आपल्या आसपास जे घडते ते कशामुळे घडते ?
समाज व्यवस्था कशी तयार होते ?
मानवाच्या जीवनात गुणात्मक , रचनात्मक , फरक नेमका कशामुळे होतो !
एक राज्याशास्त्राचा विद्यार्थी म्हणून लिहिण्याचा प्रयत्न करतोय !
©®विजय पिसाळ ,नातेपुते.
खरंच मनुष्याचे जीवन शिक्षणामुळे, संस्कारांमुळे , ग्रंथ , महापुरुषांचे ऐतिहासिक दस्ताऐवज, धर्म ग्रंथ, कथा ,कांदबर्या , धार्मिक गोष्टी ,पौराणिक कथा वाचन , अवांतर वाचन ,यामुळे बदलू शकते की ,
आपण जिथे वाढतो, जिथे आपण आसपास घडतंय ते पाहतो आणि जिथे आपल्यावर काही बिंबवले जाते यामुळे आपण बदलतो , बिघडतो की , आपण घडतो ? नेमका आपल्या जीवनाचा मार्ग कसा ठरत असतो ? आपली ओळख कशी तयार होते, आपण सकारात्मक आणि नकारात्मक विचार कसे करु लागतो ?
मनुष्य स्वभाव अनेक प्रकारचे असतात, खरे बोलणारे, मितभाषी, तापट, रागीट, मनमिळाऊ, विश्वासू, नाती जपणारे ,समजूतदार, सर्वांशी आपुलकीने वागणारे , असे अनेक प्रकारचे लोक या जगात असतात, कित्येकांच्या मनाचा थांगपत्ता कधीच लागत नाही , काही व्यक्ती मोजकेच पण अतिशय सोज्वळ बोलतात, सर्वांशी आदरार्थी वागतात , जास्त कधी व्यक्त होत नाहीत , आणि त्यांची छाप सर्वांच्या मनावर पडते, तसे एखादी व्यक्ती घडते ती आई वडील किंवा गुरुजींच्या संस्कारामुळे हे जरी काही अंशी खरे असले तरीही , ज्या ठिकाणी त्या व्यक्तीचा वावर असतो, ज्या सामाजिक परिस्थितीत त्या व्यक्तीच्या बालपणीचा कालावधी जातो , त्याच्यावर , त्याच्या कुटुंबावर डोळ्यादेखत काही प्रसंग ओढावतात , ताणतणाव येतात , , त्याच्या बालवयात घरची आर्थिक परिस्थिती कशी असते यामुळेही सुद्धा एखादी व्यक्तीची घडण होत असते. ज्याच्या हाताला परिस्थितीचे चटके सोसावे लागतात तिथे , महात्मे घडतात हे तुम्हाला एखाद्या गरिब कुटुंबातला एखादा मोठ्या पदावर जातो तेंव्हा दिसते पण त्या पाठिमागे तो घडताना , त्याच्या समोर जी परिस्थिती असते आणि त्या परिस्थितीत तो जे भोगत असतो ते समाजातील कित्येकांना माहित होत नाही पण तो परिस्थितीने घडला हे घडल्यावर समजते ! तर काही वेळा अन्याय, अत्याचार होतात , आणि परिस्थितीने तो वाईट मार्ग पत्करतो आणि समाज नव्या गुंडाना जन्म देत असतो हेही घडते !
सगळी सुख ज्याच्या लहानपणी मिळतात , त्या मुलांमध्ये जनते बद्दल , समाजातील वेगवेगळ्या घटका बद्दल विशेष प्रेम नसते किंबहुना ते फार कमी असते, सोन्याचा चमचा जन्मता ज्यांना मिळतो त्यातील काही अपवाद सोडले तर बरेचसे जण हे ऐषोआरामात जगणे पसंत करतात किंवा व्यसनांच्या आहारी जातात ,त्यांना आईवडिलांच्या कष्टाची,त्यागाची जाणीव नसते , त्यांचा मित्र परिवार हा बहुतेकवेळा व्यसनी असतो किंवा गुंड प्रवृत्तीचा असतो असे मी अनेक ठिकाणी बघितले आहे. कारण जमिनीवर त्यांना सर्व साधारण गोष्टींचा सामना कधीच करावा लागलेला नसतो , आर्थिक संकट त्यांना माहित नसते , त्यामुळे त्यांना जाणीव हा प्रकार नसतो.
मुळात समाजात वावरत असताना सगळे प्रकार हे तुम्हाला दिसतातच कारण निसर्गाचा नियमच तसा आहे , एकाच आई वडिलांच्या पोटी सुद्धा दोन चांगली लेकरे जन्माला येण्याची शक्यता कमी असते, एखादा अतिशय कष्टाळू , दयाळू ,शांत असतो तर दुसरा उर्मट ,डांबरट , तापट , आणि सर्वांना त्रास दायक असतो , हे बदल का दिसतात ?
यात संस्कार सारखे जरी असले तरी संगत व जाणीव वेगवेगळी असते आणि म्हणून व्यक्ती परत्वे मनुष्य स्वभाव वेगवेगळे दिसून येतात,
"स्वभावाला औषध नाही" हे उगीच म्हटलं जात नाही.
काही लोकांना मनापासून खरे वागायची इच्छा असते पण सामाजिक रचना अशा व्यक्तींना टिकू देत नाही, त्याला त्रास देणारे, त्याची फसवणूक करणारे ,त्याला नीट जगू देत नाहीत, आजकाल तर चांगल्या लोकांच्या मार्गात असंख्य काटे पेरलेले दिसून येतात आणि चांगल्या लोकांच्या तक्रारी कुणी ऐकूनही घेत नाहीत,
गुंड ,भ्रष्टाचारी , यांचा सन्मान जागोजागी होताना दिसतो व चांगली लोक हतबल होऊन वाईट मार्गाकडे आकर्षीत होताना दिसतात व त्यातूनच गुन्हेगारी व स्पर्धा वाढते , चांगले वागून काही उपयोग नाही ही भावना तयार होते तर अनेक ठिकाणी गुंड प्रवृत्तीचे लोकांना समाजात मान सन्मान जास्त मिळतो
का तर ?
"सामाजिक व आर्थिक परिस्थितीने गांजलेल्या लोकांना , असे गुंड लोक किरकोळ मदत करतात त्यामुळे गांजलेल्या लोकांना गुंड व मवाली आयकॉन वाटायला लागतात"
मला नेमकं काय म्हणायचं आहे हे समाजशास्त्र व अर्थशास्त्र समजून घेणारे योग्य प्रकारे समजून घेतील ? मानवी स्वभाव असे का तयार होतात ते सांगताना , सामाजिक रचना काय आहे यावर ,मानवी स्वभावाची निर्मीती अवलंबून असते असे माझे मत तयार झाले आहे "
साध्या व सरळमार्गी लोकांचे मन म्हणतं की लोक जसे आपल्याशी वागतात तसेच आपणही वागावे व त्याचेच दुसरे मन पण, म्हणतं आपण तसे वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहील?
हि द्विधा मनस्थिती निर्माण होण्यासाठी अनेक घटना व घटक कारणीभूत ठरत असतात.
एखाद्यावर दया दाखवून तुम्ही त्याला मदत केली,समजा ऊसणे पैसे दिले, तो भुकेला आहे म्हणून मोफत जेवण दिले किंवा त्याला काही मदत केली तर त्याची जाणीव तो फार दिवस ठेवतोच असे नाही अर्थात जाणीव ठेवणार पण असतात फक्त संख्या कमी असते.
पण जर त्याला कुण्या सावकाराने पैसे दिले तर तो त्या सावकाराचे हजार वेळा पाय धरत असतो , सव्याज पैसे फेडतो व सावकाराच्या धाकात राहतो, पण ज्याने विना मोबदला मदत केली त्याला तो लक्षात ठेवतोच असे नाही, फुकट मिळाले तर किंमत ठेवत नाही व कुणी सावकाराने कितिही त्याला लुटले तर मात्र तक्रार करत नाही, याच मानवी स्वभावामुळे कित्येकदा लोक गुलामगिरी पत्करतात व स्वाभिमान सोडून वागत असतात. हात पसरण्यात धन्यता मानतात ,म्हणून
अनेक लोकांना एकाच वेळी गुलाम करण्यासाठी आर्थिक दृष्टीने कमकुवत केले जाते व काही मदत करुन त्याच्यावर उपकारांचे ओझे ठेवून त्यालाच लुटले जाते ,मात्र तरीही तो सावकार,गुंड ,मवाली लोकांच्या लुटीला उपकार समजतो असे मानवी स्वभाव आहेत.
व जोपर्यंत लोकांना सावकाराने आपली लुच केलीय हे समजत नाही तोपर्यत तो सावकार त्याला देव वाटू शकतो पण जेव्हा लुट असाह्य होते तो सावकाराचे देणे फेडू शकत नाही तेंव्हा मात्र तो एकतर पुर्ण खचतो व आत्महत्या करतो किंवा संघर्षाची तयारी करुन सावकारांशी दोन हात करतो, सगळे सावकार अधिकृत नसतातच, ते फक्त गावगुंड पाळून लोकांना छळतात इतकेच, हा लेख जे लुटले जातात त्यांना समर्पित!
विजय पिसाळ नातेपुते !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा