vijaypisal49. blogspot. com

शुक्रवार, ११ मे, २०१८

गरिबांना मोफत शिक्षण मिळायला पाहिजे का?

सर्व जातीतील गरीब मुला मुलींना सर्व प्रकारचे शिक्षण मोफत किंवा माफक फिमध्ये मिळण्याची व्यवस्था व्हावी का ?

आज सर्वच जातीमध्ये गरिबांची संख्या लक्षणीय आहे, ज्यांच्याकडे शिक्षणाची आस आहे. शिक्षण घेण्याची इच्छा आहे पण घरातील मर्यादित उत्पादनाची साधने , अशिक्षित आईवडील, खेड्यातील जीवनमान, शहरात रहात असेल तर झोपडपट्टीतील राहणीमान, आठराविश्व दारिद्र्य  अशा  परिस्थिती मुळे अभ्यासत येणारे अडथळे या विविध कारणामुळे गरिबांची मुले , प्राथमिक शिक्षणापासूनच बाहेर फेकली जात आहेत, त्यामुळे गरिबांचा उच्च शिक्षणातील आलेख फारच कमी आहे . गरिब मुला मुलींचे पालक एकतर रोजंदारीवर कामाला जातात, लोकांच्या घरी मिळेल ती सर्व कामे करतात, किंवा एकदम छोटा मोठा व्यवसाय करतात यात प्रत्येक जातीतील गरिबांचा समावेश होतो, बुद्धी असूनही , पात्रता असूनही , गुणवत्ता असूनही , या मुला मुलींना अर्धवट शिक्षण सोडावे लागते ही गोष्ट समानतेच्या तत्वाविरूद्ध असल्यासारखी वाटते ,
तसे पाहिले तर गरिबी ही जात पाहून येत नाही, श्रीमंत आणि गरिबांची सुद्धा भूक अन्न पाण्याशिवाय भागू शकत नाही , आज खाजगी शैक्षणिक संस्थामध्ये गरिबांना जवळपास प्रवेश मिळणे दुरापास्त झाले आहे. शासकीय शाळा कॉलेज मोडीत काढून खाजगी शिक्षणसंस्थांच्या बाजारात केवळ श्रीमंतांना शिक्षण देण्याची व्यवस्था निर्माण झाली आहे , गरिबांची मुले खाजगी कोचिंग क्लासेस लावू शकत नाहीत, चांगल्या नोट्स मिळवू शकत नाहीत त्यामुळेही गरिबांच्या मुलांची शैक्षणिक गुणवत्ता ढासळत असते . आज शिक्षणाचा बाजार निर्माण झाला याला आळा बसणे केवळ अशक्य आहे , यापुढच्या काळात फक्त श्रीमंतांचीच मुलेच उच्चशिक्षण घेतील की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. गरिबांच्या मुलांनी, आय आयटी, मेडिकल, किंवा इतर दर्जेदार कोर्सेससाठी प्रवेश मिळवण्याची स्वप्न पाहु नयेत का ?
प्रत्येकजण समानतेची , गुणवत्तेची भाषा बोलतो , परिस्थितीच विपरीत असेल, कोणतीही दर्जेदार साधने उपलब्ध नसतील, अभ्यासाला निकोप वातावरण नसेल तर हुशार असूनही चांगली गुणवत्ता कशी दाखवता येईल, जर आई बाप शिपाई, कारकुन, शेतकरी , मोलमजुरी , घरकाम, करणारे असतील तर पैशाअभावी ते मुलांचे व्यवस्थित संगोपन करू शकत नाहीत तर उच्च शिक्षणासाठी दर्जेदार शाळा कॉलेज कसे निवडणार, ट्यूशन कशा लावणार आणि त्याकरिता पैसा कसा उभा करणार,
खरेतर जात पाहून शैक्षणिक फि ठरवण्यापेक्षा गरिबी व श्रीमंती पाहून शैक्षणिक फि ठरवायला पाहिजे शिक्षणाच्या पायाभूत सुविधाच गरिबांच्या मुलांना मिळत नसतील तर ति मुले श्रीमंतांच्या मुलांबरोबर स्पर्धा कशी करणार? शैक्षणिक साधना अभावी मार्क्स कसे मिळवणार, आज बहुतेक ठिकाणी डॉक्टरांची मुले डॉक्टर होतात  , अधिकार्यांची मुले मोठ मोठे क्लास जॉईन करून अधिकारी होतात, केवळ अफाट गुणवत्ता व कुणाच्या तरी वरदहस्तामुळे ५ ते०% गरिबांची मुलेच एम पी एसी व युपीएसीच्या परिक्षांना बसतात व त्यातील काही यशस्वी होतात, बाकीच्यांच्या नशीब एकतर, रोजंदारीवर कामाला जाण्याची वेळ येते, कुणाला खाजगी नोकरदार व्हावे लागते , किंवा मिलिटरी , पोलिस भरती या ठिकाणी प्रयत्न करावे लागतात,
आजच्या परिस्थितीत बहुसंख्य लोकांना शिक्षण परवडत नाही म्हणून ते सोडायची वेळ येते , शासकीय नोकरी नाही, खाजगी नोकरीत कायम होण्याची शक्यता नाही , आणि चांगल्या शिक्षणासाठी पैसा नाही या मुळे गरिब श्रीमंत अशी  प्रचंड तफावत व गरिबांमध्ये  मागासलेपणा निर्माण होत आहे .
याला पर्याय काय नुसते लेख लिहून प्रश्न सुटणार नाहीत तर जनमताचा रेटा लावून खालील उपाय शोधावे लागतील!
गरिबी हा घटक मानून सर्व शासकीय, खाजगी  , अशा शिक्षणसंस्था मध्ये किमान ५० %जागा आरक्षित कराव्या लागतील!
गरिबांच्या मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण द्यावे लागेल!
शैक्षणिक स्कॉलरशिप गरिबांच्याही मुलांना मिळालीच पाहिजे !
शासनाने उच्च शिक्षणात शाळा कॉलेजचा मॅनेजमेंट कोटा रद्द केला पाहिजे !
खाजगी शाळा कॉलेज मध्ये सुद्धा गरिबांना ५० %जागा राखीव पाहिजेत!
अशा पद्धतीने जर उपाय केले नाहीत तर या देशातील गरिबांना मुख्य प्रवाहात येताच येणार नाही व त्यामुळे अराजक स्थिती निर्माण होवून श्रीमंतांना सुद्धा सुखाने झोपता येणार नाही !
दरोडे , चोर्या , खून, हे संपत्तीच्या विषम वाटणीतून होतील?
म्हणून गरिब मुख्य प्रवाहात यायचा असेल तर त्याला श्रीमंताच्या मुलांसारखे गुणवत्तापुर्ण व मोफत  शिक्षण मिळायला हवे आणि शिक्षणात यशस्वी झाल्या नंतर पात्रतेप्रमाणे नोकरीच्या व व्यवसाय, रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हायला पाहिजेत!

विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा