vijaypisal49. blogspot. com

शुक्रवार, २५ जानेवारी, २०१९

दुष्काळाचा पंचनामा

पंचनामा . . . दुष्काळाचा आणि शेतकरी समस्यांचा !

जावे दुष्काळाच्या देशात. . . .

आटलेल्या विहिरी फफुट्याने माखलेल्या पायवाटा  ,   पिके नसल्याने भकास उघड्या बोडक्या झालेल्या जमिनी , पाण्यासाठी वनवन फिरणाऱ्या लहान मुलं मुली , म्हातारी कोतारी माणसे व  बायका . . . चार्या  अभावी  जणावरांची खपाटीला गेलेली पोटं हाताला काम नसल्याने शेतकरी , मजूर यांची कामासाठी शोधाशोध जवळपास ७०% ग्रामीण भागातील हे चित्र ह्रदय पिळवटून टाकणारे आहे . . कित्येक शेतकर्यांना आपली जणावरे एकतर सोडून द्यावी लागत आहेत किंवा येईल त्या किंमतीला विकावी लागत आहेत, आज, पशुधन वाचवण्यासाठी ना सरकार पुढे येतय ना कोणते लोकप्रतिनीधी पुढे येताना दिसत आहे , मुकी जित्राबं मालकाकडे बघून दिवसभर हंबरडा फोडत आहे पण असाह्य पणे पाहण्याशिवाय मालकही काहीच करू शकत नाही . .  कारण त्याच्या खिशात दमडाही नाही . .
दुष्काळी अनुदान नाही , चारा छावण्या नाहीत, चारा डेपो नाहीत, रोजगारहमीची कामे नाहीत. . .
''नुसता ग्रामीण भाग होरपळतोय''
मायबाप सरकारला कधी पाझर फुटणार देव जाणे . . .
गावच्या गावं ओस पडू लागली आहेत , खेडीच्या खेडी  जणू रंडकी होत चालली आहेत  . . तरूण बायका मुलींनाही
कपाळाला कुंकू लावायची सुद्धा आता लाज वाटू लागली आहे  ! कारण त्यांचा धनी कधी जीव देईल याचा काहीही  भरोसा राहिलेला  नाही . .
सततच्या नापिकीने, दुष्काळाने, गारपिटीने , वादळी वार्याने बळीराजा खचून गेलाय. . त्याच्या हातात काय येतच नाही , दुकानदाराची उधारी  व सावकाराची कर्जे फेडायची कशी ??किराना सामान सुद्धा घ्यायची पत राहिली नाही ! जगायचं कसं  याचीच चिंता त्याला लागून राहिलीय। . .
फसवी कर्जमाफी व फसवा हमीभाव!
 आजही इतक्या भयंकर दुष्काळात भाजीपाला , धान्य, कवडीमोल भावाने जातोय, ऊसाचे बील नाही , तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली पिके करपून जाताना बघवत नाही  !
"कुणालाच पाझर फुटेना"
काही जणांनी बँकेचा त्रास नको म्हणून वाट्टेल ते करून जमीन विकून, घाणवट ठेवून,उसने पासने करून,  सावकाराकडून कर्ज काढून बँकेचे कर्ज,  ओटीएस मध्ये भरले , त्यामुळे  cbil रेकॉर्ड खराब झाले कित्येक शेतकर्यांचे . . .
त्यामुळे कोणतीही बँक अशा शेतकर्यांना दारात उभी करत नाही . . . अशा विचित्र कात्रीत बळीराजा सापडलाय पण, त्यातून त्याला बाहेर कोण काढणार?
आज राजकारण हे जाती धर्म आणि आरक्षण यापलीकडे जातच नाही . . प्रत्येक पक्ष हा एकमेकांची उणीधुनी काढण्यात मश्गुल आहे ,
जातीय तेढ निर्माण करून मताच्या तुंबड्या भरल्या की राजकीय पक्षांचे भागतेय पण रोज शेकडो शेतकर्यांच्या आत्महत्या कुणालाही दिसत नाहीत, इतकेच काय परदेशातून बहुमोल परकीय चलन खर्चून
तेल, डाळी , साखर, कांदा वेळोवेळी आयात करून इथल्या शेतकर्यांच्या जखमेवर मिठ चोळले जातेय. .
हजारो हेक्टर जमिनी भूसंपादन करून विकासाच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात कवडीमोल भावाने घालायचा गोरख धंदा खुलेआम चालू आहे . . त्याच जमिनी नंतर करोडो रुपयांना विकल्या जातात. .
 "न्यायासाठी शेकडो धर्मा पाटलांचे " बलिदान जात आहे . . पण
कोण वाचा फोडणार याला ? कोण धावणार मदतीला कोण सोडवणार हे प्रश्न!
कांदा चाळी ,
शेततळी तोकड्या अनुदानामुळे परवडत नाहीत. .

रोजगारा अभावी जगणं मुस्किल झालंय. . . स्थलांतर करावे तर मुक्या जित्राबाचे व घरातील बाया बापड्यांचं आणि म्हातार्या माणसांचं करायचं तरी काय?
म्हणून हा माझ्या सारख्या दुष्काळाची जाणीव असणाऱ्या शेतकर्यांने केलेला हा व्यवस्थेचा  पंचनामा !
श्री विजय शंकरराव पिसाळ नातेपुते !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा