vijaypisal49. blogspot. com

मंगळवार, ३० सप्टेंबर, २०२५

ओला दुष्काळ कि, मानवी चुका

 

महाराष्ट्रातल्या भीषण महापुराचे व्हिडिओ व फोटो सर्वांनी पाहिलेले आहेत.  समाज माध्यमातून असंख्य  रील्स आलेले आहेत. जनावरे,घरेदारे , नाले व खचलेले रस्ते ,शेतीचे  वाहून गेलेले बांध  जाताना पाहिले आहेत. 

सरकार, स्वयंसेवी संस्था व राजकीय नेते आणि जागृत जनतेकडून

मदत येईल, नुकसानभरपाई मिळेल , आयुष्य पुन्हा जगण्यासाठी सगळे पाठीशी उभे राहतील. पण 

महत्वाच्या प्रश्नांची सोडवणूक आपल्याला   सर्वांना मिळून करावी लागणार आहे. संकट नैसर्गिक आहे. मोठे आहे पण याचे स्वरुप इतके मोठे का झाले याचाही विचार आपल्याला करावा लागेल! 

 आपले पुर्वज शेती करत असताना शेती मुबलक होती त्यामुळे 

शेतामध्ये पुर्वीपासून अस्तित्वात असलेले प्रवाह , छोट्या चारी, छोटे ओढे , ओहोळ, मोठे ओढे , पाणंद , नाले असे पावसाचे पाणी वाहून जाणारे मार्ग  होते .  जमिनीची वाटणी होत गेल्यामुळे जमिनीचा इंच इंच तुकडा वाढवण्यासाठी आपण सर्वांनी नैसर्गिक प्रवाह जवळपास बंद केले , मातीचे , दगडाचे भराव टाकले , काही ठिकाणी तर नदीत ओढ्यात विहिरी खोदल्या व त्याचे मटेरियल नदीपात्राच्या कढेलाच टाकले त्यामुळे नाले, ओढे नदीपात्र अगदी बारीक झाले बुजवले बुजवले गेले, अतिक्रमण वाढत गेल्यामुळे मागिल तीस चाळीस वर्षात जे पाझर तलाव , नाला बंडिगची कामे  रोजगार हमी मधून झालेली होती ते पाझर तलाव छोटे होत गेले.  हवामान बदलामुळे , प्रचंड वृक्षतोड झाल्यामुळे, कारखाने आणि वाहनांच्या प्रदुषणामुळे  पावसाने मर्यादा ओलांडली सहाजिकच कमी वेळात जास्त पाऊस झाल्यामुळे ते पाणी पुढे सरकण्याकडे वाट शोधत असताना जे जे आढवे येईल त्याला गिळंकृत करत होते,ते पुर्वीच्या नैसर्गिक वाटा शोधत होते पण त्याला वाट मिळाली नाही ,म्हणून ते खूप  शेतात घुसले जर अतिक्रमण झाले नसते तर कदाचित नुकसान कमी झाले असते. शासनाने पाणी आढवण्यासाठी ,पाणी साठवण्यासाठी खूप बंधारे बांधले आणि नैसर्गिक प्रवाह आडवले गेले परिणामी पाण्याला नवी वाट शोधावी लागली.  मानवाने बरेच नैसर्गिक प्रवाह बंद केल्यामुळे पाण्यालाही मार्ग सापडणे महाकठीण झाले.  कदाचित  अतिक्रमणे झाली नसती तर  इतके भयंकर नुकसान झाले नसते.  

प्रत्येक गावाचा , शहराचा विचार जेंव्हा आपण करतो तेंव्हा आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते प्रत्येक ठिकाणी सरकारी ओढे व नाले जमिनीवर झोपडपट्टी सारखी घरे ही अतिक्रमण करुनच बांधली गेलीत ,सरकारनेही त्या ठिकाणी घरकुले दिली  ,वीज पाणी रस्ते दिले व हे करताना अतिक्रमण वाढत गेले, सिमेंट कॉक्रिंटचे प्रचंड काम झाले.

शहरातल्या अतिक्रमणांनी तर सर्व मर्यादा ओलांडल्या कित्येक शहरात नदीपात्रात खूप मोठे अतिक्रमण झाले आहे. 

मोठ मोठे  भराव टाकून टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या बिल्डर लॉबी श्रीमंत झाली पण बेकायदेशीर बांधकामे होऊन  संकट मात्र सर्वांच्या पाचवीला पुजले गेले. अगदी  रस्त्याच्या कडेला व्यवसाय व्हावा म्हणून  जागा आहेत अशा लोकांनी पुढे पुढे येऊन अतिक्रमण करून दुकाने , टपरी, शेड टाकले नैसर्गीक ओढे बुजवून जागा केल्या

सरकारी ओढा ,नदी , नाला या ठिकाणी 

मोकळी जागा दिसली कि ,पुढारी लोकांनी ,सरकारी बाबुंना हाताशी धरत  कॉंक्रीट टाकायचे  व अतिक्रमण करायचं किंवा पेव्हर ब्लॉक टाकायचे. 

जुने ओढे / नाले बुजवायचे किंवा त्यावर कॉंक्रीट स्लॅब टाकून झाकून झोपड्या, टपऱ्या टाकायच्या  छोट्या नद्यांचे अस्तित्व दिसणारच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जुनी पाडलेली घरं ,माळवदं यातून निघालेले सगळे मटेरियल नदीकडेला , ओढ्याच्या पात्रात टाकायचे , अजून एक गोष्ट  नदीकडेला व ओढ्याकडेला वेडी बाभळ , चिल्लर, काटेरी झाडी, वाढत गेली आहे ,त्यामुळेही नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण झाला आहे.

मानवी चुका आणि नैसर्गिक प्रवाहाकडे दुर्लक्ष यामुळेच या पावसाने या ओढे, नाले, नद्यांनी आपली मूळ पात्र शोधली आणि वाहत्या झाल्या. 

पाण्याची  ताकद इतकी मोठी असते की, ती ताकद  मार्गात येणार सगळं वाहून नेत उध्वस्त करून पुढे जात राहिली.  सरकार कोणतेही असो.

सरकारच्या पातळीवर रस्त्यांची कामे करताना दहा पंधरा फुट उंचीचे रस्ते , उड्डाण पुलाचे भराव करून शेकडो किलोमीटर पाण्याचे नैसर्गिक प्रवाह अडवून सगळ्या व्यवस्थेची मोडतोड झालेली आहे हे समृद्धी महामार्गाने आणि सगळ्याच उन्नत राष्ट्रीय  महामार्गांनी दाखवून दिलेलं आहे.  विकासाची कामे करत असताना  झाडांची कत्तल करून अशास्त्रीय पद्धतीने रस्ते बांधणी करून विनाशाला जवळ करत आहोत हे कोणते  सरकार मान्य करणार आहे व  चुक दुरुस्त करुन यापुढे रस्ते बांधणी होणार  आहे का ? 

खरेतर मानवी चुकीमुळेच पर्यावरणाचा ऱ्हास होतोय या

पर्यावरण बदलाचा परिणाम निसर्ग चक्रावर होत  आहे आणि त्याच्यापुढे कुणाचीही संपत्ती, राजकीय पक्षाची ताकद ,सरकारच्या यंत्रणा कुचकामी ठरत  आहेत हेही आता सर्वांना दिसून  आलेलं आहे. आज काही लोकांचा भ्रम असेल आपली जमिन  घरं , शहरं  उंचावर आहेत, आपल्या जवळपास नद्या किंवा मोठे ओढे नाहीत म्हणून  आपण सुरक्षित आहोत हा त्यांचा समज भविष्यात खोटा ठरवणार आहे? आज महापूर आहे , उद्या महाभयंकर वादळं आपल्या दारावर ,शहरावर घोंगावत येणार नाही कशावरून? ढगफुटी कुठेही कधीही होऊ शकते , संतुलन बिघडले तर निसर्ग दया माया दाखवत नाही..या  नैसर्गिक आपत्ती मधून  आपण काही धडा घेणार आहोत  का ?

पावसाचे पडणारे पाणी मुरण्यासाठी बिगर कॉंक्रीटची जागा मोकळी ठेवणार का ? मोकळी मैदाने ,  झाडे  जोपासून , नदी नाले ओढे स्वच्छ करुन अतिक्रमण हटवून   नुकसान कसे टाळता येईल याची काळजी घेणार आहोत  का ? 

 नदीकडेच्या ,ओढ्या कडेच्या 

शेताची ,घरांची दुरुस्ती  करताना परत असा  निसर्गाचा प्रकोप झाला तर नुकसान होणार नाही अशा काही रेषा आखूनच बांधकाम करणार आहोत का? तुम्ही जर निसर्गाची छेड काढली तर निसर्ग तुम्हाला कोणत्याही कोर्टात सुनावणीची संधी देणार नाही व  अंतिम तुम्हाला शिक्षा मिळणारच . 

सरकार कुणाचेही असले तरी होणारी अतिक्रमणे मतांसाठी दुर्लक्षित करायची , त्यातून घरे भरायची ,आपल्या दादा ,भाईंना जोपासायचं , हे कितपत योग्य आहे? संरक्षण द्यायचं अगदी हप्ते वसूल करायचे, गाव गुंड व मवाली गुटखा, दारु ,मटका बहाद्दर कार्यकर्ते सांभाळायचे हे  कथित नेत्यांचं  धोरण असत. 

 ना विकासाचं  धोरण ना भविष्याचं व्हिजन फक्त पैसा आणि राजकारण हेच आजचं वास्तव झालंय..

पण आपण सामान्य लोक यात भरडले जातोय, आपला जीव चाललाय हेच सुज्ञ लोकांना कळत नाही.

आता यापुढे सतत  अनियमित वादळे , गारपीट , बेमोसमी पाऊस याची भीती राहणार आहे तर किती वेळा तुम्ही नव्याने डाव मांडणार आहात आणि तुमची शारीरिक , आर्थिक क्षमता असणार आहे ? 

या प्रश्नांची उत्तर गावगाड्यातील सुज युवकांनी शोधली पाहिजे प्रत्येकाने व्यक्तिगत आणि सामूहिकरीत्या  आता अतिक्रमणा विरुद्ध आवाज होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, 

परत परत  तिच नैसर्गिक आपत्ती तीच  दृश्य, रडवेले चेहरे, तेच रील्स आणि त्याच मदतीच्या याचना ठरलेल्या आहेत. 

निसर्गाने खूप मोठा धडा शिकवला आहे . त्यातून आपण काय बोध घेणार   आहोत?

विजय पिसाळ, नातेपुते..

#ओला_दुष्काळ

गुरुवार, २५ सप्टेंबर, २०२५

अपेक्षा सरकार कडून, अपेक्षा जनतेकडून

चालू घडामोडींचे विश्लेषण





आमची प्राथमिकता काय असायला हवी?
मायबाप सरकार , मुख्यमंत्री, दोन्ही मुख्यमंत्री महोदय व सुज्ञ नागरिक बंधू भगिनींनो,

