर्तव्य जबाबदाऱ्या आणि  पुढची दिशा यावर पण मी चिंतन केले पाहिजे , वारंवार  स्वतःला शोधले पाहिजे .  मनात विचार आला आपले आरोग्य, आपले शरीर हे चांगले असेल तर सगळे जग तुमच्यावर प्रेम करते !
म्हणुन  काहीही झाले तरी "माझा  मीच माझ्यासाठी खूप महत्त्वाची व्यक्ति आहे हेही ध्यानात आले" . 
इतरांचा मानसन्मान , आदर करताना मी  स्वतःचाही   आदर  केला पाहिजे , म्हणजे मी कुठेही कमी नाही , कोणताही न्युनगंड ठेऊन मी जगणार नाही . खूप  दिवसांपासुन इच्छा होती स्वतःसाठी  हितगूज करावे पण  रोजची धावपळ रोजची कामे यामुळे स्वतःशी मी बोलत नव्हतो .  आज वेळ काढला  थोडा निवांत होतो ,थोडा रिलॅक्स होतो   म्हणून  आज कुठे दुपारी वेळ   मिळाला  .  फ्रेश झालो , ज्यांनी जन्म दिला त्यांचे आभार मानले ,ज्यांनी साथ दिली  त्यांच्या बद्दल मनात  कृतज्ञता व्यक्त केली  , ज्या निसर्गामुळे माझे अस्तित्व आहे त्याचेही आभार मानले कारण आपण क्षणभंगुर आहोत , निसर्गातील छोटे प्रवासी आहोत हे मनाला सांगितले , तसेच ज्यांनी ज्यांनी  आपल्यासाठी काही केले त्यांची आठवण काढली व ते सदैव सुखी राहवेत अशी प्रार्थना पण केली   अन   मनापासून  परमेश्वराचेही  आभार मानले , कारण परमेश्वराने माझ्यावर प्रेम करणारी माणसे माझ्या जीवनात पाठवली म्हणून मी आज  आनंदात आहे हे पण मनाला सांगितले .  आज मी सुंदर झाडाच्या गर्द सावलीत स्वतःशी बोलत होतो समजावून  स्वःताला घेत होतो , बालपण, शालेय जीवन, संसार , कुटुंब आणि आजचा मी यावर चिंतन करत होतो .
  अगदी निरव शांतता होती , वार्याची झुळूक व पक्षांचे आवाज सोडले तर 
 आसपास कुणीही नव्हते आणि माझ्या मनाचा शोध मी घेत होतो.
जसे  माझ्या अंतर्मनात मी डोकावले तसे  माझे व्यक्तीमत्व मला  प्रसन्न  दिसले, माझे मन  मला सांगत होते . " तू  जरी कुणाचे फार चांगले करु नाही शकला तरी तू कुणाची फसवणूक केली नाही, कुणाला जाणीवपूर्वक  त्रास दिला नाही म्हणून तुला चिंता करायची गरज नाही" , "प्रत्येक वळणावर तुला यश मिळाले व पुढेही मिळणार आहे "
हे मनाने वारंवार सांगितले ! 
बालपणीच्या आठणीत गेलो तेंव्हा  हास्याची लकेर उमटली..दुसरी व्यक्ती समोर  नसताना चेहऱ्यावर हास्य येणे  कसं शक्य आहे ? 
पण हितगुज स्वतःशी करायचे म्हटलं तर  आठवणी येतात व हसायलाही येते !
हसतमुख मी माझ्यात पाहतो  तेंव्हाच मी प्रसन्न होतो म्हणून स्वतःला ओळखा ,स्वतःशी हितगुज करा ! 
मी माझ्याच विचारात रमून गेलो होतो आणि 
 आजवर काय चुकले काय बरोबर हेही मनातले मनात  व्यक्त  होत होतो ..  तसा  थोडाफार  गोंधळही सुरु होता डोक्यात  आजवर तु खुप धावपळ केली , ओढाताण केली , जमेल तशी मदत केली बहुतेक लोकांवर  विश्वास ठेवला  पण मन म्हटलं भुतकाळ काढून काय फायदा हे कलियुग आहे ? माणसे विसरून जातात , आणि कदाचित तुम्हाला त्रासही देतात  हीच ती रित आहे जगाची   म्हणून   क्षणभर थांबलो आणि परत मनात बोललो !
  हे असेच चालणार   म्हणून पुन्हा एकदा स्वतःला माफ केले.. 
कधी कधी आपण खूप भावनिक असतो , तसेच आपल्या हातून चुकाही होतात , कारण आपण प्रेम करणारी साधीभोळी माणसे असतो तसेही 
.स्वतःला स्वतः च्या  चुका सांगणे कठीण पण आवश्यक आहे असे समजून काय काय चुकले आपले याचेही चिंतन केले.
स्वतःच्या चुका समजून घेणे महत्वाचे आहे.
 स्वतःला छान जगायचे आहे, आपण आपल्या चुका समजून घेतल्या पाहिजेत , तसे जीवन खळळता झरा आहे सुंदर आहे पण तो कधीतरी आटणार आजे जसा झरा सर्वांना खळखळून वाहताना आनंद देतो स्वतःशी गाणी गातो तसे आपण स्वतःशी गायले पाहिजे , अगदी झर्यासारखे वाहिले पाहिजे  , सुखासाठी  हेही केले पाहिजे !
मित्रांनो 
आज मी अगदी आनंदी आहे , कारण मी काहीच गमावले नाही जीवनपटातील   बेरीज व वजाबाकी हे गणित सोडवताना  मी खूप  प्लसमध्ये  आहे . खेळीमेळीच्या वातावरणात मी जगतोय  आणि हवं तसं हवं तेवढं स्वःताला आनंदी ठेवतोय , मी सुखी आहे व  नवीन वर्षात पुन्हा जगण्यास सज्ज झालोय ,  स्वतःला  समजून घेऊन ,मनाशी बोलून जगायचे हेही आज ठरवले आहे , काही वरिष्ठांचे संस्कार , काही  साधू संतांचे मार्गदर्शन व मित्रांचे योग्य सल्ले घेऊन नविन वर्षात  पाऊल ठेवायचे हे  पण हितगूज केलंय मनाशी   .
मला वाटते  प्रत्येकजण अशा कल्पना करतो स्वतःशी बोलतो पण तो लिहित नाही पण प्रत्येकाच्या अंतर्मनात विषय आणि विचार असतात , प्रत्येकाचे भाव विश्व असते कुणी व्यक्त होतो तर कुणी अबोल जगतो पण तो तितकाच उपयुक्त असतो म्हणून स्वतःला समजून घेणेही आवश्यक आहे असे मला वाटते . 
©®विजय पिसाळ नातेपुते.
9665936949

सोमवार, २० फेब्रुवारी, २०२३

स्वराज्यासाठी लढलेला व मराठी बोलणारा प्रत्येक माणूस मराठा !

चालू घडामोडींचे विश्लेषण




"शिवजयंती सोहळा समिती" नातेपुते,यांचे वतीने नातेपुते नगरित शिवप्रतिमा पूजन व जिल्हा परिषद शाळेतील  लहान मुलांना शालेय साहित्याचे वाटप आणि प्रा. रवी ठवरे यांचे "शिवचत्रातून काय शिकावे " 
या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.
या प्रसंगी बोलतांना प्राध्यापक रवी ठवरे सर म्हणाले की , शिवाजी महाराजानी  स्वराज्य निर्माण करताना सर्व जाती धर्मातील बांधवांना एकत्र करुन , जुलमी सत्तेविरुद्ध, अन्याय व अत्याचारा विरुद्ध लढा उभारला , राज्यकारभार करताना जो सामान्य जनतेवर अन्याय करेल त्याला कडक शासन केले, जो स्त्रियांकडे वाकड्या नजरेने पाहिल ,त्याचे हातपाय कलम करण्याचे काम शिवरायांनी केले, दुष्काळात रयतेसाठी धान्याची कोठारे खुली केली , शेतकर्यांना शेतसारा माफ केला ,तसेच शेतकर्यांना मोफत बियाणे उपलब्ध केले , पुढे बोलताना ठवरे सर म्हणाले की , शिवरायांचे राज्य हे मराठ्यांचे राज्य होते   पण मराठा हा शब्द कोणत्या विशिष्ट जातीचे राज्य असा नसून महाराष्ट्रात राहणारा , मराठी बोलणारा व स्वराज्यासाठी लढणारा म्हणजे मराठा हे या ठिकाणी अभिप्रेत आहे म्हणून आपणा सर्वांना मराठ्यांच्या इतिहासाचा म्हणजेच आपल्या सर्वांच्या पूर्वजांच्या इतिहासाचा सार्थ अभिमान असला पाहिजे. शिवरायांनी हजारो मावळे  सोबतीला घेतले आणि हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले , स्वराज्य म्हणजे रयतेचे राज्य आणि रयतेचे राज्य म्हणजे आपले राज्य म्हणून छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर करायचा आहे,  व्यसनापासून , टिव्ही मालिका पासून ,मोबाईल पासून  जो तरुण आज भरकटत चालला आहे , त्याला जर परत एकदा चांगले संस्कार द्यायचे असतील तर शिवचरित्राची पारायणे करणे गरजेचे आहे .
या कार्यक्रम प्रसंगी , इयत्ता चौथीतील बाल वक्ता राजवर्धन चिंचकर यानेही सुंदर असे भाषण करुन सर्वांची मने जिंकली.
सदर कार्यक्रमास..
नातेपुते गावचे माजी सरपंच अमरशील देशमुख, नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे मुख्याध्यापक प्रविणकुमार बडवे , वरिष्ठ लिपिक आबासाहेब देवकाते , बाबुराव जमाले , प्रा.उत्तम सावंत , संजय उराडे , मंगेश दिक्षीत, एकनाथ ननवरे विकास बडवे, रोहित शेटे ,शक्ती पलंगे , अमर  भिसे अनिल जाधव, सतिश जाधव पत्रकार सुनिल राऊत , आनंदकुमार  लोंढे , संजय पवार, आनंद जाधव ,समिर सोरटे, सुनिल ढोबळे आदी मान्यवर उपस्थित होते तर सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवजयंती सोहळा समिती नातेपुतेचे , विजय पिसाळ , कैलास सोनवणे, संभाजी पवार, राहूल पदमन, जयंत चिंचकर,  अक्षय बावकर ,रोहित इटकर, किशोर ढवळे, सुरज चांगण , रोहित चांगण , महेश बडवे , या सर्वांनी परिश्रम घेतले, 
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन राहूल पदमन यांनी केले.

मंगळवार, ६ डिसेंबर, २०२२

आनंदी क्षण कसे जगावेत

चालू घडामोडींचे विश्लेषण



जीवन जगत असताना आपल्याला स्वतःसाठी, कुटुंबासाठी, नातेवाईक ,मित्र परिवार, आणि आपल्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी जगता आलं पाहिजे, आनंद देताही व घेताही आला पाहिजे. आनंदाचे क्षण  सोबतीने साजरे करता आले पाहिजेत. मिळून मिसळून राहता आले पाहिजे. हेही सत्य आहे की,
सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतीलच असेही नाही. कुठेतरी समाधानी असले पाहिजे. सार्वजनिक व वैयक्तिक जीवनात सुद्धा
काही गोष्टी मनापासून पोटतिडकीने मांडायच्या असतात , बोलायच्या असतात, काही गोष्टी फक्त मनात ठेवायच्या असतात तर काही गोष्टी प्रत्यक्ष करुन कृतीतून दाखवून द्यायच्या असतात.
कोणतीही गोष्ट मनात तपासून करायची असते व ती  करताना सर्वांची मने जपण्याचा आपण प्रयत्न जरुर केलाच पाहिजे, मात्र सगळ्याची मने आपण जपताना कोणतीही गोष्ट सर्वांच्या मनाप्रमाणे होईल याचीही खात्री नसते.कधी कधी आपण खूप चांगले वागतो पण समोरच्या व्यक्ती आपल्याला समजून घेतीलच  याची शाश्वती नसते, आपल्याला काही वेळेस त्रास होतो , पण तुम्ही आम्ही कोण प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, यांनाही त्रास झालाय , कधीकधी आपण प्रामाणिक काम करतो तरीदेखील त्रास होतो पण  अशावेळी त्रास सहन करत आपल्या कामावर लक्ष देत राहणे केंव्हाही चांगलेच , त्रास देणारांकडे  दुर्लक्ष करणे आणि पुढे जाणे हा एकमेव पर्याय असतो.सर्वांच्या मनाप्रमाणे आपण कधीच असू शकत नाही व तेही आपल्या मताप्रमाणे असतील किंवा आपलेही सर्व योग्य असेलच हेही निश्चितपणे सांगता येत नाही.
म्हणून आपण या जीवनात सर्वांबरोबर चांगलेच वागायचे ठरवायचे  मग समोरची व्यक्ति किंवा समाज कसाही असो !
चांगले वागत राहिलो तर आपोआप लोक जोडले जातात व जीवन आनंदी होते किंबहुना सर्व सुखाची प्राप्ती होते.
विजय पिसाळ नातेपुते.

बुधवार, २१ सप्टेंबर, २०२२

आपले जीवन जगताना !!!




चालू घडामोडींचे विश्लेषण

आपलं जीवन !
आपण आपल्या मनाला काही प्रश्न जरुर विचारलेच पाहिजेत !
आपण माणूस आहोत का ?
आपण आपल्यासाठी जगतो की समाजासाठी जगतो ?
खरंच आपलं आयुष्य हे कशासाठी आहे ?
आपली निर्मिती कशासाठी झाली आहे ?
आपल्या आयुष्याची दिशा काय  ? 
आपण आपल्यासाठी  काही वेळ देतो का ?
आपले खास कोण आहे का ?
आपण आपल्या मनाशी संवाद साधतो का ?
वरील प्रश्न  आपल्याला पडले नाहीत तर ?  मला वाटते आपल्या मनाशी बोलायला कमी पडतो आहोत. वरील प्रश्न 
विचारल्यानंतर क्षणभर शांतपणे एकांतात बसून काही संवाद आपण आपल्याशी करावेत ..आणि मग ..
आपण जन्माला आल्यापासून मृत्यू  येईपर्यंत काय करायचा निर्धार केला आहे व आपली आजवरची वाटचाल काय राहिली आहे.
खरेतर आपण   खूप मेहनत करतो ,खूप मोठी स्वप्न पाहतो , स्वप्नांना साकार  करण्यासाठी शिक्षण घेताना , नोकरी अगर व्यवसाय करताना भयंकर परिश्रम करत असतो . सर्वसाधारण लोकांची जी स्वप्न असतात तीच आपलीही स्वप्न असतात . 
छानसा /छानसी   जोडीदार, आपलं स्वतःचं टुमदार घर , घरात सगळ्या सुख सुविधा बर्यापैकी  चांगला बँक बॅलन्स, समाजात मानसन्मान ,प्रतिष्ठा  आणि पुढच्या पिढीसाठी काहीतरी करुन ठेवायची धडपड  हो हेच आपण ठरवतो  ना ? मनाशी .. हे एकदम कॉमन आहे.
 आपण आपली  ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या दृष्टीने काम करत असतो , न थकता, न चुकता ,न थांबता आपण परिश्रम करतो , एक एक गोष्ट आपण मिळवत जातो।  किंबहुना ते मला मिळालेच पाहिजे म्हणून कठोर मेहनत करत असतो .
 तारुण्यात असताना आपण शक्यतो मागे वळून पहात नाही, शरीराला नेमकं काय हवंय ? काय नको ? याचाही  विचार आपण  करत नाही ,  घरदार ,गाडी बंगला  ,नोकरचाकर , सगळं ऐश्वर्य प्राप्त करतो .. आणि यासाठी कधी लोण काढून तर कधी हाप्त्यावर  एक एक साहित्य घेतो . पण त्याचा उपभोग घ्यायला घरीच नसतो कारण गाडीचा हप्ता, टिव्हीचा हाप्ता , घराचा हाप्ता ,दवाखाना व मुलांचे  शिक्षण  हे खर्च भागवण्यासाठी आपण अजून पळत असतो . होय मी मध्यमवर्गीय माणसाबद्दल बोलतोय...
 आणि या कामाच्या   धावपळीच्या जीवनात आपले आपल्या  शरीराकडे अनावधानाने किंवा पैशासाठी धावत असल्यामुळे दुर्लक्ष होतेच  यातूनही  . खूप पळून , आपण  बँक बॅलन्स करतोच बचत म्हणा  ! 
 , पण  सोबतीला अनुरुप असलेल्या आपल्यावर जीव लावणाऱ्या जोडीदारासाठी पुरेसा   वेळ देतो का ? , आपले मित्र ,नातेवाईक,  आपले आईवडील, आपली लहान मुले। यांनाही वेळ देतो का ? 
 पैसा जरुर कमावलाच पाहिजे पण आपल्यावर प्रेम करणारी जिवाभावाची नाती महत्वाची नाहीत का ?त्यांनाही वेळ देता आला पाहिजे.  जीवाभाची जी माणसे आहेत त्यांच्या बरोबर मनभरुन  बोलतो का ? 
 वेळ दिला पाहिजे .सुखाचे काही क्षण व्यतीत करता आले पाहिजेत ना ! 
आहो 
जग जिंकायला निघण्या अगोदर आपल्या शरीराची  काळजी, मनाचे समाधान आणि आपली जिवलग नाती जपायला हवीत ना ?  मनाशी कधीतरी संवाद साधायला हवा ना ?
 हे क्षणभंगुर आयुष्य  मनसोक्त जगायला नको का ? सगळा पैसा फक्त निवृत्तीसाठी आणि पुढील पिढ्यांसाठीच कमावला पाहिजे हा नियम आहे का ?  पुढच्या पिढीसाठी जरुर करुया , पण त्यांनाही काहीतरी करायला शिल्लक ठेवले पाहिजे ना ?
आपले जगणे आपण नको का शिकायला ?
जीवनातील प्रत्येक क्षण आनंदात जगण्यासाठी आपण प्रयत्न नको का करायला !
समुद्राच्या किनार्यावर फिरताना ओंजळभर वाळू हातात घ्यावी आणि ती वाळू आपल्या हातातून हळूहळू निसटत जावी , इतके आपले आयुष्य आपल्या हातातून निसटत असते हे कधी आपण ध्यानात घेणार ?
कदाचित आपल्याला सगळं कळतं पण तरीदेखील आपण आपल्यासाठी कधीच जगत नाही .जगाची चिंता आणि जग काय म्हणेल यातच आपले अनमोल जीवन आपण खर्ची घालतो किंबहुना त्यातच आपला वेळ वाया घालवतो . बरोबर ना ?
 आपण आपल्या मनाशी कधीच आयुष्याची बेरीज किंवा वजाबाकी करत नाही.
 जीवन जगत असताना ,जबाबदारीची ओझी वाहताना , आपल्या शारीरिक व मानसिक गरजा हेही आपण विसरून जातो , धावपळीच्या जीवनात ,कधी आपण चिडचिड करतो कधी आपला पारा चढतो तर कधी आपण तहानभूक विसरून जातो . आणि आपल्या जीवनात जे सुखाचे ,समृद्धीचे ,भरभराटीचे, आनंदाचे, दिवस यावेत हे पाहिलेले असते ते बाजूलाच  रहाते आणि , बी.पी ,शुगर , वात ,पित्त ,स्थूलपणा असे नाना विकार वाढवत जातो , गाडी ,घोडे ,बँक बॅलन्स सगळे असूनसुद्धा मनाचे चैतन्य हरवले जाते आणि छानपैकी कितीही जगायचे म्हटले तरीदेखील पथ्थ पाणी आणि बंधनात आपले स्वपन आपण विसरून जातो . मला वाटते आयुष्य जगताना स्वतःला काही वेळ दिला पाहिजे, बचत करताना जीव मारुन जगण्या ऐवजी आनंदी  जगत  बचत केली पाहिजे.  मेहनतीने ,कष्टाने , पैसा कमावलाच पाहिजे पण तो योग्य वेळी, योग्य ठिकाणी स्वतःसाठी खर्च सुद्धा केला पाहिजे आणि प्रत्येक क्षण आनंदात जगायला शिकले पाहिजे. प्रेमाने माणसे जोडता आली पाहिजेत .मी या पृथ्वीवर कशासाठी आलोय, माझ्याकडून निसर्गाची अपेक्षा काय आहे. मला पाठिमागे काय ठेऊन जायचे आहे व सोबत काय घेऊन जायचे आहे. याचा सखोल विचार करुन साधक बाधक आयुष्य आपण कसे जगू शकतो ,हलकेफुलके  राहून उंच भरारी कशी  घेऊ शकतो  आणि मोठी स्वप्न पाहताना खूप मोठे व्हायचे आहे हे मनाशी ठरवून सुद्धा मी माझ्याकडे दुर्लक्ष करणार नाही ना ? मी माझ्यासाठी ईतरांचे नुकसान करतो का ? मी मला हवं ते मिळवताना मी ते आपुलकीने मिळवतो का याचाही विचार मनात आला पाहिजे . क्षणभंगुर आयुष्य पुन्हा नाही ,ते एकदाच आहे छानपैकी जगता आले पाहिजे, श्रीमंत  होताना ईतरांनाचा तळतळाट न घेता सरळमार्गी मी जगलं पाहिजे,  बघा नक्की तुम्हाला जिंकता येईल आणि यशस्वी होता येईल... तुम्हाला काय वाटते ,सुख कशात आहे, नक्की सांगा बरं ! 
 माझे जीवन जगण्याचे प्रयत्न ...
विजय पिसाळ नातेपुते... 9423613449
9665936949

रविवार, २८ ऑगस्ट, २०२२

आरक्षण तिढा आणि पर्याय !

चालू घडामोडींचे विश्लेषण

आरक्षण ! आरक्षण !! आरक्षण !!!  हा तिढा कायमचा सुटू शकतो !

भारत देशात हजारो जाती आहेत आणि त्यांची घटनेनुसार विभागणी ही , सर्वसाधारण , ओबीसी, एस सी आणि एसटी या चार गटात झाली आहे. हे ध्यानात घेता  या चा गटांची प्रत्येक ,राज्यात स्वतंत्र  जातनिहाय जनगणना का होत नाही ?  
जर जातनिहाय जनगणना झाली तर नियमानुसार सर्व चारही घटकांना लोकसंख्येच्या नियमानुसार  प्रतिनिधित्व देता येईल व   न्याय देणे सुसंगत होईल हे सरकार लक्षात का घेत नाही ?
 ओपन  गटात , ओबीसी गटात,  एससी गटात, व एसटी गटात जातींची संख्या किती याला काय  महत्व आहे ?
 या  चारही गटांची लोकसंख्या  हेच महत्वाचे आहे .  कारण आरक्षण टक्केवारी नुसार दिले जाते.
जर आरक्षण 50% पेक्षा जास्त देता येत नाही .
50% हीच  जर लक्ष्मण रेषा कायम केलीच आहे तर जातनिहाय प्रत्येक राज्यात स्वतंत्र जनगणना करा व चारही गटांची लोकसंख्या निश्चित करा,  अडचण काय आहे?
जर लोकसंख्या निश्चित झाली तर एससी व एसटी यांना  घटनेतील तरतूदी नुसार  त्यांच्या  लोकसंख्येच्या 100% जागा राखीव ठेवता येतील।
 म्हणजे समजा एसी व एसटी यांची लोकसंख्या ही  22.5 %असेल  तर 22.5 % इतक्या जागा राखीव ठेवता येतील आणि उर्वरित 77.5%  मध्ये  ओपन व ओबीसी यांची लोकसंख्या निश्चित करुन  आरक्षित जागा निश्चित करता येतील .  समजा ओबीसीं मधील  एकूण जातींची लोकसंख्या  30%  असेल तर त्यांना 15% जागा राखीव ठेवता येतील  ,समजा ओबीसी सर्व जातींची मिळून  एकूण लोकसंख्या 40 % असेल तर त्यांना   20% राखीव जागा ठेवता येतील, जर ओबीसीं जातींची  लोकसंख्या 60% असेल  तर त्यांना  30% जागा राखीव ठेवता येतील . 
पण महाराष्ट्रात व इतर बर्याच राज्यात सुध्दा  कोणतीही जनगणना  झाली नाही आणि आरक्षण मात्र विविध जातींना  दिले गेले आहे .विशेष म्हणजे बर्याच जातींना कोणताही मागासवर्ग आयोग गठित न करता आरक्षण दिले गेले आहे . संबंधित जातींचे मागासलेपण सिध्द न करता आरक्षण वाटले आहे . हा ओपन जातीतील लोकांवर अन्याय नाही का ?  कोणाच्याही आरक्षणाला विरोध नाही पण नियम आणि कायदे सर्व जाती घटकांना समान अाहेत ,म्हणून घटनेतील तरतूदी नुसार व कोर्टाने जे सांगितले आहे त्या नुसार लोकसंख्येच्या 50%  आरक्षण दिले पाहिजे. आणि मागासलेपण सिध्द करुनच ते दिले पाहिजे. 
पण यावर  महाराष्ट्रातील कोणताही राजकीय नेता ,सत्ताधारी किंवा विरोधक  आणि ओपन समाजातील प्रत्येक जातींचे नेते जातनिहाय जनगणना झाली पाहिजे हे ठामपणे का बोलत नाहीत. जातनिहाय जनगणना झाली तर आणि तरच आरक्षित वर्गांची लोकसंख्या निश्चित होईल आणि त्यांना त्यांचा घटनेनुसार वाटा निश्चित करुन  ,सर्व गटांच्या लोकसंख्येच्या टक्केवारी नुसार त्यांच्या सामाजिक कल्याणाच्या योजना , निधीची तरतूद  व आरक्षणाची टक्केवारी निश्चित करता येईल. 
म्हणून सर्वच लोकांनी सरकार कडे जातनिहाय जनगणनेचा आग्रह धरावा आणि सरकारवर या साठीच प्रेशर आणावा तरच आरक्षणाचे प्रश्न निकाली निघतील अन्यथा हे भिजत घोंगडे कायम त्रासदायक ठरणार व पुन्हा पुन्हा आंदोलने होत राहणार.
विजय पिसाळ .नातेपुते.

शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०२२

काय ती झाडी ! काय ते डोंगर !!!

शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०२२

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव !!


चालू घडामोडींचे विश्लेषण


*स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव !*
भारताला स्वातंत्र्य मिळून येत्या 15 ऑगस्टला 75 वर्ष होत आहेत . 

*महात्मा गांधींजींच्या आंदोलनाने, सुखदेव, भगतसिंग, राजगुरू यांच्या बलिदानाने , सुभाषचंद्र बोस,  यांच्या जहाल विचारांनी आणि हजारो भारतीयांच्या बलिदानाने  आपल्या भारताच्या  स्वातंत्र्याची मशाल पेटली* लोकमान्य टिळक ते महात्मा गांधी हा स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास फार मोठा आहे . तत्कालीन काँग्रेसने व काँग्रेसच्या नेतृत्वाने  अहिंसेच्या मार्गाने जी चळवळ उभारली ती चळवळ जगाच्या इतिहासातील एक सुवर्ण पान आहे.
 लाखो भारतीयांनी गांधीजींच्या नेतृत्वात इंग्रज सरकार विरुद्ध   असहकार  ,भारत छोडो , परदेशी मालावर बहिष्कार  चलेजाव  अशा विविध आंदोलनात भाग घेऊन इंग्रज सरकार विरुद्ध रणसिंग फुंकले . 
इथल्या लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी जुलमी  इंग्रज सरकारचा लाठीमार सहन केला, कित्येकांना तुरुंगवास भोगावा लागला , मागे वळून पाहताना आपल्याला फक्त सावरकरांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली हे माहित आहे पण त्या बरोबरच हजारो भारतीयांनी  काळ्या पाण्याची शिक्षा भोगली हे आंदमानातील सेल्युलर जेलच्या दप्तरात निश्चितपणे पहायला मिळते , कित्येकांनी  हालअपेष्टा सहन केल्या जणू घरावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्य संग्रामात स्वतःला झोकून दिले , 
इंग्रज सरकारचा निषेध करण्यासाठी एकत्र जमलेल्या शेकडो नागरिकांवर 
जालियनवाला बागेत जनरल डायरने केलेल्या गोळीबार केला व  शेकडो निरापराध भारतीयांना भारतमातेसाठी प्राणांची आहुती द्यावी लागली .  हे आपण इतिहासात वाचले आहे , जुलमी इंग्रज सरकारने तेंव्हा  मिठावर  सुद्धा कर लावला  गरिबांना मीठही  खायला  महाग घ्यावे लागेल म्हणून मिठावरील कर रद्द करण्यासाठी महात्मा गांधी यांनी पोरबंदर ते दांडी यात्रा काढली  आणि मुठभर मीठ उचलून इंग्रजी सत्तेचा पाया कमकुवत करुन  टाकला .   हे अहिंसेचे यश आहे.  कित्येक लोकांना सावरकरांनी सुटकेसाठी लिहलेली  माफी पत्रे  पटत नाहीत पण जुलमी  इंग्रज सरकार विरुद्धचा लढा बुद्धीच्या बळावर दिला पाहिजे कारण आपण तुरुंगात खितपत पडून स्वातंत्र्य चळवळ पुढे कशी जाणार हाही विचार असला पाहिजे,    भारतीयांनी
स्वातंत्र्याचा लढा सर्व ,जाती,धर्मातील, लोकांनी  एकजुटीने  लढला आणि भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले . स्वातंत्र्य   फुकट मिळाले नाही !
 म्हणून स्वातंत्र्य कसे मिळाले याची आपण पुर्णपणे उजळणी केल्या शिवाय ,स्वातंत्र्याचे महत्व आपल्याला समजत नाही किंवा पारतंत्र्य काय होते हेही लक्षात येत नाही. स्वातंत्र्य समर इतके मोठे आहे की हजारो पाने लिहिली तरीदेखील कमी पडतील .
15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले पण भारताने कोणत्या दिशेने जायचे आहे हे ठरवले  नव्हते कारण स्वातंत्र्य मिळत असतानाच इंग्रजांनी फोडा व राज्य करा नीतीचा अवलंब केल्याने  अखंड भारताती फाळणी  होऊन व धर्माच्या अधारावर पाकिस्तानाची निर्मिती झाली पण महात्मा गांधी , पंडित नेहरू यांच्यामुळे भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनला ,इथे हिंदु ,मुस्लिम, शिख ,इसाई ,बौद्ध असे सगळे जण आपण भारतीय म्हणून स्वतंत्र भारतात गुण्या गोविंदाने एकत्र नांदु लागलो.
म्हणून तर आपल्या भारताला आपण।  "सारे जहाँ से अच्छा हिंदोस्था   हमारा "    असे म्हणतो .
15 ऑगस्ट 1947 पर्यंत इंग्रजांनी भारताची पुर्णपणे लुट केली होती ,  भारत हा केवळ  इंग्रजांच्या पारतंत्र्यात खितपत पडलेला देश होता .
 इंग्रजाच्या लुटीमुळे  आपला देश तेंव्हा खूप मागे  पडला होता .   भारताला 1947 नंतर शुन्यातून नव्याने सुरवात करावी लागली .
पण भारताने
स्वातंत्र्या नंतर आपल्या प्रगतीची हळूहळू सुरुवात केली , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 जानेवारी 1949 ला मजबूत संविधान दिले , कार्यकारी मंडळ ,कायदेमंडळ, न्यायपालिका आणि स्वतंत्र निवडनुक आयोग या स्वतंत्र संविधानिक यंत्रणा   मिळाल्या व भारताची लोकशाही मजबूत होऊ लागली. भारताने 1947 ते 2022 या 75 वर्षात शुन्यातून जणू  विश्व निर्माण केले ,इस्त्रो , भाभा अणुशक्ती केंद्र, एम्स ,अशा जागतिक दर्जाच्या संस्था निर्माण केल्या ,  संशोधन केंद्र उभारली  शेकडो किलोमीटरचे रस्ते , संपूर्ण देशात वीज , पाणी  रस्ते या गरजा पुर्ण करतानाच शिक्षणाची  व्यवस्था केली ,  जल विद्यूत केंद्र, औष्णिक विद्युत केंद्र, शेकडो रेल्वे स्टेशन आणि भारतभर रेल्वेचे जाळे निर्माण केले ,  राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानतळांची निर्मिती केली , शेकडो धरणांची उभारणी केली व त्या  माध्यमातून शेतीला व शहरांना पाणीपुरवठा होऊ  ,माहिती तंत्रज्ञानाच्या बाबतीत स्वर्गीय राजीव गांधी यांनी यांनी योग्य पावले उचलल्यामुळे संगणकीय तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारताची जगात  ओळख निर्माण  झाली, माहिती व तंत्रज्ञान यात परिपूर्ण कौशल्य मिळवलेले मनुष्यबळ  संपूर्ण जगाला  पुरवण्याचे काम आपला देश करत आहे.  आपल्या देशाने हरितक्रांती केली व  आपल्या शेतकऱ्यांनी आपला देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केला .
आपल्या देशाची अन्नधान्याची  गरज भागून कोठ्यावधी डॉलरची  अन्नधान्य, फळे ,भाजीपाला निर्यात आपण करत आहोत. 
भारतातील अभियंते ,डॉक्टर, यांनी जागतिक स्थरावर आपल्या कामाचा  ठसा उमटवला आहे. इथल्या उद्योगपतींनी  व व्यापाऱ्यांनी देशाच्या प्रगतीला फार मोठा हातभार लावला आहे. 1947 पासून ते आत्तापर्यंतच्या सर्व  पंतप्रधानांचे ,राष्ट्रपतींचे व प्रत्येक राज्यातील सरकारांचे भारताच्या प्रगतीत खूप मोठे योगदान लाभले आहे. प्रत्येक सरकाने  एक एक वीट रचली व त्याला जनतेने साथ दिली  म्हणून  भारत राष्ट्राची मजबूत इमारत उभी राहिली .  भारत हा संशोधनात पुढे गेला आणि शस्त्र सज्ज राष्ट्र म्हणून उदयाला येत आहे. आपण यशस्वी अणुचाचणी करुन जगातील मोजक्या देशाच्या पंक्तित स्थान मिळवले आहे.
स्वातंत्र्या  नंतरच्या या 75 वर्षात भारताने चौफेर प्रगती साधली आहे .भारत प्रत्येक क्षेत्रात आज पुढे जाताना पाहून सर्वांना अभिमान वाटतो . माहिती तंत्रज्ञान , खेळ ,मनोरंजन ,शिक्षण ,आरोग्य , शेती सहकार या बाबतीत भारत जगाला मार्गदर्शक ठरलेला आहे.
 भारतीय पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून भारतीय महिलांनी  सुद्धा या देशाच्या प्रगतीला फार मोठा हातभार लावलेला आहे.  म्हणून तर इथल्या महिला ,परराष्ट्रमंत्री, अर्थमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती  या सर्वोच्च पदावर बसल्या !
 काश्मीर ते कन्याकुमारी ,  मुंबई ते कलकत्ता  हिमालय ते सह्याद्री ,  अशा आपल्या महाकाय देशात  विभिन्न चालीरीती , विभिन्न भाषा , विभिन्न संस्कृतीचे लोक एकत्र   राहतात व भारतीय म्हणून सगळे एकसंघ असतात .  प्लेगची साथ असो की पोलिओ निर्म्युलन असो ,कुपोषणाचा विषय  असो  की ,अलिकडच्या काळातील कोरोना महामारीचा विषय असो  आपण सगळ्यांनी प्रत्येक संकटांचा मुकाबला एकजुटीने केला आहे .   
देशावर वेळोवेळी येणाऱ्या संकटात आपले सैनिक, पोलिस, शास्त्रज्ञ ,  डॉक्टर , इंजिनिअर आपला जीव धोक्यात घालून काम करतात आणि त्यामुळे आपल्या एकजुटीने प्रत्येक राष्ट्रीय संकटावर आपण मात करतो . स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना आपल्या देशाने खूप प्रगती केली आहे तरीदेखील आपल्या पुढे काही आव्हाने सुद्धा  निश्चितपणे आहेत , आजही खूप मोठी जनता दारिद्र्यात जीवन जगत आहे ,वाढती लोकसंख्या यामुळे शहरावर भयंकर ताण पडत असून झोपडपट्ट्यांची स्थिती भयंकर आहे ,कित्येक मुला मुलींना आजही खराब रस्त्यांनी ,डोंगर दर्यातून    पायी चालत शाळेपर्यंत जावे लागत आहे . तरुणांच्या हाताला काम मिळणे कठीण झाले आहे. राजकीय नेते खोटी अश्वासने देऊन दिशाभूल करत असतात, आरक्षणाचे विषय नीट हाताळता आले नाहीत , जातनिहाय जनगणना नाही त्यामुळे , प्रत्येकाला न्याय  वाटा किती मिळाला पाहिजे हे समजत नाही .भ्रष्टाचार कमी होत नाही.   देश पोखरला जात आहे , गरिब व  श्रीमंत यात दरी वाढत आहे . काळ बदलला मात्र जाती धर्माच्या भिंती उलट गडद होत आहेत .  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतानाच  आपले शेतकरी बांधव आत्महत्या करत आहेत , यावर योग्य धोरणांची  ठोस कृतीची गरज आहे. सगळ्यांना सगळ्या क्षेत्रात  समान संधी  मिळत नाही. पर्यावरणाचा गजर आपण करतो पण सरकार कडक पावले उचलत नाही व 
 आपणही  भारताचे सजग नागरिक म्हणून प्लास्टिक बंदी स्वतःपासून करत नाही . प्रचंड वृक्षतोड होत आहे मात्र वृक्षसंवर्धन पाहिजे तेवढे होत नाही. स्वच्छता ,
कचरा व सांडपाणी यावर   आपल्याला भरपूर काम करावे लागेल .
खडोपाडी ,झोपडपट्टी परिसरात उघड्यावर शौचाला जाणारांची आजही लक्षणीय संख्या आहे. यापुढच्या काळात आपण सर्वांनी  यावरही सरकारच्या खांद्याला खांदा लावून काम करावे लागेल . आरोग्य दक्ष , व्यावसाय शिक्षण , सार्वजनिक स्वच्छता व स्वयंशिस्त यातून पुढची पिढी घडवावी लागेल . 

"जहाँ  डाल डाल पर सोने कि चिढिया करतीथी बसेरा, ओ भारत देश था मेरा"

असा भारत आपण सर्वांनी मिळून परत एकदा घडवायचा आहे .
चला चर मग स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करुया आणि सशक्त भारताला बलशाली बनवूया  !
वंदे मातरम् ! भारत माता की जय !
जय जवान ! जय किसान !! जय विज्ञान !
धन्यवाद !©® विजय पिसाळ नातेपुते !

सोमवार, २५ जुलै, २०२२

मुले जेंव्हा मोठी होतात

चालू घडामोडींचे विश्लेषण


मुलं जेंव्हा मोठी होतात !
मुलगा असो की मुलगी जेंव्हा मुलं  मोठी होऊ लागतात ,तसे प्रत्येक आई वडिलांना त्यांच्या उच्च शिक्षणाची ,भविष्याची ,करिअरची  काळजी वाटायला लागते. मुलं अभ्यासू असतील ,मेहनती असतील तर आई वडिलांना खूप समाधान वाटते ,  आणि मुलांसाठी  कितीही त्रास सहन  करायची तयारी आईवडीलांची असते ,  मुलांसाठी प्रत्येक  आईवडील धडपड करतात , गरिबातील गरिब आईवडील सुद्धा आपल्या मुलांसाठी काहीही करायला तयार होतात. आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे, आणि आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रत्येकाला धडपड करावी लागते. मग उच्च शिक्षण असो की व्यावसाय असो ! या स्पर्धेच्या युगात आपल्या मुलांनी उंच भरारी घ्यावी ,आपले नाव उज्वल करावे यासाठी मुलांचे  आईवडील सगळे प्रयत्न व मेहनत  करत असतात.  मुलांचे यशस्वी जीवन हेच आईवडीलांनी पाहिलेले स्वप्न असते आणि यासाठी  आईवडील हे मेहनत करतात, बचत करतात , प्रसंगी उपाशी सुद्धा राहतात   हे करत असताना  मुलांसाठी  कोणतेही क्षेत्र निवडताना मुलांच्या आवडी निवडी काय आहेत हे पाहतात का ?  त्यांची काय इच्छा आहे हे लक्षात घेतात का ? आपल्या आवडी जशा   महत्वाच्या  असतात  तशा मुलांच्या आवडीनिवडी काय आहेत हे पाहतात का ? आपले मत मुलांवर न लादता 
त्यांना ज्या गोष्टीत करिअर करायचे आहे ,त्यासाठी आईवडीलांनी प्रोत्साहन दिले तर त्यांच्या स्वप्नांना बळ मिळते . जवळपास सर्व मुलांची बौध्दिक पातळी असते पण घरातील वातावरण ,आईवडीलांचा मुलांशी होत असलेला संवाद यातूनच मुले घडतात, मुलांशी जर मैत्री केली त्यांना समजून घेतले ,त्यांचा आत्मविश्वास वाढवला ,त्यांच्या पंखाना बळ  दिले तर मुले निश्चितपणे आपले कर्तृत्व सिद्ध करतात,  घरात मुलांशी आईवडीलांनी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या पाहिजेत ,आपुलकीने बोलले पाहिजे , तरच मुले दडपण घेत नाहीत, यश मिळवण्यासाठी , फार दडपण देण्याची गरजच नसते फक्त त्यांना अतिउच्च ध्येय गाठण्यासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक असते .
आणि संस्कारात घडलेली मुले आपोआपच आईवडीलांचे नाव मोठे करतातच . मुलं मोठी झाली की त्यांना जे आपण लहानपणी पासून घडवले आहे ,संस्कार दिले आहेत त्याप्रमाणे वागत असतात, मुले मोठी होत असताना जर घरातील वातावरण छान असेल तर त्यांच्या अंगी नम्रता निर्माण होते. अशी मुले ,नोकरी ,व्यवसाय व नागरिक म्हणूनही  यशस्वी होतात. 
मुलांना समजून घ्यावे लागते। त्यांना मानसिक आधार द्यावा लागतो .त्यांचा  मित्र परिवार, त्यांची उठबस, त्यांची विचार पद्धत समजून घ्यावी लागते . 
मुलांकडून अवास्तव अपेक्षा न ठेवता त्यांचा कल हेही तपासावे लागते तरच मुलांचे करिअर यशस्वी होते.
मुले मोठी जेंव्हा मोठी होतात तेंव्हा त्यांना समजून घेतले पाहिजे. त्यांच्याही मतांचा आदर केला पाहिजे, यश अपयश ,आनंद , दुःख, नैराश्य अशा प्रत्येक वेळी त्यांच्या सोबतीला असले पाहिजे , मुलांचा एखादा निर्णय चुकला तर त्याला नाउमेद न करता नवी दिशा दाखवली पाहिजे, त्यांच्या मनातील भावना समजून घेतल्या पाहिजेत .मुलांना वारंवार चुकांची जाणीव करून देताना त्यांच्या मनात अपराधी भावना निर्माण होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. मुलांशी कधीही दुरावा निर्माण झाला नाही पाहिजे. मुलांनी कायम आपल्या बरोबर मनमोकळेपणाने बोलले पाहिजे असे वातावरण घरातील असले पाहिजे.  मुलांना प्रोत्साहन देत असतांना, कर्तव्य, जबाबदारी या बाबतीत जरुर अवगत केले पाहिजे पण मुलांवर कधीही आपल्या विचारांचे ओझे देऊ नये.  प्रत्येक आईवडीलांनी मुलांची  सावली बनावे पण इतकीही सावली बनू नये की त्या सावलीत त्याची वाढ खुंटली जाईल.   मुलं मोठी झाली की आपणही ती मोठी झाली आहेत याची जाणीव मनात ठेवली पाहिजे.  आईवडील हे मुलांसाठी पाझरणार्या झर्या सारखे असले पाहिजे , म्हणजे मुलांना माया ,ममता मिळेल व सदैव सोबत राहतील, मुलं मोठी झाली की आपल्या रागावर नियंत्रण हवे , त्यांनाही चांगले वाईट समजते यावर आपला विश्वास हवा  ,  मुलांना मानसिक आधार हवा असतो ,मुलांना शाबासकीची ,कौतुकाची थाप हवी असते , मुलां त्यांच्याशी आदरयुक्त नाते हवे असते . 
याची जाणीव प्रत्येक आईवडीलांनी ठेवली तर मुले घडतात हे नक्की..©®
विजय पिसाळ नातेपुते.
9423613449



बुधवार, ८ जून, २०२२

जायंटस् ग्रुप ऑफ सातारा च्या अध्यक्षपदी श्री . रविराज गायकवाड यांची निवड!

चालू घडामोडींचे विश्लेषण









आमच्या शालेय जिवनातील असंख्य मित्रांनी शुन्यातून विश्व निर्माण केले आहे आणि  त्यापैकीच एक यशस्वी व्यावसायिक. . 
आमचे मित्र मा . श्री रविराज रामराव गायकवाड  यांची  जायंटस् ग्रुप ऑफ सातारा च्या सन २०२२ / २०२३ या वर्षासाठी अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे .  *रविराज तुमचे खूप खूप अभिनंदन* 
रविराज गायकवाड हे आमचे इयत्ता ५ वी ते १० वी  पर्यंतचे शालेय मित्र, रविराज यांनी  अगदी शुन्यातून कष्ट करत शिक्षण घेतले , इंजिनिअरींग नंतर  काही दिवस जॉबही केला पण मुळात काहीतरी करण्याची जिद्द व चिकाटी असल्यामुळे त्यांनी सातारा या ठिकाणी  विविध कंपन्यांचे इन्व्हर्टर  आणि बॅटरीचे होलसेल आणि रिटेलचे दुकान सुरु केले .  प्रामाणिक काम करण्याची सवय आणि लोकांना सेवा देण्याची धडपड व अंगात उपजत कष्टाची तयारी यामुळे  अल्पावधीतच रविराज यांना मोठ्या बँका , पतसंस्था ,  बिल्डर, मोठे काॅन्ट्रॅक्टर यांच्या ऑर्डर मिळाल्या व व्यवसायात भरारी घेतली . सातारा सारख्या शहरात व्यवसायिक   बस्तान तर  बसवलेच पण सामाजिक कार्याची आवड, नेतृत्व करण्याची क्षमता यामुळे ते जायंटस् ग्रुप ऑफ साताराशी जोडले गेले ,  सामाजिक व राजकीय क्षेत्रातील खूप मोठा मित्र परिवार त्यांनी निर्माण केला ,  सातारा जायंटने लोकांसाठी आरोग्य शिबीरे , वृक्षारोपण,  रक्तदान शिबिरे,    पुरग्रस्तांना मदत, आपघात ग्रस्तांना मदत,  विविध व्याख्याने असे विविध उपक्रम राबवले  आणि सर्वसामान्य लोकांना खूप मदत केली . जायंटस् ग्रुप ऑफ सातारा हा प्रतिष्ठित लोकांचा सामाजिक काम करणारा ग्रुप आहे.  तसेतर आम्ही जीवलग मित्र आहोत पण  आमचे दोघांचे  वैचारिक व राजकीय  मतभेद आहेत मात्र  मित्र म्हणून आम्ही खूप जवळचे आहोत आणि वैचारिक आणि राजकीय मतभेद असतानाही आमच्यात कधीही कटुता आली नाही . आम्ही  आपआपल्या मतावर  ठाम राहतो , टोकाचा विरोध करतो पण मैत्रीत कधीच कटुता येऊ देत  नाही कारण आम्ही विचारांनी परिपक्व आहोत. 
रविराज यांची जायंटस् ग्रुप ऑफ साताराचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याचे कळताच मनाला खूप आनंद झाला  आणि  आपल्या मित्राला नवीन जबाबदारी मिळाली व मित्राच्या सामाजिक कामाचे सार्थक झाले ही भावना ह्रदयात निर्माण झाली .  रविराज यांना पुढील काळात अजून खूप काम करण्याची संधी मिळावी ही परमेश्वर चरणी प्रार्थना ! 
विजय पिसाळ नातेपुते.