vijaypisal49. blogspot. com

गुरुवार, २५ सप्टेंबर, २०२५

अपेक्षा सरकार कडून, अपेक्षा जनतेकडून

चालू घडामोडींचे विश्लेषण





आमची प्राथमिकता काय असायला हवी?
मायबाप सरकार , मुख्यमंत्री, दोन्ही मुख्यमंत्री महोदय व सुज्ञ नागरिक बंधू भगिनींनो,

  देशातील व महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अनेकदा तुफान  पाऊस  होत आहे.  ढगफुटी म्हणावी की अतिवृष्टी म्हणावी की अजून कोणता  शब्द वापरावा हे मनाला सुचत नाही , अगदी छोटे नाले ,ओढे , व कधीही पुर न येणाऱ्या छोट्या नद्यांना व मोठ्या नद्यांना  अभूतपूर्व  महापूर आलेत. या महापूरामुळे आजुबाजूची शेती अक्षरक्षः वाहून गेली आहे. केवळ शेतीच नव्हे तर मानवी जीवनाची जगण्याची आशाच वाहून गेलीय ,  दुभती जनावरे , शेळ्या ,मेंढ्या , कोंबड्या , जनावरांचे गोठे वाहून गेले आहेत , मुलांची दप्तरे , घरातील सगळा संसार , धान्य कपडेलत्ता , किडूक मिडूक दागिने ,  आणि हसत्या खेळत्या संसाराची सगळी स्वप्न वाहून गेली आहेत , 
नव्हे  जन्मभराची  भिती या महापुराने निर्माण झालीय ,  अनेकांचे बैलं, गायी म्हशी शेळ्या मेंढ्या, बांधलेल्या जागीच जिवंत ठार झालीत जणावरे  सोडायलाही संधी मिळाली नाही ,मुकी जित्राबे अक्षरक्षः जागेवरच नाका तोंडात पाणी जाऊन गतप्राण झाली . एवढंच काय घरातील मांजर आणि दारातील लाडके  श्वान सुद्धा वाचले नाहीत ..  काय लिहावे म्हणजे माणूसकी जिवंत होईल , सर्वांच्या काळजाला /ह्रदयाला पाझर फुटेल ? नद्या  , ओढे , नाले इतके तुंबलेत की आसपासच्या कित्येक हेक्टर  शेतात नुसता गाळ आलाय, कुठे  जमिन वाहून गेलीय तर कित्येकांच्या शेतात जणू समुद्र दिसतोय , ऊस  केळी , डाळिंब ,ही पिकेच नव्हे तर नद्यांपासून लांब असलेली उंच उंच घरे पाण्यात गेलीत , जगाला अन्नधान्य पुरवणारी माणसे आज स्वतःला अन्नाचा कण नाही की पोटात पाणी नाही अशी निरागसपणे , निर्वासित झालीत , आभाळच फाटलय ठिगळ कुठे कुठे लावायचे ?  कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, हळद, आले ,बाजरी कोथिंबीर, हुलगा ,पावटा ,घेवडा मेथी, शेपू , टोमॅटो अशी कमी उंचीची पीकं  पाण्यात सडून गेलीत , आता माता भगिनींना ती फक्त ह्रदयात आणि डोळ्यांच्या आसवात दिसत आहेत.  
ती केंव्हाच समुद्राच्या पोटात  कायमची गतप्राण झाली आहेत… बाजारभाव , आयात निर्यातीचा खेळ ,मजूर टंचाईचा सामना कमी होता की काय ? म्हणुन या सुलतानी संकटाचा सामना करत असताना अस्मानी संकटाचाही कहर झाला आणि आयुष्याचा जणू चिखल झाला ...
दुभत्या जणावरांमुळे किमान संसाराचा गाडा सुरु होता तीच गेलीत, सुरवातीला समाधानकारक पाऊस पडल्यामुळे कर्ज काढून पेरणी केली पिकेही बोलू लागली डोलू लागली आणि स्वप्न पडू लागली,  पिकावर दोन पैसे येतील आणि त्यावर वर्षभर  आपला फाटका तुटका  संसाराचा गाडा स्वाभिमानाने हाकता येईल हा मनाचा हिशोब जणू नियतीने भिकारी केला , स्वाभिमानी शेतकरी जणू कायमच्या सुलतानी आणि या अस्मानी संकटाने लाचार केला , 
घेतलेली पीके आली असती , जनावरे वाचली असती तर माझ्या बळीराजीची स्वप्न काही अंशी तरी साकार झाली असती पण ती स्वप्न   आता राहिली नाहीत. आमच्या बळीराजाला मोठी स्वप्न नसतातच , अगदी छोटी छोटी स्वप्न असतात  त्याची लागवड केलेली पिकं  दिवाळीत  निघतील आणि आपल्या लहान लहान मुलाबाळांना कपडे घ्यायचे , घरात लाडू करंजी शंकरपाळी ,चिवडा चकली एवढं तरी  गोडधोड करून खायचे ?सासरवासी लेकीबाळींना माहेरी बोलवून त्यांनाही सुखाचे चार घास खाऊ घालून, साडीचोळी करायची असते … काहींना  मुला, मुलींची शैक्षणिक फि भरायची असते तर दिवाळी नंतर ठरलेल्या  लग्नासाठी पैसे  ठेवायचे  असतात… म्हातारा / म्हातारीच्या डोळ्याचे ऑपरेशन, किरकोळ दवाखान्यासाठी पैसे  उरतील ही अपेक्षा असते.  अगदी गरिब शेतकऱ्यांनी दुकानदाराकडून पेरणीच्या वेळी उधार आणलेल्या खतांचे ,  बियाण्याचे पैसे द्यायचे होते , काही शेतकऱ्यांना  सावकाराकडून घेतलेले पैसे  फेडायचे असतात, काहींना बँकेचे कर्ज फेडायचे असते … तर काहींना छोटी का होईना पाच दहा हजाराचे  , टिव्ही ,फ्रिज अशी एखादी सुखवस्तू घ्यायची असेल…? आईला, बायकोला मुलीला दोन चार ग्रँमचा  सोन्याचा एखादा दागिना करायचा असेल… लहान लेकराला  एखादं पैंजण घ्यायचं असेल ? डेअरीला दुध घालण्यासाठी ,गावात जाण्यासाठी एखादी मोटारसायकल वाहन घ्यायचं असेल… आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वर्षभर घरखर्चाला पुरेल, एवढा पैसा गाठीला लावून ठेवायचा असेल! पण सगळी स्वप्न धुळीला मिळाली आणी फक्त ओला दुष्काळ , भयावह महापुर डोळ्यात साठला काळीज पिळवटून गेलं , चर्रर्र झालं ..
पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनाचा  , स्वप्नांचा  नुसता चुराडाच नाही तर चिखल झालाय भावांनो. नुसते संसार, शेती व घरदारं , पिकंच नाही ,
 तर त्यांची आयुष्यात ठरवलेली  स्वप्नं बेचिराख झाली निसर्गाने  वाहून नेली आहेत. 
मागे काय उरलंय ? जगण्याची भाबडी आशा , सरकार आणि जनतेच्या मदतीकडे  लागलेले डोळे आणि परत एकदा चिखलातून मार्ग काढत जगण्याचा संघर्ष  !
 भावनांचा , स्वप्नांचा चिखल! 
बांधवांनो ,भगिनींनो  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना , गोरगरीबांना ,   सरकारची मदत  ही तुटपुंजी असू नये, 
 काही काळ  सरकारने इतर योजना पुढे ढकलाव्यात व या लोकांना परत उभे करावे , आपत्ती व्यवस्थापन निधी नावाने थोडाफार टॅक्स जनतेवर लावावा , मंत्री संत्री ,लोकप्रतिनिधी यांचे एक वर्षाचे वेतन व भत्ते या निधीकडे वळवावेत , दोन तीन हजार कोटींनी काय होणार ? किमान दहा ते पंधरा हजार कोटींचा निधी गोरगरीबांना व शेतकऱ्यांना वितरीत व्हायला हवा , आता मजूरांना काम मिळणार नाही, यात कित्येक व्यापारी पण उद्धवस्त झालेत त्यांनाही उभे केले पाहिजे म्हणून सरकारने  विचार पुर्वक निर्णय घेतला पाहिजे, आपण शक्तीपिठ महामार्ग असेल , कुंभमेळा असेल यासाठी  हजारो कोटींची तरतूद करतो आणि ज्या शेतीवर गावगाडा अवलंबून असतो तिथेच नेमका  हात आखडता घेतो हे कुठेतरी बदलले पाहिजे, थोडी जरी  संवेदनशीलता असेल तर सरकारने महापुराचे भयानक वास्तव  लक्षात घेतले पाहिजे व मदतीसाठी योग्य पावले उचलली पाहिजेत..
आणि 
सरकार जर  पूरग्रस्त  लोकांना काही मदत करत असेल तर   ज्यांचा ग्रामीण जीवनाशी संबंध नाही अशा  वर्गाने ‘फुकटे’ म्हणून गोरगरीबांची , पूरग्रस्त  शेतकऱ्यांची , पूरग्रस्त व्यापारी व सामान्य जनतेची  अवहेलना करू नये. राष्ट्रातील प्रत्येक घटक हे राष्ट्रासाठी, उभारणीसाठी हातभार लावत असतो म्हणून संकटात ,  सर्वांनी संकटग्रस्तांचे  दुःख वाटून घेतलेच पाहिजे ही साधी गोष्ट पांढरपेशी पुढारी आणि शहरी वर्गाने लक्षात ठेवावी.
 ही वेळ कोणत्याही संवेदनशील व्यक्तीच्या मनाला  मायेचा पाझर फोडण्याची आहे.
©®
विजय पिसाळ ,नातेपुते
9665936949

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा