vijaypisal49. blogspot. com

मंगळवार, २६ नोव्हेंबर, २०२४

भावनांची गुंतवणूक

चालू घडामोडींचे विश्लेषण

भावनांची गुंतवणूक!
©®विजय पिसाळ, मनाशी संवाद साधताना !

माणसं ही मनापासून एकमेकांना समजून ,सुद्धा समजूतदार वागतातच असे नाही ,   भावनाची कदर हल्ली कुणाला  करावी वाटते असेही दिसत नाही, आज काल माणूसपण हरवत चाललंय , एकांत आणि एकटेपणा यातच प्रत्येक व्यक्ती स्वतःच विश्व म्हणत आहे.  आपलेपणा कुठेतरी हरवत चाललाय , आज विश्वासाला तडे जात आहेत  आणि विचारांची देवाणघेवाण कमी होत आहे. स्वच्छंदी जगण्याची व्याख्या वेगळीच असते. पै पाहुणे , नातीगोती , मित्र , शेजारी पाजारी सगळं जग हे व्यव्हारी झालंय, फायदा नसेल तर बोलतानाही हातचा राखला जातोय , फायदा फक्त आर्थिक असतो असे नाही ,स्वतःची मते इतरांनी स्वीकारली पाहिजेत , तरच ती व्यक्ती योग्य आणि जर वैचारिक विरोधी विचार असेल तर ती व्यक्ती चुकिची आणि म्हणून त्या व्यक्तीचा संबंध सुद्धा नको ही भावना आजकाल वाढीस लागते ,  आणि एखादी व्यक्ती व्यसनी  असेल , खोटी असेल पण ती आपलं ऐकत असेल तर मात्र ती व्यक्ति चांगली असते असा मानवी स्वभाव आजकाल दिसून येतो.
मी जेंव्हा समाजात वावरतो तेंव्हा माणासांचे स्वभाव मला समजून येतात , 
 माणसं माणसांना कमी पण बाजारात खरेदी केलेल्या  वस्तूंना जीवापाड  जपतात.  घर ,गाडी कपाट ,  स्वच्छ करतात , साचलेली घाण, जळमटे साफ करतात. एखादे मशीन बिघडू नये म्हणून  तिचा नियमित वापर करतात , आपली गाडी सुद्धा रोज  फिरवतात, दिवाळी ,दसरा ,पाडवा या दिवशी तीची पुजा करतात , तिचे सर्व्हिसिंग नियमित करतात , तेलपाणी करतात. तिचे लाईफ वाढले पाहिजे ही भावना असते , सगळे लोक भविष्याचा विचार करून काही  वस्तूत म्हणजेच सोने ,चांदी , अशा वस्तूत गुंतवणूक करतात. वस्तू खरेदी केल्या कि त्याचं  सेलिब्रेशन केले जाते , पण आजकाल भावनांची गुंतवणूक होताना दिसत नाही , प्रत्येक गोष्टीत मान अपमानाच्या तराजूत नाती तोलली जातात,  पैसा मिळाला व त्यातून  ,सोने ,चांदी ,जमीन खरेदी केल्या नंतर पेढे वाटले जातात व आनंद साजरा केला जातो पण या  वस्तू  कधी असतील, नसतील किंवा त्याचं मुल्य कमीजास्त होईल याची कल्पना असतानाही त्यावर प्रेम केले जाते पण  आजकाल भावनांची कदर व गुंतवणूक होत नाही एखादी वस्तू  तुटल्यावर , फुटल्यावर किंवा हरवल्यास ,निराश होतात,  अस्वस्थ होतात, काहीही करून अगदी तुटलेली   वस्तू जोडू पाहतात.  पण जिवंत माणसांना माणसे सहजासहजी जोडत नाहीत, अगदी आटलेला झरा प्रवाही होऊ शकतो , समुद्राला भरती ओहोटी येऊ शकते पण माणसं मात्र तुटलेला संवाद जोडत नाहीत , परकीय शत्रू राष्ट्रांचाही संवाद सुरु होतो पण तात्विक कारणांनी ,मतभिन्नता असेल , द्वेष केला जातो ,  तिटकारा करतात व  माणसे संवादच बंद करतात हा मानवी स्वभाव का होत आहे?     मुक  व निर्जीव वस्तुंशी माणसे  संवाद करत असतात .  तिथे मात्र  समजूतदार  होतात. आजकाल तर  निर्जीव वस्तू नसतील तर माणूस  जगण्याची कल्पनादेखील  करू शकत नाही इतकी सवय त्या निर्जीव वस्तुंची होते , माझं पैजण, माझं कानातलं ,माझं घड्याळ, माझा मोबाईल यातच त्यांचं विश्व असतं आणि सजीव नात्यांचा गोडवा नसतो की ,भावनांची कदर नसते . का हरवत चाललाय हा संवाद?
प्रत्येक वस्तू आम्हाला सुंदर हवी , आकर्षक हवी , टापटीप हवी पण  मनातील , राग, मनातील  दुःख अशी  जळमटं साफ करायची कल्पनाच आम्ही करत  नाही , इतरांच्या पराभवात , इतरांच्या वेदनात ,इतरांच्या दुःखात हल्ली कोणच वाटेकरी नसतो , उलट त्याचा आनंद राजरा कसा  करता येईल याचे विचार मंथन केले जाते.
मानवी नाती आटलेल्या प्रवाहासारखी दिसतात , भावनांची तहान भागवताना मात्र दमछाक होते .
 संबंधात    गोडी  असावी      यासाठी नवीन काहीही करत नाहीत, त्यामुळे नाती दुरावतात ,ती  अबोल होतात. 
 तसंही आपण सगळे माझा परिवार, माझा संसार ,  माझं घर, माझी प्रॉपर्टी , माझं हे माझं ते सगळं माझं ,माझं करतो पण ती हस्तांतरित होतं याची कल्पना असूनही  ते मिळवण्यासाठी झटत असतो व शेवटी यातील काय सोबत येते व काय  उपयोगाचे असते  याचा सारासार विचार कधीच केला जात नाही?
 चैनीची वस्तू खरेदी केली तर तीचा पुरेपूर वापर करता यावा यासाठी धडपणारी माणसं , माणसांना वापरताना  कशाचीही कदर करत नाहीत, राजकारणात जसे वापरले जाते तसे आज सगळीकडेच वापरले जाते अशी मानवी मनाची भावना रुजत चाललीय , मला माझेच आत्मचिंतन करावे वाटते , मी व्यक्त होतो ,मी लिहितो , कुणी माझे ऐकावे म्हणून नव्हे तर स्वतःच्या  मनाशी तरी संवाद साधुन चिंतनशील रहावे या भावनेतून, 
   का असे होत असेल ?म्हणूनच मला वाटू लागते   निर्जीव वस्तूंना सुद्धा सुंदर लाईफ आहे आणि त्यांना काळजीपूर्वक जपले जाते व त्या टिकतात, मात्र जीवापाड जपलेली नाती व माणसे आजकाल टिकणे कठीण झालंय असं नाही वाटत तुम्हाला?. 
मोबाईल दोन मिनिट सापडला नाही तर जीव कासावीस होतो , शोधा शोध होते पण , ऋणानुबंध जपायला मात्र  जीव तुटत नाही कारण सजीवांशी संवाद हरवलाय व अनोळखी निर्जीव वस्तु बरोबर संवाद मात्र हवाहवासा वाटतोय ? होय ना?
 माणसे दुरावली तरीही कोणी जास्त दुःखी दिसणार नाही पण मार्केट मधून साधी चप्पल आणली व ती तुटली तर मात्र आम्ही दुःखी होणार?  निर्जीव वस्तुंवर आम्ही प्रेम करतो व पण माणसे  तुटण्याचं दुःखही होत नाही.  आजकाल तर  तू तुझ्या मार्गाला, मी माझ्या. यालाच समजूतदारपणा  म्हणतात . 
शेवटी  एकाच बाजूने नात्याचा तोल सांभाळणारी व्यक्ती थकते आणि  मनात स्वतःशीच संवाद साधते , चिंतनशील व्यक्ती पुढे पर्याय नसतात कारण त्यांनी भावनांची गुंतवणूक केलेली असते.
  मायाळू माणसं हल्ली शोधावी लागतात ती सापडत नाहीत .  म्हणून मला आसपास दिसते 
निर्जीव होत आहेत व वस्तु मात्र सजीवांशी एकरूप ?
खरं आहे ना ?
©®विजय पिसाळ ,नातेपुते.....

गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०२४

शालेय मैत्री ! कारे दुरावा ?

चालू घडामोडींचे विश्लेषण



















का रे दुरावा ...
एक छोटासा प्रयत्न जीवलग मित्रांसाठी ... 
श्री . विजय पिसाळ नातेपुते!!!
क्षणभंगुर आयुष्यात कोणते मागणे नाही !
 माझे तुला कोणतेही सांगणे   नाही !
आपुली, आपलेपणा पहिल्या सारखीच  फक्त जप , मैत्री सारखे शुद्ध नाते नाही !
विश्वास होता, विश्वास आहे , मैत्रीत दुरावा योग्य नाही!

मैत्री जपली तर काळजाचा तुकडा वाटते !
आणि 
मैत्री तुटली तर काळीज तुटते !

 संवेदनशील व्यक्ती मैत्री करतात ,मैत्री जपतात व समजूतदार वागतात !
खरेतर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना असंख्य मित्र होतात पण !
शालेय मित्रांची गोष्ट काही वेगळीच असते !
एकाच वर्गात शिक्षण घेत असताना खूप भांडायचे ,चेष्टा करायची , कधी कधी तर हाणामारी पण करायची आणि पुढील शिक्षणाच्या निमित्ताने, किंवा वेगवेगळ्या कारणांनी शालेय जीवनातील शैक्षणिक वाटा बदलल्या नंतर ,  दुर गेल्या नंतर , परत कित्येक वर्ष भेटीगाठी नाहीत, कित्येक वर्ष संपर्क नाही, कित्येक वर्ष कोण कुठे याचा ठावठिकाणा नाही फक्त चुकून कुठे कोण भेटले तर तो काय करतो , कुठे असतो , त्याचा फोन वगैरे मिळतोय का ? बघ की , गेट टुगेदर करुयात , मग शोधाशोध सुरु होते,  त्याचे नाव ,तिचे  नाव शोधायचे संपर्क मिळवायचे , लग्नानंतर तिचे नाव वेगळे , मग तिचे  फेसबुक प्रोफाइल कोणत्या नावाने असेल ,ति कुठे असेल असे एक एक करत पत्ते ,फोन नंबर शोधायचे ,  आणि हळूहळू संपर्क होतात , लहानपणीच्या आठवणी, एकमेकांच्या काढलेल्या खोड्या दंगा मस्ती यावर मेसेंजर वर बोलणे होते , तु काय करतो ,तुझं काय चाललंय याची चौकशी होते , व्हॉटसअॅप नंबर शेअर केले जातात , व्हॉटसअॅप वर शालेय बाल गोपाळांचे ग्रुप होतात आणि परत एकदा दंगामस्ती , तासंतास चेष्टा मस्करी , गेट टुगेदर, शिक्षकांची चौकशी, कार्यक्रमाचे नियोजन, धमाल मस्ती , 
 परत काही जणांशी ,तात्विक, वैचारिक, राजकीय मतभिन्नता, मग काही जण एक्झिट, तर काहीजण अबोल तर काहीजण वेळेच कारण देत तथास्तु आणि निरव शांतता...
वय वाढल्यानंतर एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आपण नाही का संयम ठेवू शकत ,  कधी कोण चुकला हेच उगाळत बसायचे का ?  ग्रुपमध्ये ग्रुप करुन गैरसमज कमी करण्या ऐवजी वाढवायचे का ? हीच आपली मॅच्युरिटी का ?  कित्येक वर्षांनी जेंव्हा भेटलो ,संपर्क झाला तेंव्हा
मला तुला काहीतरी सांगायचे आहे, तुला वेळ आहे का ? आरे तु कुठे आहेस तुला  वेळ असेल तर भेटायला ये इकडे कधी येतोस का ?  , फक्त येताना तासभर अगोदर फोन कर म्हणजे मी घरी थांबेल , एकमेकांची चौकशी, व्हॉटसअॅप वर न चुकता बोलणे, वेळ असेल तेंव्हा न चुकता खुशाली विचारणे , जोक शेअर करणे , माहितीची देवाण घेवाण करणे , 

मनसोक्त बोलावे , तासंतास बोलत रहावे , मनात काहीच न ठेवता  कोणतीही गोष्ट, कोणतीही घटना , पहिल्यांदा सर्व काही त्याच व्यक्तीला सांगावे , कोणताही संकोच मनात न ठेवता मनातील  सगळ्या गोष्टी शेअर कराव्यात ,  धकाधकीच्या धावपळीच्या आयुष्यात, कधी वेळ मिळाला तर त्याच व्यक्तीला भेटावे , काही वेळ एकमेकांसोबत घालवावा , चहा ,कॉफी ,नाश्ता याचा आग्रह करत हसतखेळत बोलून सुख दुःख शेअर करावीत , एकमेकांनाचा इतका विश्वास असतो की , कोणतीच गोष्ट एकमेकांनी एकमेकांपासून लपवली जात नाही, 
या नात्यात ,जात धर्म, हुशार , कमी हुशार, गरिब श्रीमंत हा विचार नसतो, कितीही मतमतांतरे झाली तरीही एकमेकांचा आदर करत नाते जपले जाते आणि ते नाते म्हणजे *"मैत्री"*
आणि शुल्लक गोष्टीवरुन किंवा कुणाच्यातरी गैरसमज पसरवण्यावरुन   मित्रांना एकमेकांपासून दुर करण्या पर्यंत स्वतःत बदल करणे हे योग्य आहे का ?
तुम्हाला काय वाटते ?

माझे तुझे काहीच मतभेद नाहीत, तरीही का कोण जाणे तुला आता वेळ नाही?

©®विजय पिसाळ नातेपुते.
9665936949