  देशातील व महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अनेकदा तुफान  पाऊस  होत आहे.  ढगफुटी म्हणावी की अतिवृष्टी म्हणावी की अजून कोणता  शब्द वापरावा हे मनाला सुचत नाही , अगदी छोटे नाले ,ओढे , व कधीही पुर न येणाऱ्या छोट्या नद्यांना व मोठ्या नद्यांना  अभूतपूर्व  महापूर आलेत. या महापूरामुळे आजुबाजूची शेती अक्षरक्षः वाहून गेली आहे. केवळ शेतीच नव्हे तर मानवी जीवनाची जगण्याची आशाच वाहून गेलीय ,  दुभती जनावरे , शेळ्या ,मेंढ्या , कोंबड्या , जनावरांचे गोठे वाहून गेले आहेत , मुलांची दप्तरे , घरातील सगळा संसार , धान्य कपडेलत्ता , किडूक मिडूक दागिने ,  आणि हसत्या खेळत्या संसाराची सगळी स्वप्न वाहून गेली आहेत , 
नव्हे  जन्मभराची  भिती या महापुराने निर्माण झालीय ,  अनेकांचे बैलं, गायी म्हशी शेळ्या मेंढ्या, बांधलेल्या जागीच जिवंत ठार झालीत जणावरे  सोडायलाही संधी मिळाली नाही ,मुकी जित्राबे अक्षरक्षः जागेवरच नाका तोंडात पाणी जाऊन गतप्राण झाली . एवढंच काय घरातील मांजर आणि दारातील लाडके  श्वान सुद्धा वाचले नाहीत ..  काय लिहावे म्हणजे माणूसकी जिवंत होईल , सर्वांच्या काळजाला /ह्रदयाला पाझर फुटेल ? नद्या  , ओढे , नाले इतके तुंबलेत की आसपासच्या कित्येक हेक्टर  शेतात नुसता गाळ आलाय, कुठे  जमिन वाहून गेलीय तर कित्येकांच्या शेतात जणू समुद्र दिसतोय , ऊस  केळी , डाळिंब ,ही पिकेच नव्हे तर नद्यांपासून लांब असलेली उंच उंच घरे पाण्यात गेलीत , जगाला अन्नधान्य पुरवणारी माणसे आज स्वतःला अन्नाचा कण नाही की पोटात पाणी नाही अशी निरागसपणे , निर्वासित झालीत , आभाळच फाटलय ठिगळ कुठे कुठे लावायचे ?  कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, हळद, आले ,बाजरी कोथिंबीर, हुलगा ,पावटा ,घेवडा मेथी, शेपू , टोमॅटो अशी कमी उंचीची पीकं  पाण्यात सडून गेलीत , आता माता भगिनींना ती फक्त ह्रदयात आणि डोळ्यांच्या आसवात दिसत आहेत.  
ती केंव्हाच समुद्राच्या पोटात  कायमची गतप्राण झाली आहेत… बाजारभाव , आयात निर्यातीचा खेळ ,मजूर टंचाईचा सामना कमी होता की काय ? म्हणुन या सुलतानी संकटाचा सामना करत असताना अस्मानी संकटाचाही कहर झाला आणि आयुष्याचा जणू चिखल झाला ...
दुभत्या जणावरांमुळे किमान संसाराचा गाडा सुरु होता तीच गेलीत, सुरवातीला समाधानकारक पाऊस पडल्यामुळे कर्ज काढून पेरणी केली पिकेही बोलू लागली डोलू लागली आणि स्वप्न पडू लागली,  पिकावर दोन पैसे येतील आणि त्यावर वर्षभर  आपला फाटका तुटका  संसाराचा गाडा स्वाभिमानाने हाकता येईल हा मनाचा हिशोब जणू नियतीने भिकारी केला , स्वाभिमानी शेतकरी जणू कायमच्या सुलतानी आणि या अस्मानी संकटाने लाचार केला , 
घेतलेली पीके आली असती , जनावरे वाचली असती तर माझ्या बळीराजीची स्वप्न काही अंशी तरी साकार झाली असती पण ती स्वप्न   आता राहिली नाहीत. आमच्या बळीराजाला मोठी स्वप्न नसतातच , अगदी छोटी छोटी स्वप्न असतात  त्याची लागवड केलेली पिकं  दिवाळीत  निघतील आणि आपल्या लहान लहान मुलाबाळांना कपडे घ्यायचे , घरात लाडू करंजी शंकरपाळी ,चिवडा चकली एवढं तरी  गोडधोड करून खायचे ?सासरवासी लेकीबाळींना माहेरी बोलवून त्यांनाही सुखाचे चार घास खाऊ घालून, साडीचोळी करायची असते … काहींना  मुला, मुलींची शैक्षणिक फि भरायची असते तर दिवाळी नंतर ठरलेल्या  लग्नासाठी पैसे  ठेवायचे  असतात… म्हातारा / म्हातारीच्या डोळ्याचे ऑपरेशन, किरकोळ दवाखान्यासाठी पैसे  उरतील ही अपेक्षा असते.  अगदी गरिब शेतकऱ्यांनी दुकानदाराकडून पेरणीच्या वेळी उधार आणलेल्या खतांचे ,  बियाण्याचे पैसे द्यायचे होते , काही शेतकऱ्यांना  सावकाराकडून घेतलेले पैसे  फेडायचे असतात, काहींना बँकेचे कर्ज फेडायचे असते … तर काहींना छोटी का होईना पाच दहा हजाराचे  , टिव्ही ,फ्रिज अशी एखादी सुखवस्तू घ्यायची असेल…? आईला, बायकोला मुलीला दोन चार ग्रँमचा  सोन्याचा एखादा दागिना करायचा असेल… लहान लेकराला  एखादं पैंजण घ्यायचं असेल ? डेअरीला दुध घालण्यासाठी ,गावात जाण्यासाठी एखादी मोटारसायकल वाहन घ्यायचं असेल… आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वर्षभर घरखर्चाला पुरेल, एवढा पैसा गाठीला लावून ठेवायचा असेल! पण सगळी स्वप्न धुळीला मिळाली आणी फक्त ओला दुष्काळ , भयावह महापुर डोळ्यात साठला काळीज पिळवटून गेलं , चर्रर्र झालं ..
पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनाचा  , स्वप्नांचा  नुसता चुराडाच नाही तर चिखल झालाय भावांनो. नुसते संसार, शेती व घरदारं , पिकंच नाही ,
 तर त्यांची आयुष्यात ठरवलेली  स्वप्नं बेचिराख झाली निसर्गाने  वाहून नेली आहेत. 
मागे काय उरलंय ? जगण्याची भाबडी आशा , सरकार आणि जनतेच्या मदतीकडे  लागलेले डोळे आणि परत एकदा चिखलातून मार्ग काढत जगण्याचा संघर्ष  !
 भावनांचा , स्वप्नांचा चिखल! 
बांधवांनो ,भगिनींनो  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना , गोरगरीबांना ,   सरकारची मदत  ही तुटपुंजी असू नये, 
 काही काळ  सरकारने इतर योजना पुढे ढकलाव्यात व या लोकांना परत उभे करावे , आपत्ती व्यवस्थापन निधी नावाने थोडाफार टॅक्स जनतेवर लावावा , मंत्री संत्री ,लोकप्रतिनिधी यांचे एक वर्षाचे वेतन व भत्ते या निधीकडे वळवावेत , दोन तीन हजार कोटींनी काय होणार ? किमान दहा ते पंधरा हजार कोटींचा निधी गोरगरीबांना व शेतकऱ्यांना वितरीत व्हायला हवा , आता मजूरांना काम मिळणार नाही, यात कित्येक व्यापारी पण उद्धवस्त झालेत त्यांनाही उभे केले पाहिजे म्हणून सरकारने  विचार पुर्वक निर्णय घेतला पाहिजे, आपण शक्तीपिठ महामार्ग असेल , कुंभमेळा असेल यासाठी  हजारो कोटींची तरतूद करतो आणि ज्या शेतीवर गावगाडा अवलंबून असतो तिथेच नेमका  हात आखडता घेतो हे कुठेतरी बदलले पाहिजे, थोडी जरी  संवेदनशीलता असेल तर सरकारने महापुराचे भयानक वास्तव  लक्षात घेतले पाहिजे व मदतीसाठी योग्य पावले उचलली पाहिजेत..
आणि 
सरकार जर  पूरग्रस्त  लोकांना काही मदत करत असेल तर   ज्यांचा ग्रामीण जीवनाशी संबंध नाही अशा  वर्गाने ‘फुकटे’ म्हणून गोरगरीबांची , पूरग्रस्त  शेतकऱ्यांची , पूरग्रस्त व्यापारी व सामान्य जनतेची  अवहेलना करू नये. राष्ट्रातील प्रत्येक घटक हे राष्ट्रासाठी, उभारणीसाठी हातभार लावत असतो म्हणून संकटात ,  सर्वांनी संकटग्रस्तांचे  दुःख वाटून घेतलेच पाहिजे ही साधी गोष्ट पांढरपेशी पुढारी आणि शहरी वर्गाने लक्षात ठेवावी.
 ही वेळ कोणत्याही संवेदनशील व्यक्तीच्या मनाला  मायेचा पाझर फोडण्याची आहे.
©®
विजय पिसाळ ,नातेपुते
9665936949

गुरुवार, १६ जानेवारी, २०२५

पन्नाशीतील स्त्रिया...




आयुष्य जगताना मी मनापासून व्यक्त होतो कारण मला लोकांशी बोलायला ,संवाद करायला खूप आवडतं ,  आसपास जे काही घडतं त्यावर मी लिहित असतो ,व्यक्त होतो , मोजक्या लोकांशी मनमोकळेपणाने बोलतो  , कारण जीवनात आपण बोललोच नाही तर ,तुमचे व्यक्तिमत्व कितीही प्रतिभाशाली असलं तरी ते कुणालाच कळणार नाही,  या क्षणभंगुर आयुष्यात कितीतरी चांगले ,वाईट अनुभव येतात ते अनुभव मी सातत्याने लिखाणातून मांडण्याचा प्रयत्न करतो ,
आज थोडा वेगळा विषय घेतला आहे, नक्की मन लावून वाचाल अशी अपेक्षा करतो.
आजचा विषय...
पन्नाशीच्या घरातील नारी शक्ती...
पंचेचाळीस नंतर व पन्नाशीच्या आसपास कित्येक  महिला थोड्या तणावमुक्त व आनंदी  राहतात, सुंदर  फॅशनची कपडे , अलंकार व अगदी छानपैकी मेकअप  करतात, त्यामुळे अजूनच  छान दिसतात,  थोडक्यात जीवनातील सर्वात आनंदी क्षण जगण्याचा प्रयत्न करतात,  काय असेल त्यांच्यात झालेल्या बदलांचे रहस्य?
   या वयात  संसाराला  25 ते 30  वर्षे झालेली असतात. संसार करताना त्या काटकसरी  असतात , सगळे बारकावे त्या शिकलेल्या असतात , नवऱ्याच्या कामाच्या व्यापामुळे त्या संपूर्ण घर सांभाळत असतात  त्यामुळे त्या जणू परिपूर्ण मुरलेल्या, रुळलेल्या असतात. पन्नाशीच्या घरात त्यांची शिकलेली, मोठी झालेली, किंवा कमावतीही असतात. त्यामुळे मुलांची जबाबदारी थोडी का होईना कमी होते. मुलांचा अभ्यास, मुलांचा स्टिफीन यातून काही होईना सुटका होतेच आणि मुलंही अगदीच आईवर फार अवलंबून नसतात.आपली कामं स्वतः करतात. मुलांना खायला देणं, क्लासेसला सोडणं - आणणं असं करावं लागत नाही . मुलंही मोठी झाल्यामुळे  मुलांचं  स्वतःच एक वेगळं  विश्व तयार होत . 
त्यामुळे ते त्यांच्या विश्वात   दंग - गुंग झालेले  असतात. मुलं जॉब , उच्च शिक्षण किंवा व्यवसाय यामुळे बाहेर पडतात व तिला थोडीशी मोकळीक मिळते , हो  ती जर स्वतः जॉब करणारी , नोकरी करणारी असेल, तर ती थोडी जरुर  गुंतलेली असते तिला ऑफिस असेल किंवा तिचा जो काही जॉब असेल तो करावा लागतो तरीही तिचे रुटीन परिपूर्ण असते  . 
जर फक्त ती 
गृहिणी असेल तर या वयात तिला थोडी का होईना  मोकळीक मिळते. विशीच्या घरात लग्न झाल्यापासून ती सतत एकापाठोपाठ एक अश्या जबाबदारऱ्यांमध्ये,  थकून जाते ,  घर सांभाळत ,  मंडई पासून कपड्याच्या स्वच्छते पर्यंत , घरातील नीटनेटकेपणा जपताना ती स्वतःला विसरून गेलेली असते अगदी नात्यांच्या गोतावळ्यात, नवरा - मुलं, सर्वांचे व स्वतःचे  आजारपण, सण - समारंभ, चालिरीती , घरातील परंपरा , आपली संस्कृती यात यात पुर्णपणे  व्यस्त असते.  हळूहळू दिवस सरतात पण तिच्या जबाबदाऱ्या काही केल्या कमी होत नाहीत , उलट वाढत जातात, त्यामुळे लग्नानंतर 25 ते 30 वर्ष  एवढ्या वर्षात तिला डोकं वर काढायला वेळच  मिळत नाही. प्रत्येक सासरी गेलेल्या संसारी महिलांना सगळ्या जबाबदारीतून   जावचं लागतं.  ती जेंव्हा लग्न करुन नवीन घरी येते तेंव्हा तिला सासरच्या स्वयंपाकाच्या पद्धती , अगदी डोक्यावर पदर सांभाळत घरातील सर्वांचा मान राखत ,सर्वांच्या आवडीनिवडी जपत   संसाराची तारेवरची कसरत करत  सासरी स्वतःला विसरून जावं लागतं  , नवरा समजुतदार असेल तरच तिला थोडेफार सुख मिळते पण नवरा जर तापट हट्टी संशयखोर असेल तर मात्र तिला पिंजऱ्यातील पोपटा सारखे बंदिस्त जीवन जगावे लागते असे करता  करता  25 /30  वर्षे सहज निघून जातात.  पण  स्त्री ही सहनशील ,प्रेमळ असते ती कुणावर राग काढत नाही की कुणाबद्दल आकस बाळगत नाही फक्त  तिची एकच माफक अपेक्षा असते तिला सर्वांनी समजून घेतले पाहिजे, तिला जाच हाट करु नये  , असा संसार सांभाळून   तिच्या आयुष्यात कुठेतरी येते थोडी स्थिरता येते ,तिला स्वतःसाठी  मोकळीक मिळते  आणि ति थोडे का होईना स्वतःसाठी जगायचा प्रयत्न करते .  लहानपणी आई वडील, चुलते मालते, आजी आजोबा यांचा तिने धाक सहन केलेला असतोच व मोठेपणी नवरा, नंदा,सासु सासरे यांच्या इच्छा आकांशा पुर्ण करण्यात ति समरस झालेली दिसून येते. पण 
आयुष्याच्या  पन्नाशीत मात्र ति कणखर होते , तिला तिच्या अनुभवातून एक बळ प्राप्त झालेले असते व या वळणावर आता एकदम भक्कमपणे पाय रोऊन संसारात उभी असते. सगळ्या आयुष्यात ती तावून ,सुलाखून निघालेली असते अगदी   अनुभवाची तिची  शिदोरी काटोकाट भरलेली असते. तिचा वाढलेला असतो , तिला जगाची ओळख झालेली असते आणि ति प्रगल्भ होऊन   आत्मविश्वासाने वावरत असते  तिच्या चालण्या - बोलण्यात - वागण्यात  एक शिस्तप्रिय पण अतिशय सकारात्मक आत्मविश्वास तयार झालेला असतो. आता ती परिपूर्ण झालेली असते, आयुष्यातील नव्या इनिंग साठी तयार म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 
तिच्यात  अवघडलेपणा  ,  कंटाळा बिलकुल दिसत नाही. खरेदी विक्री व्यवसाय , व्यव्हार  अचूक सांभाळते , स्वतःचे  निर्णय झटपट घेऊ शकते  तीच्या वागण्या बोलण्यात एक अनुभव संपन्न व्यक्तीमत्वाचे दर्शन घडते.  वागण्या - बोलण्यात  तारतम्य बाळगते ,  हाती घेतलेली कामे व जबाबदारी ति आणि लिलया पेलते , कामाचा प्रचंड  उरक आलेला असतो ,  संसारातील नात्यांचे गमक तिला उलगडलेले असते. पै - पाहुण्यांचं दडपण कुठेतरी शिथिल झालेले असते किंवा प्रत्येकाचे स्वभाव तिला अवगत झालेले असतात, त्यामुळे  तिला दडपण  येत नाही.  ती पन्नाशीच्या घरात आल्यामुळे व नवरोबा कामात व्यस्त असल्यामुळे  घरातील सर्व  अधिकार तिच्याकडेच  आलेले असतात .
 भाजी करण्यापासून ते  खरेदी  करण्यापर्यंत ती निर्णय घेते , तिला बचतीची सवय असतेच ,त्यामुळे ती काटकर करतेच व यामुळेच  सगळ्या जबाबदाऱ्या कुशलतेने पार पाडत असते  .
संसाराची घडी व्यवस्थित बसलेली असल्यामुळे व स्वतःत नियोजन करत असल्यामुळे  कामे कितीही असली तरी योग्य नियोजनातून ती  कमीजास्त स्वतः वेळ काढतेच  म्हणून पन्नाशीत   तिला थोडी  मोकळीक मिळते. आणि स्वतःसाठी जगायला सुरुवात करते , थोडं शॉपिंग,  पार्लर , मॅचिंग कपडे सणवार व लग्न समारंभ यात नेलपॉलिश व हातावर मेहंदी काढून  आनंदी राहण्याचा तिचा मुड असतो आणि म्हणून ती  छान राहते. 
मुळात स्त्रीची निर्मिती करताना परमेश्वराने तिला   सुंदर बनवलेले असतेच फक्त तिचे सौंदर्य पाहण्याची दृष्टी फार कमी लोकांकडे असते ,  ती मनाने जशी सुंदर असते तशीच ती सुंदर  दिसण्याचाही  प्रयत्न करते.
पन्नाशीच्या उंबरठ्यावर  वयाची झाक थोडीफार का होईना चेहर्‍यावर, केसांवर दिसून यायला लागतेच पण ति हार मानत नाही. तिला ती पन्नाशीत आली असे समजून घेत नाही, ती  यावर घरगुती, पार्लरमध्ये जाऊन उपाययोजना करत असतेच आणि यात गैर काही नाही. तसेतर स्रियांचे वजन हे लग्नानंतर नैसर्गिक वाढतेच पण काही स्त्रिया लग्नानंतर सुद्धा स्वतःला अगदी परफेक्ट ठेवतात, आहार ,व्यायाम , योगासने करतात किंवा काही जमले नाही तर किमान रोज चालतात . जसे वय वाढते तसा 
 वजनाचा काटाही "हळूहळू वाढत जातो" पण त्या त्यामुळे हार मानत नाहीत ,
वजन कमी करण्यासाठी  आटोकाट प्रयत्न करतात , फिरायला जाणे, योगा करने , डायट प्लॅन करने , सूर्यनमस्कार घालणे, दोनदाच जेवणे, सौंदर्य टिकवण्यासाठी व  वजन कमी करण्यासाठीची ऑनलाईन वेबिनार , ऑनलाईन  व्हिडिओ  बघत असतात. 
पण काहीही करून वजन कमी करण्याचा प्रयत्न सोडत नाहीत , तरीही वजन मात्र पाठ सोडत नाही.
खरंतर कितीही प्रयोग केले तरी भारतीय परंपरेत खूप सणवार व उपवास असतात त्यामुळे गोडधोड होते ,तळलेले पदार्थ व वरणभात यामुळेच वजन काही कमी होत नाही..पण 
स्वतःच्या सौंदर्याकडे  त्या  जातीने लक्ष देतात . कपड्यांच्या बाबतीतही  नवनवीन फॅशन , नवनवीन डिझाईन  आणि नवनवीन साड्यांचा त्या छंद जोपासत असतात.  कपड्यातील तोच - तो पणा टाकून ती नवनवीन फॅशनचे कपडे घालून  पन्नाशीत  मिरवतात . 
पन्नाशीच्या अगोदर फक्त पावडर , लिपस्टिक, मेहंदी  व निलपेंट यापुढे जात नाहीत , पन्नाशीत मात्र आता मात्र त्या  छान मेकअप करताना दिसतात  ब्लिच , फेशियल, हेअरकट , कंडिशनर , बरेच प्रॉडक्ट त्या वापरत असतात. जेवढं लक्ष तिने चाळीशीपर्यंत दिलेले नसते तेवढे  लक्ष ती  आता स्वतःकडे देते ,स्वतःची  सगळी हौस  पुर्ण करण्याचा प्रयत्न करते व  याच काळात तिचं मन भूतकाळात फार रमतं. माहेरच्या आठवणी , लहानपणीचे शाळेतील रमणीय दिवस  , कॉलेजच मधील स्वच्छंदी दिवस, कित्येक  मैञिणी आणि   गप्पात त्या हरवून जातात ... मावश्या - मामा, भावंड हे सगळं तिच्या मनात  परत परत आठवायला लागतं ! 
25/30  वर्षात आपल्याभोवतीचं लहान झालेलं वर्तुळ ती विस्तारण्याचा, मोठं करण्याचा प्रयत्न करते. 
           पन्नाशीत  नवीन व जुन्या   मैञिणी  तिला मिळालेल्या असतात. तिच्या मैत्रिणींचे जग तिच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.  कित्येक मैञिणी तिच्या सुखं - दुःखाच्या त भागीदार असतात. मैञिणी बरोबर   ती दिलखुलास हसते , गप्पांमध्ये रंगते, हॉटेलींग करते, सहलीलाही  जाऊन धमाल करते, छान - छान फोटो , व्हिडिओ  काढून ती शेअर करते, ती रिल्स पण बनवते जणू जगण्याचा ,  आयुष्याचा ती  भरभरून आस्वाद घेते.  सिनेमा असो की नाटक असो ती आता मैञिणींच्या गृप बरोबर करते.. कित्येक जणी  भिशी एकत्र लावतात   दांडिया ,गरबा खेळतात , मनात भक्ती गिते , भावगिते गुणगुणत असतात. काही स्त्रियांना 
 कधी कधी निराशा दाटून येते, एकटेपणा जाणवतो, राग अनावर होतो. अशावेळी त्या फक्त त्या जीवल मैञिणींकडे मन मोकळे करतात व स्वतःला सावरतात.  नाही म्हटलं तरी पन्नाशीत बहुसंख्य महिलांचा  अध्यात्माकडे थोडा कल वाढलेला दिसून येतो . सहाजिकच त्यामुळे त्यांना मनःशांती मिळते व आतंरिक ताकद वाढत जाते , पन्नाशीत  तिच्या आयुष्यात येणाऱ्या मोकळीकीचा  ती अश्या प्रकारे उपयोग करुन घेत. हो पन्नाशीतच त्यांना
भरभरून जगायला मिळते , आनंदी राहता येते . आणि म्हणूनच त्यांचे सौंदर्य  पन्नाशीत खुलून दिसते. 
खरेतर स्त्रियांना समजून घेणं आणि त्यांचेवर लिहणं तसं सोपं काम नाही पण मोडकं तोडकं लिहुन स्त्रिला समजून घेण्याचा मी प्रयत्न केलाय !
तुम्हाला काय वाटतं? अभिप्राय जरुर कळवा..
©®विजय पिसाळ, नातेपुते