vijaypisal49. blogspot. com

शनिवार, ७ डिसेंबर, २०२४

मराठा समाजाची दिशा काय असावी


चालू घडामोडींचे विश्लेषण

मी शक्यतो
मराठा बांधवांनो  जातीच्या विषयावर लिहित नाही , बोलत नाही किंवा त्यावर जास्त व्यक्त होण्याइतपत मला ज्ञानही नाही. हो मी तुमचा बांधव श्री विजय पिसाळ नातेपुते. तुमच्याशी आज या माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय , माझे तुम्हाला मत पटले तर विचार करा नाही पटले तर सोडून द्या!
तर बांधवांनो मी माझे वैयक्तिक मत तुमच्या समोर या मिडियाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतोय ,नंतर सविस्तर पणे माझ्या युट्युब चॅनलवर व्हिडिओ पण करण्याचा प्रयत्न करेन, खरेतर आपल्या देशात  प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या  जातीचा अभिमान असतो , फक्त कुणी तो जाहीर दाखवतो तर कुणी समाजाच्या कामातून दाखवतो तर कुणी छुपा का होईना जातीचा अभिमान बाळगतो ही मी अनेक ठिकाणी पाहिलंय , अनुभवलंय, व काहींचे अनुभव मला त्यांनी शेअर केलेत , म्हणून तुम्हाला सांगतो आपण समाजासाठी एखादी मागणी करताना , एखादी गोष्ट सरकार दरबारी मांडत असताना इतरांच्याही भावनांना ठेच लागणार नाही याचा विचार करणे आवश्यक आहे, मला मान्य आहे की मराठा समाजात जितके अती श्रीमंत, श्रीमंत लोक आहेत त्यापेक्षा कितीतरी पटीने गरीब पण आहेत , आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काही ठोस मागण्या आपण सरकार दरबारी करायलाच हव्यात , जसे की , गरिब मुलांना शैक्षणिक शुल्क माफी , होस्टेल व मेस मध्ये सवलती,  हुशार मुला मुलींना , स्कॉलरशिप  ,मेडिकल , इंजिनिअरिंग व ज्या ठिकाणी शैक्षणिक फि , खूप जास्त आहे ती फि माफी होण्यासाठी  सरकार दरबारी पाठपुरावा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 
अजून एक अत्यंत महत्त्वाचे , मराठा समाजाला कोणतेही सरकार ओबीसीतू आरक्षण देणार नाही हे अगदी सुर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. फक्त ओबीसी बांधवांना ज्या शैक्षणिक सवलती व जेवढे शैक्षणिक शुल्क भरावे लागते तेच गरीब मराठा समाजाला भरावे लागले पाहिजे यासाठी सरकारवर  निश्चित दबाव टाकणे योग्य राहिल .
  कितीही आंदोलने झाली तरी मराठा समाजात फुट पाडायचे राजकीय डावपेच हे सर्व राजकीय पक्षांना माहित आहेतच , त्यामुळे यापुढे कोणत्याही पक्षाचा नेता आरक्षण  देणार असे बोलत असेल तर ते तो  खोटं बोलतोय हे ध्यानी घ्या ,  मराठा- दलित, मराठा- ओबीसी, मराठा-मुस्लिम , मराठा -ब्राह्मण असे वाद लावून सगळ्या राजकीय पक्षांनी आपआपली पोळी भाजून घेतली आहे पण मराठ्यांच्या पदरात काही मिळालेले नाही, व मराठा समाजाचा राजकारणासाठी वापर अगदी सर्वांनीच केलाय व नेत्यांना त्यातून पाहिजे ते मिळाले आहे पण गोरगरीब मराठ्यांना काहीच मिळाले नाही, म्हणून मराठा बांधवांनो माझी तुम्हाला विनंती आहे,  जो अभ्यासात हुशार आहे त्यांने मन लावून अभ्यास करावा , व फक्त क्षमता असेल त्यांनीच स्पर्धा परीक्षांची तयारी करावी व प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी प्रयत्न करावेत , न्यायपालिका, आयटी क्षेत्र यात विशेष परिश्रम घेऊन संधी प्राप्त कराव्यात तिथे  क्षमता असेल तर तुम्हाला संधी आहेत  पण सरसकट सर्वांनी एकमेकांच्या नादी लागून स्पर्धा परीक्षा देत बसू नये  किंवा सर्वांनीच आयटी क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी इंजिनिअरिंग करु नये पण स्वतःकडे क्षमता असेल तर निश्चित ते क्षेत्र निवडावे अन्यथा वेळ पैसा खूप जातो आणि मानसिक ताणतणाव येऊन जीवनात नैराश्य येते व   इतर क्षेत्रात करिअर करायच्या संधीपण निघून जातात ,  ज्यांना शेती आहे  पाणी आहे  त्यांनी शेतीत मन लावून अभ्यासपुर्ण शेती करावी , शेतीकडे दुर्लक्ष करु नये , शासनाच्या योजनांचा फायदा जरुर घ्यावा पण त्या योजनांसाठी एखादा प्रोजेक्ट बिलकुल करु नये , केवळ आणि केवळ आपले उदिष्ट हे ज्या पिकांना चांगला बाजारभाव मिळू शकतो व ज्या पिकांमध्ये रिस्क कमी असते ती पिके घेऊन , त्याकडे पुर्ण लक्ष देऊन भरघोस उत्पन्न घेण्यासाठी कार्यरत रहावे ,  आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जास्तीत जास्त करावा , बाजारभाव जरी हातात नसला तरी एकाच पिका ऐवजी वेगवेगळी पिके घेऊन व ताजे चलन कसे मिळेल याकडे लक्ष द्यावे , मजूर टंचाई खूप भासतेय त्यामुळे सर्वच क्षेत्र लागवडीसाठी न वापरता काही क्षेत्राला विश्रांती द्या ,  विषमुक्त , सेंद्रिय शेती हे ऐकायला मस्त वाटते पण करायला थोडे कठिण असते म्हणून सेंद्रिय व विषमुक्त शेती करायचीच असेल तर , अगोदर या शेतीच्या मार्केटचा अभ्यास करावा ,  व शेती करताना  पिकांची फेरपालट करा , जरी सरकारी धोरणे शेतकरी विरोधी असली तरी ,  नकारात्मक दृष्टीकोन बाजूला ठेवा आणि ज्या पिकांना सरकार हात लावू शकत नाही अशा पिकांवर लक्ष द्या, सोयाबीन, कापून ,कांदा या पिकांची लागवड थोडी हिशोबात करा व एकरी उत्पन्न कसे वाढेल यावर लक्ष केंद्रित करा , हे झालं शेतीचं , अजून खूप तुमच्याशी शेअर करायला मुद्दे आहेत हळूहळू प्रत्येक मुद्दा मी बोलत राहिल , मित्रांनो  तुम्हाला जिथे कुणाचाही द्वेष ,राग मत्सर शिकवला जात नाही अशा कोणत्याही संघटनेत जायला हरकत नाही पण जास्तीत जास्त वेळ आपल्या कामासाठी, धंद्यासाठी द्या,  बहुजनवाद , हिंदुत्व वगैरे गोष्टी फक्त राजकीय आहेत , त्याने तुमच्या रोजच्या जीवनाचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, तुम्हाला तरीही जावेच वाटले तर नक्की जा पण घरात आपल्या पीठ आहे का  हे पण बघा , आपल्या आई वडिलांना शेतात , धंद्यात मदत करा , नव नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा व कोणतेही काम हलके समजू नका व कोणत्याही व्यवसायाला लाजू नका ,  सकाळी रोज 100 पेंढ्या कोथिंबीर विकून आनंदी व मजेत जगणारे लोक मी पाहतो तुम्ही पण मंडईत जाऊन बघा, फक्त सकाळी दोन तास ,संध्याकाळी दोन तास काम असते,
बांधवांनो  आजचे युग हे खाजगीकरणाचे आहे ,त्यामुळे खाजगी नोकरीत जास्त पगार मिळणार नाहीत किंवा तुम्हाला परमनंट ऑर्डर पण भेटण्याची शक्यता कमीच आहे, म्हणून ज्यांना जमेल त्यांनी न लाजता परिस्थितीनुसार ,  किराणा, ऑटोमोबाईल, हार्डवेअर, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिक,  हॉटेल ,मेस ,पान टपरी ,फर्निचर , वेल्डिंग, पंक्चर , गाड्या दुरुस्ती , रिपेअरिंग , शिलाईकाम असे शेकडो धंदे आहेत करण्यासाठी धडपड केली पाहिजे, काही दिवस जम बसायला लागतो, शून्यातून सुरवात करावी लागते ,पण न खचता काम करत राहिले तर धंदा यशस्वी होतो हे 100% सत्य आहे. 
आणि सगळ्यात महत्वाचे मराठा बांधवांनो आपण मोठेपणासाठी नको तिथे वारेमाप खर्च करतो तो टाळायला हवा, साधेपणा व कमी खर्च यातूनच बचत होऊ शकते, मानवी जीवनात रोज संकटे येतात , त्यामुळे थोडी बचत करा , आणि आपण स्वतः व्यसन करु नका , कुणाला व्यसन लावू नका व जर कुणी व्यसनी होत असेल तर त्याला व्यसनापासून दुर करा , व्यसनामुळे कितीतरी बांधवांनी जमिनी विकल्यात, कितीतरी बांधव कर्जबाजारी झालेत व कितीतरी बांधवांनी आत्महत्या केल्या आहेत,  आणि अजून खूप महत्त्वाचे आपल्या घरात एकनिष्ठ रहा , कुटुंब ही संपत्ती आहे , ती टिकवा , एखादा चुकला तर थोडे दुर्लक्ष करा पण नको तिथे हुज्जत घालून वेळ व पैसा बरबाद करु नका, बाई ,बाटली , नाच गाणे यात जो वहात गेला तो बरबाद झाला हे विसरू नका, जमिनी शक्यतो विकू नका आणि तुम्हाला नवीन प्रॉपर्टी घ्यायची असेल , नवीन चांगली गुंतवणूक असेल  तरच काही जमिन विकायची वेळ आली तरच विका पण शक्यतो जमिनी परत मिळणार नाहीत, याचे भान सदैव असुद्या ,आपल्या  समाजात व इतर कोणत्याही समाज बांधवांबरोबर  कोणताही व्यव्हार करताना  फसवणूक करु नका , विश्वासाला तडा जाईल असे वर्तन केले तर थोडाफार फायदा काही काळ होईल  मार्केटमध्ये नाव खराब होऊन कालांतराने त्याचे वाईट व दुरगामी परिणाम होत असतात, आपल्या घरातील सर्वांना  वाचन ,लेखन याची आवड निर्माण झाली पाहिजे , अध्यात्मिक  पुस्तके , कथा काव्य ,कादंबरी, महापुरुषांची चरित्र , धर्मग्रंथ , आणि यशस्वी लोकांची आत्मचरित्र वाचा  ,त्यातून संस्कार होत असतात हे ध्यानी घ्या , आपले सर्व जाती धर्मातील  शेजारी, आपले भावबंध यांच्या सर्व सुख दुःखात सहभागी व्हा , सर्वांना मदतीची भावना ठेवा , आपोआप तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही, राजकारणात भाग घेताना आपली योग्यता, स्वतःचे सामाजिक काम , याचाही विचार करा ,केवळ आपल्याच बांधवांना त्रास देण्यासाठी , भावकीची जिरवण्यासाठी  राजकारणात भाग घेऊ नका,  आपल्या समाजातील आपल्या गावातील एखादा जर राजकीय दृष्ट्या सक्षम असेल ,त्यांना किंमत असेल तर पायात पाय घालू नका, तो मराठा असो की कोणत्याही जातीचा असो  नेहमी सपोर्ट करा तरच तुमची कामे होतील  व इतर समाजातील कोणत्याही नेत्याबाबत खालच्या लेवलला जावून टिका करु नका, त्याने तुमचे संस्कार दिसून येतात, 
मराठा समाजाचा कुणीही शत्रू नाही, ब्राह्मण, मुस्लिम, ओबीसी, दलित बांधव हे हजारो वर्षापासून मराठा समाजाचे नैसर्गिक मित्र आहेत , कुणीही आपला विरोधक नाही, कुणीही आपला स्पर्धक नाही व कुणीही आपल्याला त्रास दिलेला नाही , आपले सर्व जाती धर्मातील लोकांशी पिढ्यानपिढ्या  ऋणानुबंध राहिले आहेत, एकमेकांना सर्वांनी मदत केलीय हा इतिहास आहे, काही वाद हे सर्व राजकीय पक्षांनी पेरलेले आहेत व त्यापासून आपण सावध असले पाहिजे.
आपल्या घरी सर्व जाती धर्मातील लोक येतात व त्यांचे आदरपूर्वक स्वागत आपण करतो हे संस्कार आपल्यावर आपल्या पूर्वजांनी केलेत याचा विसर पडू देऊ नका , आपल्या समाजातील काही प्रश्न सोडवण्यासाठी इतरांना टार्गेट करणे हे अत्यंत चुकिचे आहे,
हो मी पण माझे शेतीचे प्रश्न मांडताना सरकार विरुद्ध लिहितो पण व्यक्तीगत द्वेष ,जातीय चेष्मा  म्हणून माझे लिखाण नसते, राजकीय भुमिका वेगळी व सामाजिक काम ते मराठा समाजाचे असो कि ,  बाकीचे सामाजिक काम असो तिथे कोणताही पुर्वग्रह नको की कुणाच्या भावनांना ठेच नको ,
न टिकणारे आरक्षण रद्द करावे व ईडब्ल्यूएसचा लाभ समाजाने घ्यावा हे माझे मत आहे.
आणि सर्वात महत्वाचे सरकार कडे जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी आग्रही रहावे , सर्वांची संख्या समजली तर प्रत्येक समाजाला त्याचा फायदा होईल व सरकारला सुद्धा सर्व समाजाच्या गोरगरीब लोकांसाठी योजना राबवताना सर्वांना लोकसंख्येच्या पटीत आर्थिक तरतूद करता येईल.
मला खूप बोलायचं आहे लिहायचं आहे पण सर्वांना माझे मत रुचेल असेही नाही.©®
विजय पिसाळ नातेपुते.
9665936949

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा