vijaypisal49. blogspot. com

बुधवार, २२ ऑगस्ट, २०१८

देव

देव. . . .

देव समजने . . देवावर भाष्य करणे तसे महा कठीण आहे पण एक विचार मनाला पडलेले प्रश्न देवापुढे मांडावे म्हणून हा लेखन प्रपंच. .

मला माझ्यासाठी काहीही नकोय पण देवाच्या शोधात आहे . मि . .
तसाही मि नास्तिक नाही , परमेश्वरावर माझी नितांत श्रद्धा आहे . मला तर  देवाचा शोध घ्यायचा आहे.  पण माझी तेवढी तपश्चर्या नाही , त्यामुळे मला देव भेटणार नाही पण माझी देवाच्या बाबतीत जी माझी विचारधारा आहे, जी  कल्पना आहे . ति तरी मांडवी म्हणतो . .
मला तसाही कोणत्याही पोतीपुराणाचा ,धर्मग्रंथाचा   बिलकुल अभ्यास नाही,  त्यामुळे मग मला जो आजपर्यंत देव सांगण्यात आला तोच मि खरा माणत आलो . . .
कुणी देवाचे नामस्मरण करायला सांगितले ते मि करायचा प्रयत्न केला , कुणी रात्रंदिवस जप तप करायला सांगितले तेही करण्याचा माझ्या परीने प्रयत्न  केला  ,
कुणी मला देवासाठी प्रार्थना करायला सांगितल्या ते पण झाले , कुणी मला उपवास करायला सांगितले ते पण केले .
कुणी सांगितले देवाला फुले आवडतात तिही वाहिली . .
कुणी सांगितले अभिषेक घाला. . नारळ फोडा . . देवाला भरपुर दक्षिणा ठेवा तेही केले , अन्नदान करा तेही केले ,
गोडधोड नैवेद्य करा ,
एकादशी धरा, चतुर्थी करा, ते पण केले . .
पण मला तरी अजून देव काही कळला नाही . .
मि तरीही देवाची मनोभावे पुजा अर्चा जे जे सांगितले ते ते सर्व केले पण देव अजूनही कळालाच नाही . .
सतत मन विचारात असते ,देव म्हणजे काय?  तो कसा असेल? मालिकेत दाखवलेला की , मंदिरात कोरलेला की, संत महात्मे , महाराज यांनी सांगितलेला . .
पाप म्हणजे काय?
पुण्य म्हणजे काय?
कसं ठरवायचं हे , कुणी कुणी तर कुणाच्या तरी सांगण्यावरून  देवासाठी जागरण करतो  , कुणी गोंधळ घालतो (करतो ).  कुणी
देवाच्या नावाने बोकड, कोंबडा याचा बळी देवून शांतता करायला सांगतो .
अरे वेड लागायची वेळ आली पण देव समजेना . .
कुणी शुभ्र वस्त्र परिधान करतो ओल्या कपड्याने पुजा घालतो व महाराज होतो, कुणी भगवी , कुणी हिरवी कपडे घालून देवाचा कट्टर भक्त असल्याचे, साधू बैरागी असल्याचे भासवतो . कुणी वेगवेगळ्या कथा सांगतो संदर्भ देतो . . भक्त करायला सांगतो !
काहीजण आपल्या बुद्धी चातुर्यातून गोड ओजस्वी , मधाळ वाणीतून आपआपल्या परीने देव सांगत असतो !
खरच कित्येक महाराज, कित्येक, प्रवचनकार, किर्तनकार, सन्यासी यांचे कडून देव ऐकला पण अजून नाही समजला ! प्रत्येकाची मांडणी वेगळी, सांगण्याची कला वेगळी, आणि स्वतःच्या कल्पनेतून  देव सांगण्या पाठीमागचा सुप्त हेतूही वेगळा . .
पुरता गोंधळ निर्माण झाला , काय करावे , हिमालयात जावे कि आश्रमात जावे कि अजून कुठे कुठे शोधावे देवाच्या रुपाला . कोणती पुस्तके वाचावीत प्रत्येकात वेगळेच?
खरचं नारळ फोडून देव पावतो का ?
खरचं देवाला नवस केलेला चालतो का ?
असे हजारो प्रश्न मनात काहूर निर्माण करतात,
जगातील जवळपास ९० %लोक देवाला मानतात, तसा मिही देवाला मानतो .
पण मन मात्र देवाच्या सानिध्यात कधी लागत नाही तर का बरं असे घडते ! मि भाग्यवंत नाही , मि लायक नाही !
देवाच्या नावाने जे चालू आहे तेच देव कसे सहन करतो याच विचारांत मन  गुंतून जाते रे  !
किती बोकडे, किती कोंबडे, कापले  किती तरी पाने फुले , झाडी कापली , तोडली यज्ञ झाले देवाच्या नावाखाली तरीही देव शांत असतो . ..मुक्या प्राण्यांचा छळ करून वेदना देवून दुध काढलेले , देवावर ओतले जाते, दही , तुप, बरेच काही !
परमेश्वर, देव या एकाच गोष्टी मुळे मनात कधी श्रद्धा तर कधी भितीही उत्पन्न होते , देवापासून दुर गेले तर नास्तिक म्हणून संभावना व देव भेटण्यासाठी कितीही प्रयत्न केला तरी देव काही भेटेना ! हे द्वंद्व कधी संपणार?
 प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भावना,  कल्पना , यातून होणारा गोंधळ हे सर्व   केले तरी देव कधी भेटेल याचाही कुणीही शाश्वत मार्ग  सांगत नाही,  जणू  मार्ग मिळणे कठीण?
काय करावे . . . दुष्काळ पडला ,
पुर आला , भुकंप आला . . नैसर्गिक आपत्ती आली कि काहीजण या भूमिवर पाप जास्त झाल्याचे कारण देतात व अंतिम सांगतात देवाचा प्रकोप झाला . . मन विषण्ण व्हावे असे काही तरी सांगितले जाते . .
देवभूमीत जेंव्हा जेंव्हा प्रकोप होतो तेंव्हा सरसकट पापी पुण्यवंत असा कुठलाही भेदभाव झालेला आजपर्यंत तरी  पहायला मिळाले  नाही ,,पुण्यवंत वाचलेला दिसत नाही कि पापी दुराचारी संपलेला दिसत नाही ,  प्रचंड पुराचे पाणी असो की, अजून भूकंप असो लहान लहान चिमुकली बाळे . . आयुष्यभर कुणालाही कसलाही त्रास न देणारी चांगली माणसे हो जी माणसे रात्रंदिवस जप तप करत होती, पुण्याचा मार्ग सांगत होती तीही  क्षणात अर्तकिंकाळ्या देवून विव्हळत औषध पाण्याविना तडफडत मरत असताना नाही पहावत . . देव कसा असा प्रकोप करेल?
त्यानेच निर्माण केलेल्या सृष्टीचा कसा विध्वंस करेल. . कित्येक उपासक साधक हे केदारनाथला वाहून गेले क्षणात सारे संपले . . होय का घडावे हे . . .
मन सुन्न होते मन खिन्न होते ह्रदय पिळवटून जाते . .
मला देव बघायचाय मला देव शोधायचाय. . या साठी काय करावे हेच सुचेना . .
सुसंस्कृत देव भूमीवर  आज बलात्कारी, दहशतवादी , गुंड, पुंड, चिरीमिरी साठीही खून करणारे ,  माजलेले पाहतोय रोज. . पांढर्या पेशात पुढारी असो कि उद्योगपती लुट करतायत, ग्रामपंचायती पासून संसदे पर्यंत देशाची बिनबोभाट लुट होते , आणि सर्वच पक्षीय ति करत आले आहेत,  याच भूमीवर गरिबांच्या तोंडातून घास काढून, सरकारी बँका ,पतसंस्था ,  साखर कारखाने , मोठ मोठे सरकारी ,  उद्योग  सरकारी तिजोर्या लुटल्या गेल्या,  हजारो कोटी बुडवले गेले , कित्येकांची संपत्ती लाखो कोटींची झाली . .
सत्तेवर जो असेल तो चार पाच वर्षात हजारो कोटींचा मालक होतोय, राजकारणी कुणीही असो ?  काबाडकष्ट कष्ट करणारा मात्र उपाशी राहतोय. .
तरीही पाप पुण्याचा हिशेब लागेना देवा . .
तरीही तुझ्यावरील माझी भक्ती , श्रद्धा तुसभर देखिल कमी होत नाही व होणारही नाही देवा . .
पण मला तुला शोधायचय. .
हो आज मला देव भेटला पाहिजे . .
रस्त्यावर फिरणाऱ्या भिकार्याचे अश्रु पुसण्यासाठी, वेश्या गृहात जबरदस्तीने पळवून नेहून डांबून ठेवून रोज बलात्कार सहन करणार्‍या नाबालिकांना न्याय देण्यासाठी . . घरात घुशी उंदर खेळणार्या झोपडपट्टीतील बांधवांना किमान पाय लांबवुन झोपता यावे यासाठी . .
रोज कर्जापाई कंटाळून आत्महत्या करणार्‍या शेतकर्यांना न्याय देण्यासाठी मला देव भेटला पाहिजे . . कोणताही उपवास करेन मि, कोणताही नवस करेल पण मला देव भेटला पाहिजे . .
बैलापेक्षाही काबाडकष्ट करणार्‍या पाट व पोट खापाटीला गेलेल्या व दोनवेळच्या घासासाठी ८० वय असतानाही धड चालताही येत नाही अशा अवस्थेत  जगण्यासाठी लोकांच्याकडे मोलमजुरी करणार्‍या वृद्ध आजी आजोबांसाठी मला देव शोधायचाय. .
होय मि देवा तुझी आराधना करेल, होय सर्व कर्मधर्म करेल पण तु भेटला पाहिजेस. .
दहा दहा किलोमीटर चिखलातून, झाडीझुडपातून काट्याकुट्यातून शाळेसाठी जेंव्हा मुले मुली जाताना पाहतो ना तेंव्हा इथल्या राजकीय नेत्यांना सुबुद्धी दे हेच मला सांगायचेय तुला . .
गरिबांच्या रेशनच्या धान्याचा होणारा काळाबाजार बघवत नाही रे ,  घरकुलाच्या बिलासाठी चिरीमिरी खाणारे . . मुलांसाठी आलेला तांदूळ सुद्धा खातात रे देवा . .
मि आवाज नाही उठवू शकत रे,  आवाज उठवणारा या ठिकाणी मारला जातो . .
तुझ्या नावाने जो बाजार मांडलाय तो मला पहावत नाही त्यासाठी तुझीच मदत लागेल मला कारण मला कोण पाठिंबा देणार?  कारण मि असंख्य लोकांच्या जगण्यावर भाष्य करतो म्हणून तुच साथ दे बाबा . .
कदाचित कुणीही मला काम करू देणार नाही .
लगेच गुंड पुंड छळतील रे बाबा म्हणून तु साथ दे . .
माझ्यावर आरोप लावले जातील मला बदनाम केले जाईल पण देवा जे चालू आहे ते तरी कसे पाहू . .
तुझ्या नावाखाली गरिबांच्या अज्ञानाचा , कमी शिक्षणाचा अचूक फायदा घेऊन लुट चालू असते रे देवा . .
देवा जे जास्त शिकलेले आहेत त्यांनाही वेडे केले जाते . त्यासाठीच संमोहण शास्त्र आहेच की , बदलत्या वातावरणामुळे होणारे आजार, घरातील कटकटी , विविध बाह्य घटकांचा होणारा रोजच्या जीवनातील बदल अचूक हेरला जातो, वाढती लोकसंख्या गंभीर समस्या निर्माण करते रे मग त्यातून एकतर तुझ्या नावाखाली किंवा पुर्वजांच्या नावाखाली किंवा वास्तुशास्त्रातील दोष सांगून तथाकथित सुशिक्षित लोकांनाही  वेडे बनवून, घरात मोडतोड करायला सांगून, विविध शांती करायला सांगून मोठा गोरखधंदा राजरोसपणे चालतोय देवा . .
पण जो कोणी धारिष्ट्य दाखवेल तो वैकुंठाला तरी पाठवला जातोय किंवा मॉर्निंग वॉकला जाताना मारला तरी जातोय. ..मारली गेलेली तुच बुद्धी दिलेली लेकरे होती ना ?
तु जशी बुद्धी दिली , तु जशी अज्ञा केली तसेच ति तुझी लेकरे लिहणार ना ?
तुच या जगताचा चालक पालक व तुच त्राता आहेस ना ? मग तुझ्या लेकरांना मारताना तु का पाहतोस तु का तुझ्याच दोन लेकरांत वाद निर्माण होतात, तुझे नियंत्रण कमी झाले की काय? 
हो देवा कसा उलघडा करावा याचा ? तुझ्याच एका लेकरांनी तुझ्याच दुसर्‍या लेकरांचे   कितीही खून केले ? किती खून  पचवले पण
त्यांना का  नाही लागत पाप? का देत नाही शिक्षा ?
देवा जागृत हो तु, तुझी ही पावन व पवित्र भुमी आज रक्त रंजीत होतेय रे ?
मला तु भेटला पाहिजे देवा . .
मन व्याकुळ आहे तुला भेटण्यासाठी . .
तुझ्या नावाने लाखोंचे चढाव होतात. .
लाखोंची वर्गनी गोळा होते . . तिचे काय होते कोण जाणे . . .
करोडोंची उलाढाल चालते पण तुझाच पैसा तुझी मनोभावे पुजा उपासना करणार्‍या , ज्यांनी हा पैसा तुझ्या दानपेटीत टाकला , त्या गोरगरीब कष्टकरी, आत्महत्या करणारे शेतकरी यांच्यासाठी तु वापरायला कधीतरी सांग रे . . त्यांना . . .
तुच निर्माण केलेली काही तुझीच लेकरे तुझ्या नावाखाली खूप मोठी होतात रे , बंगले,  गाड्या , तुप रोटी सर्व मिळते त्यांना व दुसरीकडे तुझीच लेकरे झोपडपट्टीत, स्वतःची जागाही नसते त्यांना वाईट अवस्थेत जगतात उपाशी मरतात. .
कशासाठी त्यांची निर्मिती करतोस रे बाबा ?
तु तर सर्वांची निर्मिती करतो तुच पालनपोषण करणारा , तुच दीनदुबळ्यांचा त्राता  , अरे हेच गरिब तुझ्यावर जास्त निष्ठा ठेवतात, सर्वकाही तुझी भक्ती करतात पण तु त्यांच्याकडे काहीतरी पहात जा ?
अरे तुझ्याच लेकरातून कसाकाय भेदभाव करतोस  रे तु, कुणाला तु उच्च कुळीत!  कुणाला तु एकदम कमी लेखल्या जाणार्‍या जातीत कसे टाकतो ?
तुच  का ही उच्च निचता नष्ट करत नाही . .
कशासाठी हा माणसा माणसात भेदभाव करतोस. .
तुझी पुजा, अभिषेक,  एखाद्या भिकार्याच्या हातून होवू देत की,
व्हीआयपी पास, व्हीआयपी दर्शन रांगा यातही तु गरिब श्रीमंत असा का भेदभाव करतोस. .
कुणाला शे पाचशे दिले की , तुझे डायरेक्ट दर्शन देतात रे करून हे लोक. .
पायी चालणारा ३० दिवस घरदार सोडणारा , ऊन, पाऊस, वारा, याची तमा न बाळगणाऱ्या भक्तांना दर्शनासाठी ४८ तास तुझी वाट पहावी लागते रे. मात्र जनतेला रोज फसवणारे, खोटे बोलून जनतेचा पैसा लुटणारे , शाळा कॉलेज महाविद्यालय स्थापन करून हजारो कोटी डोनेशन घेऊन मोठे झालेले तुझ्या जवळ लगेच कसे येतात? तुझ्याच मंदिर समितीचे अध्यक्ष सुद्धा होतात!  दर्शनाला तुलाही पायी चालणार्या भक्तापेक्षा श्रीमंत भक्त जास्त भावतात का ?
पांडूरंगा कधीच वारीत न चालणरा तुझ्या पवित्र मंदिर समितीचा अध्यक्ष होतो . त्याची नियुक्ती करतानाही सरकारला तु सुबुद्धी देत नाही !
असंख्य निःस्पृह असताना श्रीमंतच कसा अध्यक्ष होतो . .
म्हणून मला देवाला भेटायचय. .
मि ऐकांतात असतो तेंव्हा देवा मन व्यथित होते रे . .
एकिकडे भरभरून असताना दुसरीकडे मात्र दोनवेळचे जेवण सुद्धा नसते रे या पवित्र भुमिवर कशासाठी निर्माण करतो गरिबांना ?
ठेवायचे असेल तर सर्वांनाच समान ठेव ना ?
नाहीतर फक्त श्रीमंतांनाच जन्माला घाल की ?
माझी तक्रार नाही ही माझी तुला विनंती आहे . तुझ्या जवळ येण्यासाठी बरेच जण
 रात्रंदिवस नामस्मरण करायचा सल्ला देतात, जप तप करायला सांगतात, मग मला प्रश्न पडतो तुझ्या चरणी जागा मिळावी म्हणून सगळेच नामस्मरण करायला लागले तर शेती कोण पिकवणार  . . तुला लागणारे अभिषेकाच्या  दुधा साठी गायी कोण पाळणार?
मजूरी कोण करणार, कारखाने कसे चालणार. .
सगळे बंद पडल्यावर जनता काय खाणार?
तु कष्ट करणार्‍यांना भेटणार नाही का ?  तुला फक्त नुसता जप करणारेच हवेत कष्ट करून कोट्यवधी लोकांची भुक भागवणारे नकोत? त्यांना तुझ्या ह्रदयात जागा नाही का ?
त्यांना तु कधी प्रसन्न होणार नाही का ?
देवा सांग मार्ग तुझ्या जवळ येण्याचा !
अजून बरेच देवा तुझ्या कडे मागायचेय, तु जशी बुद्धी देशील तसे लिहायचंय, मि हे लिहतोय तेही तु दिलेल्या बुद्धीनुसार, तु दिलेल्या हातांनी राग नको मानु !
मला तुच दिलेली बुद्धी आहे , तुच दिलेले हे शरीर आहे व तुच जे माझ्या बुद्धीला सुचवले तेच लिहतोय!
माझे यात स्वतःचे काहीही नाही !

विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा