चालू घडामोडींचे विश्लेषण
हितगुज स्वतःशी
©®विजय पिसाळ.. नातेपुते.
आज थोडा वेळ मी मला दिला !
घेतली थोडी विश्रांती, समजून घेऊ लागलो स्वतःला !
समाज, कुटुंब, नातेवाईक, प्रपंच हे तर असतं प्रत्येकाला !
तु तुझ्यासाठी काही वेळ देतोस का ? थोडे प्रश्न विचारले मनाला !
अरे सतत पळतोस ,धावतोस पण कधी वेळ असतो तुला स्वतःशी बोलायला ?
अन काही प्रश्नाची उत्तरे लागलो शोधायला !
कष्ट तर करावेच लागते ,पर्याय नसतो जीवनात कुणाला !
रात्रंदिवस कष्ट केले , हे का सांगावे जगाला !
आपली जबाबदारी आपणच निभावतो , आणि आयुष्य लावतो पणाला !
तसेतर बर्याचदा एकटेच असतो आपण , फक्त आपलीच सावली असते आपल्या सोबतीला !
एक एक पाईप जोडला तर पाईपलाई तयार होते आणि पाणी मिळते शेताला !
तसा प्रत्येक टप्पा सर करत आपण शिकले पाहिजे आकार द्यायला !
आपले बोलणे आपल्याशीच झाले तर दुर घालवतो आपण थकव्याला !
स्वतःच्या हाताने रोप लावून ते वाढवले ,त्याला पाणी दिले तर गोड फळे लागतात त्याला !
तसे आयुष्याचेही आहे थेंब थेंब घाम गाळून पुढे जावेच लागेल हे सांगितले मनाला !
कष्ट करताना , प्रपंच चालवताना कित्येक रात्री जागवल्या ,हे मन सांगत होते मला !
पण तुझ्या कष्टाचे अन तुझ्या घामाचे पडले आहे काही कुणाला ?
जसे पाण्याचा थेंब थेंब देऊन जगवतो आपण पिकांना !
तसे एक एक पाऊल टाकत घडवावे लागते स्वतःला!
तेंव्हाच आकार मिळतो तुमच्या भविष्याला !
आज मी स्वतःशीच हितगुज केले , माझ्या मनातील तळमळ ,माझ्या भावना , माझे भवितव्य जाणून घेतले , थोडक्यात आज माझी भेट मी घेतली , वामनराव पै म्हणायचे ना !
" तुच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार" तसा मीच माझ्याशी बोलत होतो अगदी मनसोक्त स्वतःशीच बोलणे झाले.. जगण्यात काही आपण चुकलो असेल, काही गोष्टी राहून गेल्या असतील तर त्याचा थोडा विचार पण केला !
आजवर आपण खूप छान जगलो याचाही आनंद मनात भरभरून साठवला ,
जरी कष्ट केले तरी मनसोक्त स्वच्छंदी आजवर प्रवास केला हेही सांगितले स्वतःला , माणसे पाहिली , माणसे ओळखली , कमीजास्त चुकलोही पारखण्यात पण माणसे जोडली व आनंद घेत जगत आलो .. आणि असेच स्वच्छंदी जगणे सुरू ठेवणार आहे. स्वतःशी
हितगुज करताना जाणवले ,माझी काही कर्तव्य जबाबदाऱ्या आणि पुढची दिशा यावर पण मी चिंतन केले पाहिजे , वारंवार स्वतःला शोधले पाहिजे . मनात विचार आला आपले आरोग्य, आपले शरीर हे चांगले असेल तर सगळे जग तुमच्यावर प्रेम करते !
म्हणुन काहीही झाले तरी "माझा मीच माझ्यासाठी खूप महत्त्वाची व्यक्ति आहे हेही ध्यानात आले" .
इतरांचा मानसन्मान , आदर करताना मी स्वतःचाही आदर केला पाहिजे , म्हणजे मी कुठेही कमी नाही , कोणताही न्युनगंड ठेऊन मी जगणार नाही . खूप दिवसांपासुन इच्छा होती स्वतःसाठी हितगूज करावे पण रोजची धावपळ रोजची कामे यामुळे स्वतःशी मी बोलत नव्हतो . आज वेळ काढला थोडा निवांत होतो ,थोडा रिलॅक्स होतो म्हणून आज कुठे दुपारी वेळ मिळाला . फ्रेश झालो , ज्यांनी जन्म दिला त्यांचे आभार मानले ,ज्यांनी साथ दिली त्यांच्या बद्दल मनात कृतज्ञता व्यक्त केली , ज्या निसर्गामुळे माझे अस्तित्व आहे त्याचेही आभार मानले कारण आपण क्षणभंगुर आहोत , निसर्गातील छोटे प्रवासी आहोत हे मनाला सांगितले , तसेच ज्यांनी ज्यांनी आपल्यासाठी काही केले त्यांची आठवण काढली व ते सदैव सुखी राहवेत अशी प्रार्थना पण केली अन मनापासून परमेश्वराचेही आभार मानले , कारण परमेश्वराने माझ्यावर प्रेम करणारी माणसे माझ्या जीवनात पाठवली म्हणून मी आज आनंदात आहे हे पण मनाला सांगितले . आज मी सुंदर झाडाच्या गर्द सावलीत स्वतःशी बोलत होतो समजावून स्वःताला घेत होतो , बालपण, शालेय जीवन, संसार , कुटुंब आणि आजचा मी यावर चिंतन करत होतो .
अगदी निरव शांतता होती , वार्याची झुळूक व पक्षांचे आवाज सोडले तर
आसपास कुणीही नव्हते आणि माझ्या मनाचा शोध मी घेत होतो.
जसे माझ्या अंतर्मनात मी डोकावले तसे माझे व्यक्तीमत्व मला प्रसन्न दिसले, माझे मन मला सांगत होते . " तू जरी कुणाचे फार चांगले करु नाही शकला तरी तू कुणाची फसवणूक केली नाही, कुणाला जाणीवपूर्वक त्रास दिला नाही म्हणून तुला चिंता करायची गरज नाही" , "प्रत्येक वळणावर तुला यश मिळाले व पुढेही मिळणार आहे "
हे मनाने वारंवार सांगितले !
बालपणीच्या आठणीत गेलो तेंव्हा हास्याची लकेर उमटली..दुसरी व्यक्ती समोर नसताना चेहऱ्यावर हास्य येणे कसं शक्य आहे ?
पण हितगुज स्वतःशी करायचे म्हटलं तर आठवणी येतात व हसायलाही येते !
हसतमुख मी माझ्यात पाहतो तेंव्हाच मी प्रसन्न होतो म्हणून स्वतःला ओळखा ,स्वतःशी हितगुज करा !
मी माझ्याच विचारात रमून गेलो होतो आणि
आजवर काय चुकले काय बरोबर हेही मनातले मनात व्यक्त होत होतो .. तसा थोडाफार गोंधळही सुरु होता डोक्यात आजवर तु खुप धावपळ केली , ओढाताण केली , जमेल तशी मदत केली बहुतेक लोकांवर विश्वास ठेवला पण मन म्हटलं भुतकाळ काढून काय फायदा हे कलियुग आहे ? माणसे विसरून जातात , आणि कदाचित तुम्हाला त्रासही देतात हीच ती रित आहे जगाची म्हणून क्षणभर थांबलो आणि परत मनात बोललो !
हे असेच चालणार म्हणून पुन्हा एकदा स्वतःला माफ केले..
कधी कधी आपण खूप भावनिक असतो , तसेच आपल्या हातून चुकाही होतात , कारण आपण प्रेम करणारी साधीभोळी माणसे असतो तसेही
.स्वतःला स्वतः च्या चुका सांगणे कठीण पण आवश्यक आहे असे समजून काय काय चुकले आपले याचेही चिंतन केले.
स्वतःच्या चुका समजून घेणे महत्वाचे आहे.
स्वतःला छान जगायचे आहे, आपण आपल्या चुका समजून घेतल्या पाहिजेत , तसे जीवन खळळता झरा आहे सुंदर आहे पण तो कधीतरी आटणार आजे जसा झरा सर्वांना खळखळून वाहताना आनंद देतो स्वतःशी गाणी गातो तसे आपण स्वतःशी गायले पाहिजे , अगदी झर्यासारखे वाहिले पाहिजे , सुखासाठी हेही केले पाहिजे !
मित्रांनो
आज मी अगदी आनंदी आहे , कारण मी काहीच गमावले नाही जीवनपटातील बेरीज व वजाबाकी हे गणित सोडवताना मी खूप प्लसमध्ये आहे . खेळीमेळीच्या वातावरणात मी जगतोय आणि हवं तसं हवं तेवढं स्वःताला आनंदी ठेवतोय , मी सुखी आहे व नवीन वर्षात पुन्हा जगण्यास सज्ज झालोय , स्वतःला समजून घेऊन ,मनाशी बोलून जगायचे हेही आज ठरवले आहे , काही वरिष्ठांचे संस्कार , काही साधू संतांचे मार्गदर्शन व मित्रांचे योग्य सल्ले घेऊन नविन वर्षात पाऊल ठेवायचे हे पण हितगूज केलंय मनाशी .
मला वाटते प्रत्येकजण अशा कल्पना करतो स्वतःशी बोलतो पण तो लिहित नाही पण प्रत्येकाच्या अंतर्मनात विषय आणि विचार असतात , प्रत्येकाचे भाव विश्व असते कुणी व्यक्त होतो तर कुणी अबोल जगतो पण तो तितकाच उपयुक्त असतो म्हणून स्वतःला समजून घेणेही आवश्यक आहे असे मला वाटते .
©®विजय पिसाळ नातेपुते.
9665936949