vijaypisal49. blogspot. com

शुक्रवार, ११ मे, २०१८

शेतकरी समाज संपण्याच्या वाटेवर!

शेतकरी समाज संपण्याच्या वाटेवर!

खेड्यातील सुखी समृद्ध भारत, कृषीप्रधान भारत ही देशाची ओळख संपण्याच्या मार्गावर आहे , वाढती लोकसंख्या , लोकसंखेवर आधारीत शहरात वाढणारे लोकसभा व विधानसभांचे मतदारसंघ यामुळे ग्रामीण भागातील कमी होणारे प्रतिनिधीत्व व शहरी लोकांना समोर ठेवून घेतले जाणारे निर्णय यामुळे ग्रामीण शेतकरी संपण्याच्या मार्गावर आहे, आज ज्यातून शेतकर्यांना हक्काचे चार पैसे मिळत होते, तो दुध धंदा पुर्णपणे तोट्यात आहे, पाण्याची किंमत सुद्धा दुधाला नाही , साखर कडू झाल्याने ऊसाला बाजार नाही, कित्येक साखरकारखाने आजारी आहेत, बंद पडत आहेत, दिवाळखोरीच्या वाटेवर आहेत,साधी एफआरफी देवू शकत नाहीत,  तेलबिया , सोयाबीन, मका, कापूस, कांदा , तुर या पिकांच्या बाजारभावाची परिस्थिती तर  भयानक आहे , भाजीपाला , फळभाज्या याला मार्केटमध्ये कवडीमोल किंमत मिळत आहे .
या विदारक परिस्थिती मुळे ग्रामीण अर्थकारण पुर्णपणे कोलमडले आहे,
मुला मुलींची लग्ने रखडली आहेत, मुलांना शिक्षण द्यावे म्हटले तर हातात पैसा नाही ,वादळी वारे, अवकाळी पाऊस, गारपीट, हे तर जणूकाही पाचवीलाच पुजलेले आहे , वेळी अवेळी होणारे भारनियमन, सतत बदलणार्या भारनियमनाच्या वेळा काय काय वाढून ठेवले शेतकर्यांच्या नशीबी देव जाणे ,
काहीही कारण नसताना कॅनॉल लगतच्या व नदीकाठच्या शेतकर्यांचा खंडीत केला जाणारा वीजपुरवठा यामुळे शेतकरी पुर्णपणे खचला आहे ,हैराण आहे  पाणी चोरणारे मोकाट व सर्वसामान्यांचा वीजपुरवठा खंडीत करणे हे महावितरण व इरिगेशनचे काम मोघलशाहीलाही लाजवेल असे आहे , ऊन्हाळ्यात पिकांना पाण्याची गरज असते , विहिरीत पाणी असतांनाही केवळ इरिगेशनचे  अधिकारी व महावितरणचे अधिकारी शेतकर्यांचा छळ करत आहेत, उभी पीके जळताना शेतकर्यांचे ह्रदय सुद्धा जळत आहे . शेतकर्यांनी जगाचे कसे हा प्रश्न आवासून निर्माण झाला आहे ,
बँकेच्या  कर्जाने, व  सावकारी कर्जाने शेतकरी घायाळ झाला आहे . तो पुर्णपणे घायला आलेला असतांना , शेतकर्यांना कोणताही दिलासा मिळत नाही , नुसत्या घोषणांचा पाऊस चालू आहे पण ग्राऊंड लेव्हल वर विकासाचा थेंब सुद्धा पडत नाही ,
शहरात भाजीपाला , फळे, धान्य, दुध,  मांस, अंडी स्वस्त मिळावीत म्हणून विविध मार्गाने निर्यातीत अडथळे आणून, तोच शेतमाल कवडीमोल दराने शहरात कसा जाईल अशी व्यवस्था निर्माण केली जाते आहे!
शेतकर्यांना लागणारे बरेच घटक २८%जीएसटीत आहेत यामुळे आज ग्रामीण भारत मरणासन्न अवस्थेतून जात आहे , "बाप भीक मागू देईना व आई जेवायला घालेना "अशी अवस्था या देशातील शेतकर्याची करून टाकली आहे , यातून मार्ग काढायची भाषा नाही , कोणताही दिलासा नाही , रोज धर्म आणि जातीचे ढोल बडवून समाज दुभंगला जाईल अशा पद्धतीने सर्व गोष्टी केल्या जात आहेत.
ग्रामीण भागातुन शहरात जायचे म्हटले तर शहरी उद्योगपती , कारखानदार हे कंत्राटी पद्धतीने कामगार ठेवतात ग्रामीण भागातील मुलांना रोजगार मिळत नाही आणि रोजगार कंपनीत मिळालाच तर  ६ महिने झाले की ब्रेक ठरलेलाच असतो !
शासकीय नोकर्या नाहीत, यामुळे प्रचंड वाढलेली बेरोजगारी व त्यातुन निर्माण होणारी गुन्हेगारी व गुन्हेगारीतून वाढणारे खून व बलात्कार आणि जातीय ताणतणाव, या दृष्टचक्रात सापडलेला तरूण कसा बाहेर येणार,
गावात साधे बांधकाम करायला सुद्धा वाळू भेटत नाही , नियतीने कोणता सुड उगवला हे कळायला मार्ग नाही ,
ग्रामीण भागातील कुणालाही शिक्षण परवडत नाही केवळ नैराश्य व चिंतेचे वातावरण आज जवळून पहावे लागतेय!
शिक्षण, नोकरी , व्यवसाय, धंदा या शिवाय तरूण पिढी भरकटलेल्या अवस्थेत जगते आहे . या सर्वांचा परिणाम मुले व्यसनी बनत आहेत, मावा , गुटखा , दारू तंबाखू , मटका याच्या आहारी जात आहेत, या सर्वांचा परिपाक म्हणून तरूण शेतकरी आत्महात्या करत आहेत,
असो हेही वेळ जाईल तरूण परत पेटून उठेल, ग्रामीण भारत नव्याने झेप घेईल, पण एक पिढी बरबाद झाली आहे ति तुम्हाला कधीच माफ करणार नाही !
जय जवान, जय किसान!
भारत माता की, जय!
विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा