मला आज थोडं लिहायचं आहे परत एकदा तुझ्या आठवणीत रमायचं आहे.
बालपणी लागला तुझा लळा !
तुझ्यामुळेच मी पाहिला पाटी पेन्सिल व फळा !
माझी आवडती तुच एक शाळा !
मित्र मैत्रीणी आणि सोबती तुझ्यामुळेच झाले गोळा !
सर्व सुखांची एक तु आठवण !
जीवलगांची ह्यदयात साठवण !
खरंच तुझ्यावर कितीही लिहिलं तरी मला शब्द कमी पडतील पण तुझ्या आठवणी संपणार नाही.
होय मी विजय पिसाळ ,नातेपुते !
एक सामान्य मध्यवर्गीय कुटुंबातील सर्वसाधारण विदयार्थी म्हणून तुझ्या कडे आलो आणि तुझ्यामुळेच मी घडलो ! ©®विजय पिसाळ नातेपुते. 9665936949
हो हो मी माझी प्रिय शाळा डॉ. बा.दाते प्रशाले बद्दल थोड व्यक्त होतोय ! मनापासून लिहिण्याचा प्रयत्न केलाय शेवटपर्यंत वाचाल ही अपेक्षा करतो ...
मी विजय शंकरराव पिसाळ व माझे सगळे मिञ व मैत्रिणी यांनी1987 /1988 या वर्षी दाते प्रशालेत प्रवेश घेतला आणि तिच्या अंगणात खेळू लागलो शिकु लागलो , मस्तपैकी आनंदाने दिवस घालवत होतो किती मजेचे ते दिवस होते , प्रशालेच्या सहवासात असतांना माझी शाळा या विषयावर खूपदा मराठीत मोडकी तोडकी पत्र लिहिली. निंबध लिहिले तेंव्हा मराठी विषयात जेमतेम मार्क मिळायचे म्हटलं तर मी सर्वसाधारण विदयार्थी अगदी कसेबसे पासिंग आणि हस्ताक्षर तर खूपच खराब .. पण, आज आनंदाने माझ्या शाळेविषयी लिहिताना अभिमान वाटतो म्हणून हा लेखन प्रपंच कारण, मला व माझ्या मित्र मैत्रीणींना तुझी येणारी आठवण व आमच्यातील घट्ट मैत्रीचा तुच एक धागा , तुझ्या मुळे आम्हाला डॉक्टर, इंजिनिअर ,वकील शिक्षक ,तर कुणी सामाजिक क्षेत्रात काम करणारे तर कुणी तुझ्या संस्कारातून तयार झालेली अभ्यासू मित्र व मैत्रिणी मिळालेत , खरेतर बारावी परीक्षेनंतर( 1995 )तुझ्या पासून दूर जात असताना वाटायचं आता मस्तपैकी कॉलेज करुया , मौजमजा करुया , स्वच्छंदी जगुया , आपले विश्व खूप मोठे होईल आणि पंखांना बळ येईल म्हणून बारावी नंतर काही वेळ आनंदी जीवन जगायला मिळेल असं वाटायचं , ग्रॅज्युएशन झालं ,पोस्ट ग्रॅज्युएशन झालं तरीही मी शाळेपासून दुर गेलो याच फार वाईट वाटलं नाही. कारण त्या वयात एकच धारणा होती ‘शाळा’ नावाच्या पिंजऱ्यातुन माझी आता एकदाची सुटका झाली !...
आता आकाशात मी स्वच्छंदी झेप घेतली ... या कल्पनेत मी रममाण झालो होतो ,मी वेगळ्याच हवेत होतो असेच थोडक्यात .. जेंव्हा मी कॉलेज व पी जी पुर्ण केलं तेंव्हा मला समजलं नाही आपली तीच ती शाळा होती व त्या शाळेची मजा जगातील कोणत्याही ठिकाणी गेला तरीही येणार नाही.
आता मात्र मी जेंव्हा केंव्हा शैक्षणिक आयुष्यात डोकावतो ,चर्चा करतो तेंव्हा आजच्या या धकाधकीच्या, धावपळीच्या जगरहाटीच्या तथाकथित आयुष्या पेक्षा या उंच आकाशापेक्षा मला माझ्या दाते प्रशालेचा पिंजरा, हो तो पिंजराच किती छान होता ,किती सुरक्षित होता याची वारंवार प्रचिती येते .. छडी मिळाली तरी दुःख नाही की , परिक्षा जवळ आली म्हणून कधी टेंशन नाही . खरोखर खूप
दंगामस्ती करायची, खूप खेळायचं ,एकमेकांचे डबे खायचे , एकमेकांना चिडवायचे हो , खूप खूप बिनधास्त भांडण करायचे पण कधीच खुन्नस नसायची एक दिवसात परत जीवलग मैत्री असायची , मी मुलांशी काही मुलींशी तेंव्हा खूप भांडलो पण कधी त्यांचे बद्दल राग नसायचा कारण मैत्री म्हटलं की भांडण पाहिजेच , खिजवायला हवंच ,मस्त वाटतं , आजही मी गंमतीने भांडतो , खेचाखेची करतो ,सगळे समजदार असल्यामुळे तात्पुरते चिडले तरीही आपलेपणा जपतात , वैचारिक मतभेदांना मैत्रीत थारा देत नाहीत आणि म्हणून मला माझ्या शाळेतील मित्र मैत्रीणींचाही अभिमान वाटतो , तेंव्हा एखादी गोळी सुद्धा आनंद द्यायची खरंच ते दिवस आठवले की मन भरून येतं , चिंचा ,बोरं किती मनसोक्त खालली आम्ही , खरचं सगळे मित्र मैत्रीणी खूप छान आहेत अगदी वयाने मोठे आहेत पण आपलेपणा तोच आहे , काहींची परमेश्वरी इच्छेमुळे एक्झिट झालीय पण त्यांच्या आठवणी सुद्धा तशाच सतावत असतात , म्हणून आम्हाला आमच्या शाळेची जाता येता आठवण येते , आमची शाळा मात्र तशीच जाता येता उभी आहे ...
आजही वाटत दाते प्रशालेच्या पिंजऱ्यामध्ये पुन्हा एकदा जाऊन बसावं पाठीवर दप्तर घेऊन यावं ..परत तीच घंटा वाजावी , वाघ मामा , साळवे मामा , अभंगराव मामा, वसगडेकर मामा यांनी वाजवलेल्या घंटेचा आवाज परत परत कानी यावा .....
राऊत सरांनी परत एकदा म्हणावं परेड सावधान ! परेड विश्राम !
जोशी मॅडम यांनी सुंदर पटी वाजवत , प्रार्थना व
राष्ट्रगीत आणि पसायदान म्हणावे होय ती प्रतिज्ञा आणि रोज वेगळी प्रार्थना म्हणायची इच्छा आहे. एन बी दिक्षीत सरांचा तबला कानावर पडावा आणि आम्ही तल्लीन व्हावे ...
फळ्यावर भरते सरांच्या सुंदर हस्ताक्षरात लिहिलेला सुविचारही वाचायचा आहे.
बडवे सर , जमदाडे सर , कुचेकर सरांचे
विज्ञानाचे प्रयोग कुतूहलाने पाहावेत ...
गणिताच्या एस पी दिक्षीत सरांनी परत एकदा लसावी व मसावी व प्रमेय शिकवावीत , हो सगळे आलेख काढूनच जायला लागेल पण हरकत नाही , एस पी दिक्षीत सर म्हणजे विद्यार्थी घडवणारे मनापासून आवडणारे गुरुवर्य आणि आयुष्यभर ज्यांचे उपकार फिटणार नाही असे व्यक्तीमत्व, वाया गेलेला विद्यार्थी मुख्य प्रवाहात येण्यासाठी दिक्षीत सरांचा खूप मोठा वाटा आहे.
शिंदे सरांच्या इंग्रजी तासाला जर लक्ष दिले असते तर कदाचित वेगळ्या वळणावर असलो असतो, सर खूप जीव तोडून शिकवायचे पण मी कधीच इंग्रजीचे पुस्तक उघडले नाही, शब्द पाठांतर केले नाहीत की मनापासून इंग्रजी शिकली पाहिजे असे तेंव्हा वाटले नाही.
इयत्ता दहावीला ढोपे सर जर इंग्रजीला आले नसते तर कदाचित पहिल्यांदा डबल परिक्षा द्यायला लागली असती , ढोपे सरांनी व्याकरण खूप चांगले करुन घेतले आणि म्हणून माझी गाडी पुढे सरकली , जैन सर , कसबे सर, ढवळे मॅडम, बर्वे मॅडम साळवे सर, असे अनेक शिक्षकांनी शिकवताना कधीच भीती वाटली नाही. राऊत सरांनी खेळाच्या बाबतीत खूप चांगली प्रॅक्टिस घेतली आणि खेळाचा मनसोक्त आनंद घेतला ,
खोचरे सरांनी व एन बी दिक्षीत सरांनीही खेळाच्या तासाला भरपूर खेळ शिकवले ,तसेच खडतरे सरांच्याही तासाला मजा यायची !
बाबर सरांचा
मंत्रमुग्ध करणारा इतिहास परत परत ऐकायचा आहे...इतिहास म्हणजे पाठांतर करायला आवडणारा विषय मनापासून आवडायचा
आणि हो
इयत्ता पाचवी ,सहावी,सातवी व आठवी ,नववी पर्यंत ढवळे मॅडम यांचा मराठीचा तास हवा पण दहावीसाठी मात्र मला परत एकदा मराठीचं व्याकरण जोशी मॅडम यांच्या कडून शिकवायचय कारण तेंव्हा फळ्याकडे थोडं कमी लक्ष होतं म्हणून माझं कधी कधी लिहितांना दिर्घ र्हस्व चुकतं !
आणि मला आठवी ते दहावीला एम पी के मॅडम
संस्कृतसाठी पाहिजेत ,कारण अनेक सुभाषितं विसरलोय , उजळणी व पाठांतर हवं आहे. ब मधून अ मध्ये जायचंय व खास संस्कृतच्या तासाला बसायचं आहे, मन लावून सुभाषित ऐकायची आहेत !
मधल्या सुट्टीत घरुन आणलेला डबा आणि मित्रांचा डबा एकत्र खायचाय , मनसोक्त कबड्डी, खो-खो , खेळायचं आहे
आणि स्काऊट गाईडसाठी परत एकदा ,मांडवे , शिंगणापूर व धर्मपुरी बंगला या ठिकाणी ,
तीन तीन दिवसांची शिबीर पाहिजेत , सोबतीला डी डी के सर, जाधवर सर , कसबे सर , स्वामी सर ,डांगे सर , एन बी दिक्षीत सर असतीलच ,
ग्रंथालयात जास्त गेलोच नाही पण जेवढी पुस्तकं शशी काकांकडून आणली तेवढी मी मन लावून दारी धरत वाचली व अजून वाचावी वाटतात ... एखाद्या ऑफ तासाला बाकावर कान ठेवून तबला पण वाजवावा वाटतोय किंवा दंगा करत बसावे वाटतंय , मला अजूनही आठवत, एकदा मैदानावर खेळायला गेलतो व मुली मात्र वर्गातच होत्या मी अचानक वर्गात आलो तर माझे दप्तर गायब झाले , बघतोय तर दप्तर व माझ्या सगळ्या वह्या पुस्तके पोरींच्या हातात 😃 पटापट दप्तर व वह्या पुस्तके माझ्याकडे आले,मी पण काय बोललो नाही व त्या पण बोलल्या नाहीत, विषय समाप्त नाहीतर परत आम्हालाच मार मिळाला असता राऊत सरांचा !
26 जानेवारी व पंधरा ऑगस्ट स्वच्छ गणवेशात झेंडावंदन करायला जावसं वाटतंय नानासाहेब देशमुख, आर एफ दोशी , चंद्रकांत घुगरदे अशी मोठ्या उंचीची माणसे व शिस्तप्रिय व्ही एस कुलकर्णी सर यांना परत एकदा पहायचं आहे ..होय
वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाषण केलेलं बक्षिस स्काऊट गाईडचा गणवेश घालून घ्यायचं आहे. रनिंग व वेट लिप्टिंग मध्ये मिळवलेला पहिला नंबर परत काढायचा आहे. शामची आई परिक्षा द्यायला व जोशी मॅडम यांचेकडून शिकायला आवडेल, स्वामी विवेकानंद यांचा वेश परिधान करुन , स्वामी विवेकानंद यांचं अमेरिकेतील ते भाषण परत एकदा विजय चित्र मंदिर या ठिकाणी म्हणायचं आहे.
पहिल्यांदाच भरते सरांनी पाठांतर करुन घेतले होते व मेकअप पण केला होता!
"All Americans are my Brother and sister" याने सुरुवात करायची व चित्रपट गृहात टाळ्यांचा कडकडाट हवाच , " रघुनाशेठ उराडे, शांतीलाल शेठ गांधी, जंबुकुमार दावडा अशा मोठ्या लोकांसमोर तो कार्यक्रम होता.
वार्षिक स्नेहसंमेलनात , ग्रामपंचायत पटांगणात ,विजय पिसाळ ,बापु रुपनवर ,सुधिर काळे व अजून कोणतरी मिळून एक नाटक केलं होतं तेही परत करायचं आहे.
आणि प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात इयत्ता दहावीत असताना स्काऊट गाईडचा संघनायक म्हणून पाहुण्यांना व ध्वजाला सलामी द्यायची आहे फक्त स्वामी सर हवेत सराव घ्यायला ! खाकी हाफ पँट ,अजूनही आठवते , रस्त्यावरुन मोठ्याने ....भारत माता...की......जय.....अशी आरोळी ठोकायचीय !
परीक्षेच्या कालावधीत पाठांतर करायचे आहे तेही घरची कामे करत करत , इतिहास, भुगोल, नागरिक शास्त्र, विज्ञान, गणित, भुमिती ,इंग्रजी खूप खूप छान शिकायचे आहे व सारा अभ्यास करायचाय... आवडत्या विषयांचे पेपर सोडवताना पुरवण्या जोडलेली उत्तरपत्रिकाही लिहायचीय...
खर सांगू शाळेत जेवढं शिकवलं तेच डोक्यात बसायचं घरी कामं खूप असायची त्यामुळे होमवर्क कधी पुर्ण होत नव्हता , गणित व इतिहास , विज्ञान व भुगोल मनापासून आवडायचे , व म्हणून मनापासून शाळेत येऊन बसायचे आहे व शाळे सोबत घालवलेले ते आनंदाचे क्षण पुन्हा एकदा अनुभवायचेत . खरं मला सायन्सची आवड होती अकरावीत फार समजत नाही मी एच के सरांच्या तासाला थोडा गोंधळ केला व सरांनी माझ्यावर एक तास लेक्चर दिलं ,मला तेंव्हा वाईट वाटलं आणि मी सायन्स सोडून कॉमर्सचा वर्ग निवडा तिथेही अकाउंट, इकॉनॉमिक्स, सेक्रेटरी प्रॅक्टिस , यासाठी पाटील सर , होळ सर यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं , वाणिज्य अशा विषयांचा अभ्यास केला , कॉलेज करताना बि कॉम केले तिथेही स्टँट व मॅथ्स , इकॉनॉमिक्स, अकाउंट ,बँकिंग या विषयांचा अभ्यास करायला मिळाला , अगदी नंतर मी माझ्या आवडीच्या कला शाखेतून , इतिहास, पॉलिटिक्स, सायंटिफिक मेथड ,मराठी व इंग्रजी हे विषय घेऊन ग्रॅज्युएशन केलं व पॉलिटिक्स विषय घेऊन एम ए केलं पण कुठेच दाते प्रशाले सारखा मनापासून आनंद मिळाला नाही .
मित्रांनो आपण परत एकदा आपल्या शाळेत जाऊया ती आपल्याला बोलावते आहे , कदाचित फळे बदलले असतील पण त्याच भिंती ,तेच ग्राऊंड व तिच इमारत पहायची आहे.
होय दाते प्रशाला सांग ना ? मला परत तुझ्याकडे बोलावशील का ?
१२ वी निरोप समारंभाच्या वेळी तेंव्हा मुख्याध्यापक असलेले व्ही एस कुलकर्णी सर यांचे भाषण आजही आठवणीत आहे.
“तुम्ही या शाळेत जे शिकलात ते कितीही मोठे झालात तरी विसरू नका , तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी तुम्हाला या शाळेची आठवण येत राहिल व या शाळेतील आनंदी क्षण तुम्हाला आता पुन्हा मिळणार नाहीत...”
म्हणून वाटते !
ते घालवलेले शाळेतील दिवस आपल्या जीवनात परत येणार नाहीत... याची मला अगदी मनोमन जाणीव आहे...
दाते प्रशालेतीचे या लेखातून ह्यदयापासून आभार मानायचे आहेत . कारण भारत मातेच्या लाखो लेकरांवर हजारो शाळा संस्कार करत असतील पण आपली शाळा व आपले गुरुजन हे केवळ शाळा व गुरुजन नव्हते तर ते साक्षात होते एक विद्येचे माहेरघर , विद्येचे मंदीर व त्या मंदिरात मला व माझ्या मित्रांना ज्ञान देणारे साक्षात परमेश्वर समान गुरुजन , म्हणून मला लिहिण्याचे वेड लागले व बोलण्याचे धाडस प्राप्त झाले ! प्रत्येकाचा मान कसा राखावा , कुणाचा आदर करावा हे धडे कुठल्याच पुस्तकात मिळत नाहीत , त्यासाठी हवी दाते प्रशाला !
माझ्यातील सदसद्विवेकबुद्धी जागृत झाली ती केवळ दाते प्रशालेत बहुसंख्य शिक्षकांनी शिकवलेल्या एका एका धड्यातून , सांगितलेल्या एका एका गोष्टीतून!
जगण्याचं व लढण्याचं बळ प्राप्त झालं ते तिथेच
आज शेती ,व्यवसाय आणि माझ्या आयुष्यात जे चांगल घडलं आहे हे दाते प्रशालेतील सुसंस्कृत ,संस्कारी गुरुजनांचं पाठबळ आहे..
माझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगात, जेंव्हा जेंव्हा मी उंच भरारी घेईन तेंव्हा दाते प्रशालेचा विद्यार्थी म्हणून मी दाते प्रशालेचे नाव उंचावण्याचा नक्की प्रयत्न करेल...©®
श्री विजय शंकरराव पिसाळ नातेपुते…
9665936949
😊
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा