vijaypisal49. blogspot. com

शनिवार, १ सप्टेंबर, २०१८

संघर्ष. . .

संघर्ष. . . . . . .

विजय पिसाळ नातेपुते . .

कॉपीपेस्ट जरूर करा पण नीट वाचून करा. .
कारण बर्याचदा माझ्याच पोस्ट नाव बदलून मला परत येतात तेंव्हा मनाला खूप हसू येते . .

तर वाचा संघर्ष. . .

आयुष्यात नुसते  बोलून काहीच उपयोग नसतो , त्यासाठी कठोर परिश्रम व मोठा संघर्ष करावा लागतो.
असंख्य चढउतार तर हे प्रत्येकाच्या वाट्याला येत असतात, कठीण प्रसंग हे जणू परिक्षाच घेत असतात, जो डगमगत नाही , जो खचत नाही , जो अपयश पचवून पुढे पाऊल टाकतो तोच संघर्ष नायक होतो . तोच विजेता होतो, सहज व सोपे वाटेल असे जीवन नसते व जो जीवनाकडे सहज पाहतो तो कधीच यशस्वी होत नाही . नशीबाला व दुसर्‍याला दोष देणारी माणसे भेकड व भित्री असतात. स्वतःचा आत्मविश्वास गमावल्याने ति कधीच यशाला गवसणी घालत नाहीत. अशी माणसे सदैव दुसर्‍यांची गुलामगिरी पत्करून जीवन जगत असतात. जणू धन्याच्या दारात कुत्रे कसे तुकड्यावर समाधान मानते !
 अरे कधीतरी स्वतःच्या मेंदूचा वापर करा , कोण आपला वापर करते , कोण आपल्या जीवावर मोठे होते, याची पारख करा , तुमच्यात हिंमत असते तुमच्यात नेतृत्व करायची धमक असते तरीही तुम्ही मांडलिक म्हणून जगता आणि स्वतःला विसरून जाता.
आजकाल नुसता विविध कारणांनी वापर करणे, माथी भडकवून, राजकीय, सामाजिक, आर्थिक फायदा करून घेणे जवळपास सगळीकडे चालू आहे . म्हणून जरा विचार करा सत्यता पडताळून पहा, म्हणून आयुष्यातील महत्त्वाच्या तारूण्यातच संघर्ष करायला शिका,   संघर्षा शिवाय यश तर मिळत नाही , शिवाय तुमची दखल सुद्धा कोणी घेत नाही ,
राजकारणा शिवाय सुद्धा अनेक ठिकाणी तुम्ही नेतृत्व करु शकता, उद्योजक व्हा, व्यवसायिक व्हा, छोटा मोठा धंदा करा, प्रसंगी किरकोळ जॉब करून पैशाची बचत करून किरकोळ व्यवसायातून मोठे व्हायला बघा पण, गुलामगिरी व लाचारी सोडून जगा !
उदाहरणच द्यायचे झाले तर,
शेतीत यशस्वी होणे म्हणजे शेतीतील नेतृत्व, व्यवसायात यशस्वी होणे म्हणजे व्यवसायातील नेतृत्व, ज्या ज्या क्षेत्रात तुम्ही काम कराल त्या त्या ठिकाणी तुम्ही टॉपर व्हा संघर्षातून ओळख निर्माण  करा ,
करोडोंची प्रॉपर्टी मिळाली म्हणजे तुम्ही यशस्वी झाला असे नाही तर,  करोडो लोकांमध्ये तुमची ओळख झाली, तुमच्या नावाची परफेक्ट आयडेंटिटी झाली,  तुमच्या कार्याची कामाची प्रेरणा घेऊन नवी पिढी तयार झाली तरच तुम्ही यशस्वी झाला .
आयुष्यात जगण्यासाठी जरूर पैसा लागतो मात्र पैसा हा सर्वस्व नसतो . . ..तर तो काहीकाळ माध्यम असतो . क्षमतेपेक्षा जास्त कर्ज काढू नका . खाजगी सावकार गाठू नका , वाटचाल हळूहळू पण शाश्वत करा . . यश तुम्हाला नक्कीच खुणावतेच. . . 
या धावपळीच्या जीवनात अनेकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो कारण त्यांना कसे जगावे याचा मुळात मार्ग सापडलेला नसतो .
जो समाज, जो व्यक्ती  योग्य ध्येय ठेवून ते साकार करण्यासाठी संघर्ष करत नाही तो कधीच यशस्वी नसतो . अपयशाला घाबरने व परिस्थितीला दोष देणे यामुळे केवळ मनाचे समाधान होत असते .
पण संघर्ष करत असताना , पुढे जाताना वाटचाल सोपी नसते, खडतर प्रवास करावाच लागतो , जबरदस्त इच्छाशक्ती ही पुढे जाण्यासाठी प्रयत्नशील असते , मात्र त्याच वेळी वेगवेगळ्या परिस्थितीमुळे प्रचंड अडचणी येत असतात, मागे खेचणारे सुद्धा समोर ठाकतात  , टिंगलटवाळी करणारेही कमी नसतात, कधी  कधी तर जवळ कुणीही रहात नाही , तोच काळ परिक्षेचा व येईल त्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा असतो, अपमान होत असतो, विविध गोष्टींचे शल्य मनाला बोचत असते.  आसपास जणू काळोख पसरलेला असतो , नियतीचे फासे उलटे फिरत असतात भूतकाळातील चुका सदैव  मनाला निगेटिव्ह करत असतात पण   मनगटात ताकद व मेंदूत जीगर असेल तर कितीही भयंकर काळोख असूद्या उद्याचा उषःकाल झाल्या शिवाय रहात नाही . मशाल पेटवायला एक काडी सुद्धा पुरेशी असते मात्र मशालीला पुरेसे तेल मात्र टाकत रहायची खबरदारी घ्यावी लागते .
त्यासाठी हळूहळू पण मार्गक्रमण करत रहावेच लागते , पण हे करत असताना कुठेही लाचारी व स्वाभिमान घाण ठेवू नका , नक्कीच तुम्ही नायक असाल, दुसर्‍याने दिलेला
मटणाचा तुकडा व दारूची बाटली याचा मोह टाळा, या क्षणिक मोहापायी जीवन उध्वस्त करू नका,  या पेक्षाही जीवन काहीतरी वेगळे आहे हे विचारात घ्या .
'विनयशील व नम्र असने ही कमजोरी नाही तर भविष्यातील महान व्यक्तीमत्वाची ती प्रचिती आहे'
मानवी जीवनात विनाकारण वाद घातल्याने व  किरकोळ लोभापाई असंख्य शत्रू निर्माण केल्याने मोठे होण्याची कल्पना तात्पुरती व क्षणिक यशस्वी होते मात्र दीर्घकाळासाठी तुम्ही कधीच यशस्वी होऊ शकत नाही .
फसवणूक करून करून किती लोकांची करता येते , दोन, चार, पाच,  फार फार तर पाच पंचवीस पण जर बदनामी  सुरू झाली तर, मात्र  बदनामी तुम्हाला खायला उठते , दुसऱ्यांना लुटून तुम्ही जगाला कधीच जिंकू शकत नाही ,
म्हणून योग्य मार्गाने संघर्ष करा तुम्ही यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहचल्या शिवाय रहात नाही .
परमेश्वरावर नितांत श्रध्दा व आदराची भावना असूद्या पण अमुक नवस केल्याने , तमुक मला फायदा होईल या भ्रामक कल्पनेतून बाहेर पडा . .
हातपाय नसलेली माणसे सुद्धा संघर्ष करतात, ध्येय निश्चित करून वाटचाल करतात व यशस्वी होतात मात्र शरीराने धडधाकट असणारे , समाजाचे थोडेफार पाठबळ असणारे  इतरांवर अन्याय करतात, असाह्य लोकांची पिळवणूक करतात, आयुष्यात दुसर्‍याच्या जीवावर जगण्याचा शॉर्टकट निवडतात पण असे लोक कधीच मोठे झालेले दिसत नाहीत. .
म्हणून मार्ग निवडताना सत्याचा व कामावरील निष्ठेचाच असायला हवा .
कधी कधी गोड फळ मिळायला सुद्धा उशीर लागतो म्हणून तुमचा मार्ग बदलू नका .
जेंव्हा तुमचा मार्ग निश्चित असेल तेंव्हा तुमचा प्रवास खडतर असून सुद्धा पुर्ण झाल्या शिवाय रहाणार नाही . .
मानवी जीवन हे साधे सोपे व सरळ असायला हवे , रोजच्या जीवनात  माणसे जोडायला हवीत, मतभेद असो कि विचारांत फरक असो पण मनभेद व दुरावा असता कामा नये .
जाती धर्माचा, अभिमान बाळगा, देव देवतांचे उपासक व्हा मात्र त्या गोष्टींचे कुठेही अवडंबर माजवू नका, माज करू नका , आणि अनावश्यक कर्मकांडात गुंतून सुद्धा पडू नका, तुमचा संघर्ष हा  ध्येयप्राप्तीचा व सत्यमार्गाचा असायला हवा .

विजय पिसाळ नातेपुते . .
९४२३६१३४४९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा